‘फॅशनेबल’ राहाल, तर बंदुकीची गोळी खाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 08:22 AM2021-07-12T08:22:47+5:302021-07-12T08:23:44+5:30

जे होण्याची भीती वारंवार व्यक्त होत होती, ती भीती अखेर खरी ठरली आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्यानं काढता पाय घेताच तालिबानी अतिरेक्यांनी तिथे आपलं वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आहे.

american army taking exit fro afghanistan taliban now again in action mode | ‘फॅशनेबल’ राहाल, तर बंदुकीची गोळी खाल!

‘फॅशनेबल’ राहाल, तर बंदुकीची गोळी खाल!

Next
ठळक मुद्देजे होण्याची भीती वारंवार व्यक्त होत होती, ती भीती अखेर खरी ठरली आहे.

जे होण्याची भीती वारंवार व्यक्त होत होती, ती भीती अखेर खरी ठरली आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्यानं काढता पाय घेताच तालिबानी अतिरेक्यांनी तिथे आपलं वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आहे. अमेरिकेनं जसजसं आपलं सैन्य परत मायदेशी बोलावलं, त्या प्रमाणात तालिबानीही त्या भागात आक्रमक होत गेले. आता तर देशातील जवळपास १५० पेक्षाही अधिक जिल्ह्यांवर त्यांनी पुन्हा आपला कब्जा केला आहे. पूर्वोत्तर प्रांत तखारसह अनेक प्रांत त्यांनी आपल्या ताब्यात घेतले आहेत. तिथे अफगाण सरकारची नाही, तर तालिबान्यांची मनमानी चालते. आपले कठोर कायदे त्यांनी पुन्हा लागू केले आहेत. गेल्या काही काळात अफगाणिस्तानने जी काही प्रगती केली होती, ती केवळ काही दिवसांतच पुन्हा मागे ढकलली गेली आहे. महिलांच्या वाट्याला पुन्हा असह्य जिणं येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

तालिबान्यांनी आपला ‘फतवा’ जारी करताना महिलांना बजावलं आहे, ‘हिजाब’शिवाय आणि पुरुष नातेवाईक सोबत असल्याशिवाय एकट्यानं घराच्या बाहेर निघाल, तर याद राखा. आपली संस्कृती विसरून पाश्चा‌त्त्यांच्या आहारी जाल, तर परिणाम भोगण्यास तयार राहा!’ 

पुरुषांसाठीही नियम आहेत : प्रत्येक पुरुषानं दाढी राखलीच पाहिजे. जो दाढी राखणार नाही, त्यानं स्वत:च आपली जबाबदारी घ्यावी. आपल्या चुकीच्या कृत्याबाबत त्यांना जर काही शिक्षा झाली, तर त्याला आम्ही जबाबदार असणार नाही, असा तालिबान्यांचा आदेश आहेे. याशिवाय अनेक कट्टर कायदे त्यांनी आपल्या अखत्यारीतील प्रदेशात लागू केल्यानं अनेक ठिकाणच्या शाळा बंद झाल्या आहेत. महिलांनी नोकऱ्या सोडल्या आहेत. दवाखाने बंद पडले आहेत. अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दर हळूहळू गगनाला भिडत चालले आहेत. सर्वसामान्य अफगाणी नागरिक त्यात भरडले जात आहेत. सरकार आपली सुरक्षा करू शकत नाही, हे नागरिकांना पक्कं ठाऊक आहे. अमेरिकन सैन्य अफगाणमध्ये असतानाही त्यांचा उद्रेक सुरूच होता; पण आता तर तालिबान्यांनी खुलेआम अत्याचार सुरू केले आहेत.

