सौम्यवादी आणि कट्टरवादी यातील अमेरिकी लढा

By admin | Published: October 7, 2016 02:29 AM2016-10-07T02:29:12+5:302016-10-07T02:29:12+5:30

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक हा संपूर्ण जगासाठी औत्सुक्याचा विषय असतो. त्या देशासाठी ही निवडणूक तर महत्त्वाची आहेच; पण जगातील इतर अनेक देशांवर या निवडणुकीचा बरावाईट परिणाम होणार

American fight between the placid and fundamentalist | सौम्यवादी आणि कट्टरवादी यातील अमेरिकी लढा

सौम्यवादी आणि कट्टरवादी यातील अमेरिकी लढा

Next


अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक हा संपूर्ण जगासाठी औत्सुक्याचा विषय असतो. त्या देशासाठी ही निवडणूक तर महत्त्वाची आहेच; पण जगातील इतर अनेक देशांवर या निवडणुकीचा बरावाईट परिणाम होणार आहे.
निवडणुकीतील डेमोक्रॅट उमेदवार हिलरी क्लिन्टन व रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षीय वाद-विवादात वंशवाद, दहशतवाद व वर्तणूक यांवर जोरदार शाब्दिक चकमक झडली. ट्रम्प यांचे कच्चे दुवे दाखवताना आपण अध्यक्षपदासाठी कशा सक्षम आहोत, हेही हिलरींनी ठासून मांडले. तर ट्रम्प यांनी हिलरींच्या दोषांवर बोट ठेवत माझ्याजवळच अध्यक्षपदी विराजमान होण्यासाठीची क्षमता आहे, असे प्रतिपादन केले.
देशात वातावरण असे तापत असताना जगावर या निवडणुकीचे काय परिणाम होतील याचे आडाखे प्रसिद्ध होऊ लागले आहेत. त्यानुसार ट्रम्प विजयी झाले, तर संपूर्ण जगावर त्याचे घातक परिणाम होतील आणि अध्यक्षपदाची प्रतिष्ठा व लोकप्रियता कायम ठेवायची असेल आणि जागतिक लोकशाहीवरील ताण कमी करायचा असेल, तर हिलरी यांना बराक ओबामा सरकारच्या धोरणात बरेच बदल करावे लागतील.
अमेरिकेतील बदलत्या परिस्थितीमुळे चीन, रशिया इराण या देशांचे अंतर्गत राजकारण अधिक कडक व कठोर झाले आहे. परदेशांशी असलेला व्यवहार आक्रमक झाला आहे. मुक्त अर्थव्यवस्था व मानवी हक्क ही मूल्ये उधळून लावली आहेत. थायलंड, पोलंड, फिलिपाईन्स, हंगेरी, तुर्कस्तान, निकारागुआ, इजिप्त, इथियोपिया, बहारीन, मलेशिया हे देश याच मार्गाने चालले आहेत. निवडून आल्यास हुकूमशाहीचा प्रभाव वाढेल आणि मग जगातील इतर देशांना लोकशाही मूल्यांचे पालन करण्याचा अधिकार अमेरिकेला राहील काय, असा प्रश्न आजच विचारला जात आहे. ट्रम्प यांना लोकशााही मूल्यांबद्दल आदर नाही. प्रसारमाध्यमांची गळचेपी करण्याची त्यांची तयारी आहे. निवडून आलो तर तुमचे बघून घेईन, असा इशाराही त्यांनी टीकाकार व विरोधकांना दिला आहे. हे सारे कमी पडले म्हणून की काय त्यांनी रशियाचे सर्वेसर्वा ब्लादिमीर पुतीन व चीनमधील तियानमेन चौकातील हत्याकांडाचे खुलेआम कौतुक केले आहे.
अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या उमेदवारीच्या काळात अमेरिकन मतदारांना अनेक आश्वासने दिली. नव-नवी स्वप्ने दाखविली; पण अध्यक्षपदी बसल्यानंतर ही आश्वासने ते सोईस्करपणे विसरले. आता ही आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी हिलरी क्लिंटन यांना घ्यावी लागणार आहे.
आपले प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प कट्टरवादी असल्याचा हिलरी क्लिंटन यांचा आरोप आहे. अमेरिकन राजकारणात आतापर्यंत कोणतेही स्थान नसलेले कडवे, कट्टरवादी लोक पुढे आणण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचेही हिलरी यांनी म्हटले आहे. राजकारणात असे एककल्ली, हट्टी लोक असतातच; पण आजपर्यंत आघाडीच्या पक्षाची अध्यक्षपदाची उमेदवारी त्यांना मिळाली नव्हती, असेही हिलरी म्हणतात.
हिलरी यांनी केलेली ही परखड टीका ट्रम्प यांना चांगलीच झोंबल्याने त्यांनी आपले धोरण थोडेसे मवाळ केले आहे. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ११ दशलक्ष लोकांना हाकलून काढू, अशी घोषणा त्यांनी आधी केली होती. पण या वक्तव्याचा आपण पुनर्विचार करू, असे ते आता म्हणत आहेत. ट्रम्प यांनी अशी सारवासारव केली असली तरीही हा बदल तात्कालिक असून, मतदारांनी त्याला फसू नये, असे आवाहन हिलरी यांनी केले आहे.
वादग्रस्त ई-मेल प्रकरण हिलरी यांची पाठ सोडण्यास तयार नाही. अमेरिकन तपास संघटना एफबीआयने हिलरी यांच्या विरोधात नवे १५ हजार ई-मेल गोळा केले आहेत. या ई-मेल प्रकरणाचा फायदा डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला असून, हिलरी यांची विडंबना करणारी चित्रफीत त्यांनी टिष्ट्वटरवर प्रसिद्ध केली आहे. एफबीआयचे संचालक जेम्स कोमे या चित्रफितीत बोलताना दिसतात. परराष्ट्र मंत्री असताना हिलरी यांनी ११० सरकारी ई-मेल खाजगी सर्व्हरवरून पाठवले. त्यातील ५२ ई-मेलमध्ये सरकारी गोपनीय माहिती होती, तर सात ई-मेलमध्ये माहितीची देवाण-घेवाण करण्यात आली, असे कोमे म्हणतात.
अमेरिकेतील निवडणूक प्रचाराने असे रंगतदार वळण घेतलेले असताना आर्थिक विकासाचा मुद्दा मागे कसा राहील. चित्रफीत प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी आपले आर्थिक विकासाचे धोरण टीव्हीवरील जाहिरातीत मांडले आहे. ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालीच अमेरिकेच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असे ट्रम्प यांच्या सल्लागार जेसन मिलर याने म्हटले आहे. ही जाहिरात मतदारांची दिशाभूल करणारी आहे, असा दावा हिलरी क्लिंटन यांनी केला आहे.
-अंजली जमदग्नी
(ज्येष्ठ पत्रकार)

Web Title: American fight between the placid and fundamentalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.