अकोला जिल्ह्यात पर्यायवाची प्रहार!
By किरण अग्रवाल | Published: October 10, 2021 10:38 AM2021-10-10T10:38:53+5:302021-10-10T12:41:03+5:30
Akola ZP By Poll : पोटनिवडणुकीच्या माध्यमातून अकोला जिल्हा परिषदेत झालेला प्रहार जनशक्ती पक्षाचा चंचुप्रवेश याचदृष्टीने प्रस्थापितांच्या डोळ्यात अंजन घालणारा म्हणायला हवा.
- किरण अग्रवाल
प्रहार जनशक्ती पक्षाच्या अकोला जिल्हा परिषदेतील प्रवेशाने केवळ वंचित बहुजन आघाडीनेच नव्हे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेनेही सतर्क व्हायला हवे, कारण यातून मतदारांना पर्याय उपलब्ध झाल्याचा संकेत मिळून गेला आहे. राज्यातील सत्तेच्या साथीने प्रहार बळकट होणार असेल तर इतर सहयोगी प्रस्थापितांचे काय? असाही प्रश्न आहेच.
व्यक्ती निष्ठा बदलतात, तसे मतदार पक्ष बदलतात आता. आश्वासनांना भुलून शिक्के मारण्याचे दिवस गेले, आता काम बोलते; शिवाय अनेकांना संधी देऊन व अनुभवूनही फारसे पदरी पडत नाही तेव्हा ‘सारे एकाच माळेचे मणी’ अशी भावना वाढीस लागते आणि त्यातूनच नव्या पर्यायाचा शोध घेतला जातो. अशा स्थितीत प्रस्थापित पक्ष वा व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कुणाचे चांगभले होऊन जाणे स्वाभाविक ठरते. पोटनिवडणुकीच्या माध्यमातून अकोला जिल्हा परिषदेत झालेला प्रहार जनशक्ती पक्षाचा चंचुप्रवेश याचदृष्टीने प्रस्थापितांच्या डोळ्यात अंजन घालणारा म्हणायला हवा.
अकोला जिल्हा परिषदेच्या कुटासा गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास मात देऊन प्रहार जनशक्तीने विजय संपादित केल्याची घटना हलक्यात घेऊन चालणारी नाही. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्यांना बाजूस सारून ज्या अमोल मिटकरी यांना पक्षाने विधान परिषदेत संधी दिली, त्यांच्याच गटात सदर प्रकार घडल्याने मिटकरी व त्यांच्या पक्षाला हा पराभव जिव्हारी लागणे स्वाभाविक आहे; विशेषत: या ठिकाणी मिटकरी यांनी आपला सर्वाधिक आमदार निधी वापरल्याचा आरोप ओढवून घेतला असतानाही त्यांच्या उमेदवारास पराभव स्वीकारावा लागला, तेव्हा नेमके काय व कुठे चुकते आहे याचा शोध त्यांनी घेणे गरजेचे आहे.
राज्यातील सत्ता समीकरणांच्या महाआघाडी अंतर्गत अकोल्याचे पालकमंत्रिपद बच्चू कडू यांना देण्यात आले तेव्हाच स्थानिक पातळीवर तिघात चौथा वाटेकरी दृष्टिपथात येऊन गेला होता. काँग्रेस व राष्ट्रवादी असो, की शिवसेना; या तीनही पक्षांकडे स्थानिक पातळीवर सर्वमान्य नेतृत्व नाही. त्यात सत्तेत असूनही पालकमंत्रिपद चौथ्याकडेच गेल्यामुळे या पक्षांना राज्यातील सत्तेचा तसा लाभदायी आधार लाभू शकलेला नाही. तिघाडाच नव्हे, राजकीय चौघाडा झाल्याने जिल्ह्यातील शासकीय समित्यांच्या निवड-नियुक्त्या अद्याप होऊ शकलेल्या नाहीत, यामागील कारणही तेच. अशात पोटनिवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत प्रथमच प्रहारचा प्रवेश होणे हे महाआघाडीतीलच प्रस्थापितांना धक्का देणारे आहे.
बच्चू कडू यांची राजकीय वाटचाल ही धडाकेबाज व अभिनव आंदोलनांनी भरलेली आहे. जनतेचे प्रश्न तेवढ्याने सुटतात असेही नाही, मात्र इतरांकडून भ्रमनिरास झालेल्यांना पर्याय म्हणून ते खुणावू लागले असतील तर आश्चर्य वाटू नये. लगतच्या अमरावती जिल्हा परिषदेत पाच जागा व अचलपूर तसेच चांदूरबाजार नगरपालिकेत अस्तित्व राखून असलेल्या प्रहार जनशक्तीने आता अकोल्यातही पक्ष संघटनेचा विस्तार चालविला आहे. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या असून सदस्यता मोहीम राबविली जात आहे. अशात या पक्षाला जि.प. व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत यश लाभल्यामुळे त्यांच्या टार्गेटवर यापुढील अकोला महापालिका निवडणूक असणार आहे.
भलेही निवडणूक लढविणाऱ्या व्यक्ती त्याच वा उमेदवार तेच असतात, पण नवीन पक्षाचा झेंडा घेऊन ते येतात तेव्हा पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यादृष्टीनेच प्रहारच्या अकोल्यातील चंचुप्रवेशाकडे पाहता येणारे आहे. कुटासा येथे ही ज्योत पेटली म्हणून केवळ तेथील आमदार मिटकरी यांनीच नव्हे, तर पक्ष म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेनेच याबाबत सतर्क व्हायला हवे.