अमेरिकन सैन्यानं माघार घेतल्यावर तालिबान्यांचे अत्याचार पुन्हा सुरू होतील, हे सर्वसामान्य नागरिकांनाही माहीतच होतं, त्यामुळे त्यांनी तेव्हापासूनच आपल्या संरक्षणाची काळजी स्वत:च घ्यायला सुरुवात केली आहे. अनेक नागरिक, संस्था संघटित होत आहेत, शस्त्रांचा साठा आणि प्रशिक्षण त्यांनी सुरू केलं आहे. अफगाण सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याची तयारी सुरू केली आहे; पण त्यात त्यांना कितपत यश येईल याविषयीही शंका आहे. कारण तालिबान्यांचं संख्याबळ आणि त्यांच्याकडे असलेल्या घातक, आधुनिक शस्त्रांचा साठाही जास्त आहे. आपल्याला विरोध करणाऱ्यांचा वचपा काढल्याशिवाय ते राहणार नाहीत,  अशा लोकांना ‘शिक्षा’ करायला त्यांनी सुरुवातही केली आहे. त्यामुळे नागरिक पुन्हा भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.

तखर प्रांताचे गव्हर्नर अब्दुल्ला कारदुक म्हणतात, तालिबान्यांनी पुन्हा आपलं डोकं वर काढलं आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांनाही त्रास देणं सुरू केलं आहे. अनेक  सरकारी इमारतीही  बॉम्बस्फोटानं उडवून दिल्या जात आहेत. मुलींना शाळेत जाण्यापासून बंदी घातली आहे. तालिबान्यांच्या ताब्यातील अनेक भागांत सरकारी सेवाही बंद झाल्या आहेत. सगळ्या ठिकाणी त्यांनी लुटालूट सुरू केली आहे. सर्वसामान्यांना धाकात ठेवताना, तालिबान्यांनी ‘सक्तवसुली’ सुरू केली आहे. नागरिकांकडून बळजबरीनं अन्नधान्य आणि पैसा वसूल केला जात आहे. त्यास विरोध करणाऱ्यांना किंवा कुचराई करणाऱ्यांना सरळ ‘तालिबानी इंगा’ दाखविला जात आहे. तालिबान्यांनी कायदा हातात घेतला असून, कुठल्याही पुराव्याशिवाय लोकांना ‘शिक्षा’ करायला सुरुवात केली आहे.

२००१ मध्ये अमेरिकन सैन्यानं अफगाणिस्तानात तळ ठोकल्यानंतर गेल्या वीस वर्षांत जी काही थोडीफार प्रगती झाली होती, त्याला एकदम खीळ बसली असून, ही प्रगती पुन्हा माघारली गेली आहे. अमेरिकन तज्ज्ञांनीही हा अंदाज वर्तविला होता, तो काही दिवसांतच तंतोतंत खरा ठरू पाहतो आहे. तालिबान्यांच्या भीतीनं अनेक नागरिकांनी आताच देशाबाहेर पळ काढायला सुरुवात केली आहे. तालिबाननं आपली पकड जर आणखी मजबूत केली, तर आपल्याला देशाबाहेर पडणंही मुश्कील होईल, हे लोक ओळखून आहेत. त्यामुळे काबूलमधील अनेक देशांच्या दूतावासात हजारो लोकांनी व्हिसासाठी अर्ज केले आहेत. अमेरिकेनंही यासाठी शक्य ती मदत करण्याचं जाहीर केलं असून, मध्य आशियातील कजाकस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांशी बोलणी सुरू केली आहे.

हजारोंची देश सोडण्याची तयारी
अफगाण सैनिक आणि तालिबानी यांच्यातील चकमकीही पुन्हा सुरू झाल्या आहेत. रक्तपात वाढला आहे. परिस्थिती आणखी बिघडेल हे लोकांनाही माहीत आहे. त्यामुळे आताच जवळपास ७५ हजार नागरिकांनी देश सोडण्याची तयारी चालविली आहे. इथे राहिलो, तर आम्ही जगणं विसरून जाऊ, असं अनेक नागरिकांचं म्हणणं आहे.

Web Title: american army taking exit fro afghanistan taliban now again in action mode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.