निपाह विषाणूचे ‘विघ्न' टळले असले तरी, बेफिकीर राहू नका !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 07:28 AM2023-09-20T07:28:45+5:302023-09-20T07:29:06+5:30

वटवाघळांची लाळ आणि लघवीतून निर्माण होणारे लहान थेंब श्वसनाच्या द्वारे घेणे हा निपाचा मानवांमध्ये संक्रमणाचा एक महत्त्वाचा मार्ग असू शकतो

Although the Nipah virus 'disturbance' has been averted, don't be careless! | निपाह विषाणूचे ‘विघ्न' टळले असले तरी, बेफिकीर राहू नका !

निपाह विषाणूचे ‘विघ्न' टळले असले तरी, बेफिकीर राहू नका !

googlenewsNext

डॉ. नंदकुमार कामत, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ

निपा विषाणूच्या प्रादुर्भावामुळे केरळवर चौथ्यांदा संकट आले आहे. निपाह हा सार्स किंवा स्वाइन फ्लूसारखा हवेतून पसरणारा विषाणू आहे. त्याचे नाव मलेशियातील सुंगाई निपाह या गावावरून आले आहे. तिथे तो प्रथम ओळखला गेला.

सुरुवातीची लक्षणे म्हणजे सामान्य ताप, डोकेदुखी, चक्कर येणे, स्नायू दुखणे. ५ ते १४ दिवसांनंतर रुग्णांमध्ये एन्सेफलायटीस (मेंदूची जळजळ) दिसून येते. त्यामागोमाग डोकेदुखी, तंद्री, दिशाभूल आणि मानसिक गोंधळ यांचा त्रास होतो. यावर अद्याप कोणतीही लस किंवा कायमस्वरूपी इलाज नाही. हा विषाणू फळभक्षक वटवाघळांच्या ५८ हून अधिक प्रजातींद्वारे प्रसारित होत असल्याने तो प्राणी आणि मानवांमध्ये कुठेही दिसू शकतो.

२०१८ वर्षी केरळमध्ये २६०० विषाणू संसर्ग आणि १७ मृत्यूची नोंद झाली होती. २०१८ च्या उद्रेकातून चार मानवी आणि तीन फळभक्षक वटवाघळांतील (टेरोपस मेडिअस) नमुन्यांमधून मिळवलेल्या निपाह विषाणूंचा जनुकीय विश्लेषणाने असे दाखवून दिले की मानवांतील निपाह विषाणू २६.१५ टक्के बांगलादेशी प्रकारातला होता; परंतु ९९.७ ते १०० टक्के विषाणू वटवाघळांच्या टेरोपस जातीतील विषाणूसारखे होते. म्हणजे फळभक्षक वटवाघळे हेच उद्रेक होण्याचे स्रोत होते. 

निपाह संसर्गासाठी प्रभावी विशिष्ट उपचार किंवा प्रतिबंधात्मक लस नसल्यामुळे या प्रतिबंधावर जास्त भर दिला पाहिजे. वटवाघळांच्या लाळेच्या संपर्कात येणाऱ्या फळांचे सेवन करणे किंवा वटवाघळांची लाळ आणि लघवीतून निर्माण होणारे लहान थेंब श्वसनाच्या द्वारे घेणे हा निपाहचा मानवांमध्ये संक्रमणाचा एक महत्त्वाचा मार्ग असू शकतो असा संशयही व्यक्त केला गेला आहे. केरळसारख्या सुशिक्षित राज्यात निपाह विषाणूचा हा पाच वर्षांतील चौथा उद्रेक असेल तर आता शेजारच्या कोणत्या राज्यात पहिला उद्रेक होईल ? केरळच्या कोझिकोडमध्ये १२ सप्टेंबर रोजी दोन मृत्यू निपाह विषाणूमुळे झाल्याचा खुलासा केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी केला होता. आपल्या देशात हा आजार आढळण्याची ही पाचवी वेळ आहे.

पहिला उद्रेक जानेवारी ते फेब्रुवारी २००१ दरम्यान पश्चिम बंगालच्या सिलीगुडी जिल्ह्यात झाला होता. या गंभीर उद्रेकामुळे ६६ लोक आजारी झाले होते व ४५ जण दगावले होते. २०२१ मध्ये निपाह विषाणूचा प्रादुर्भाव कोझिकोडमधील पझूर येथे १२ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूने झाला. हा उद्रेक ५ सप्टेंबर २०२१ रोजी संपुष्टात आल्याचे घोषित करण्यात आले होते. आता हा पाचवा उद्रेक आहे. अलीकडेच केरळच्या कोझिकोडमध्ये "अनैसर्गिक तापा" मुळे मरण पावलेल्या दोन लोकांना निपाह विषाणूची लागण झाली होती. त्यानंतर चार व्यक्तींची निपाह चाचणी सकारात्मक आली, त्यातील दोन रुग्ण कोझिकोड येथे उपचार घेत आहेत तर इतरांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही मृत व्यक्ती हॉस्पिटलमध्ये एकमेकांच्या संपर्कात आल्या होत्या. केरळ सरकारने या रुग्णांची संपर्क यादी तयार केली आहे. यापैकी एकाच्या संपर्कात आलेल्या सुमारे १६८ व्यक्तींची राज्याच्या आरोग्य विभागाने ओळख पटवली आहे. संसर्ग रोखण्यासाठी केरळने १६ गाभा समित्या स्थापन केल्या आहेत. 

एनआयव्ही, पुणे आणि आयसीएमआरसह नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी, चेन्नईच्या तज्ज्ञ पथकाने केरळमध्ये सर्वेक्षणे आणि अभ्यास सुरू केला आहे.

Web Title: Although the Nipah virus 'disturbance' has been averted, don't be careless!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.