अमेरिकन हमिंगबर्ड अन् भारतीय माकडं!
By admin | Published: February 6, 2017 11:46 PM2017-02-06T23:46:45+5:302017-02-06T23:46:45+5:30
कुणाला सुसंस्कृत म्हणावे? अद्याप जन्मही न घेतलेल्या पिल्लांना वाचविण्यासाठी लक्षावधी डॉलर्सचा प्रकल्प नुकसानीची पर्वा न करता रोखून धरणाऱ्यांना...
कुणाला सुसंस्कृत म्हणावे? अद्याप जन्मही न घेतलेल्या पिल्लांना वाचविण्यासाठी लक्षावधी डॉलर्सचा प्रकल्प नुकसानीची पर्वा न करता रोखून धरणाऱ्यांना, की केवळ घरात शिरल्याच्या प्रमादासाठी माकडांचा जीव घेणाऱ्यांना?
गेले वर्ष संपता संपता अमेरिकेतून एक बातमी आली. रिचमंड आणि सॅन रफायल या दोन शहरांना जोडणाऱ्या पुलाच्या विस्तारीकरणाचे काम, अद्याप अंड्यातून बाहेरही न पडलेल्या हमिंगबर्ड पक्ष्याच्या पिल्लांनी रोखून धरले आहे. पुलाच्या कामास प्रारंभ होण्याच्या बेतात असताना, एका झाडावर हमिंगबर्ड पक्ष्याचे घरटे आणि त्यामध्ये अंडी आढळली. त्या घरट्यामुळे तब्बल ७० दशलक्ष डॉलर्सचा हा प्रकल्प काही आठवड्यांसाठी रोखून धरण्यात आला आहे.
अमेरिकेतील निसर्गप्रेमाचे हे उदाहरण डोक्यात घोळत असतानाच, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा या तालुका मुख्यालयातून एक बातमी आली. माकडांनी घरात प्रवेश केल्यामुळे संतापलेल्या तिघांनी पाच माकडांना बेदम मारहाण करून त्यापैकी दोघांचा जीवच घेतला. त्यांनी माकडांना कोंडून घेतले आणि बेदम झोडपून काढले. वन अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती मिळाल्यावर त्यांनी प्रचंड रक्तस्राव होत असलेल्या माकडांना इस्पितळात नेऊन उपचार सुरू केले; मात्र डोक्याची कवटी फुटली असल्याने त्यापैकी दोघांचा जीव गेला, तर इतर तीन माकडे उपचारानंतर ठीक झाल्यावर त्यांना जंगलात सोडून देण्यात आले.
या दोन बातम्यांमधील विरोधाभास मन सुन्न करून सोडणारा आहे. शाकाहारी व्यक्ती शोधावी लागेल, अशी स्थिती असलेल्या देशात, जन्माला येऊ घातलेल्या पिल्लांना वाचविण्यासाठी प्रचंड खर्चाचा एक प्रकल्प चक्क काही आठवड्यांसाठी रोखून धरला जातो आणि दुसरीकडे शाकाहाराचा महिमा आणि निसर्गपूरक संस्कृतीचा वारसा सांगितल्या जाणाऱ्या देशात निष्पाप, मुक्या जिवांप्रति एवढे अमानुष क्रौर्य?
काय गुन्हा होता त्या माकडांचा? कदाचित अन्नाचा किंवा पाण्याचा शोध घेत शिरले असतील घरात ! कदाचित केलीही असेल थोडी नासधुस ! पण म्हणून त्या मुक्या जिवांना एवढी बेदम मारहाण करावी, की कवट्या फुटून तडफडत त्यांनी जीव सोडावा? हीच का आमची महान संस्कृती, जिचे आम्ही उठता-बसता गुणगाण गात असतो? पाश्चात्य देशांमधील लोक नग्नावस्थेत फिरत होते, तेव्हा आमच्या देशात साहित्य, कला, संस्कृती शिखरावर पोहोचली होती, असे अभिमानाने सांगणारे आम्ही कुठे येऊन पोहोचलो? आज कुणाला सुसंस्कृत म्हणावे? अद्याप जन्मही न घेतलेल्या पिल्लांना वाचविण्यासाठी लक्षावधी डॉलर्सचा प्रकल्प नुकसानाची पर्वा न करता रोखून धरणाऱ्यांना, की केवळ घरात शिरल्याच्या प्रमादासाठी माकडांचा जीव घेणाऱ्यांना?
या प्रकरणात वनविभागाने मात्र प्रशंसनीय कामगिरी केली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती मिळताच जखमी माकडांवर उपचारांची व्यवस्था करून, तीन माकडांचे जीव वाचवले. एवढेच नव्हे तर गुन्हा दाखल करून तीनपैकी दोन आरोपींना जेरबंद केले. आरोपींना कठोरतम शिक्षा व्हावी, असा वनविभागाचा प्रयत्न आहे. एवढ्यावरच न थांबता, तेल्हारा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन, त्या शहरात मोठ्या संख्येने असलेल्या माकडांना नजीकच्या मेळघाट जंगलात सोडण्याचा प्रयत्न करण्याचा मनोदयही अकोल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी अशोक वायाळ यांनी बोलून दाखवला आहे.
नागपूरच्या स्मिता मिरे या महाविद्यालयीन युवतीचेही यासंदर्भात कौतुक व्हायला हवे. माकडांना झालेल्या मारहाणीची, समाजमाध्यमांवर फिरत असलेली चित्रफीत बघून तिने दोषींना शिक्षा व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा चालवला आहे. भविष्यात आणखी कुणी एवढ्या अमानुषतेचा परिचय देण्यास धजावू नये, यासाठी स्मिता आणि अकोल्याच्या वनविभागाचे प्रयत्न यशस्वी होणे अत्यंत गरजेचे आहे.
- रवि टाले