जागतिक मंचावर भारताला अमेरिकेचा सलाम!
By विजय दर्डा | Published: November 21, 2022 09:18 AM2022-11-21T09:18:09+5:302022-11-21T09:19:53+5:30
‘जी २०’ देशांच्या शिखर संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा झेंडा फडकवला. यामागे सखोल कूटनीती आणि दृढ स्वाभिमान आहे.
विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह -
आर्थिक दृष्टिकोनातून जगातल्या २० शक्तिमान आणि प्रभावशाली देशांचा समूह ‘जी२०’च्या सतराव्या संमेलनात अमेरिकेचे राष्ट्रपती भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलाम करत असल्याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. वास्तवात हे छायाचित्र जगाच्या व्यासपीठावर भारताचे महत्त्व किती आहे, हेच दाखवते. अमेरिकेचे राष्ट्रपती कोणीही असोत सर्वसामान्यपणे दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानांना असा सलाम करत नाहीत.
बायडेन यांनी मात्र असे केले, त्याकडे सगळे जग एक नवा संकेत म्हणून पाहत आहे. याच संमेलनात फ्रान्सचे राष्ट्रपती मॅन्युअल मॅक्रॉन आणि ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याबरोबरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र मोदींची कूटनीती आणि भारताचा प्रभाव सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे. ज्या प्रकारे ते चीनचे राष्ट्रपती यांना भेटले, त्यावरूनही हेच दिसते की यापुढे प्रत्येकच देशाला भारताला गांभीर्याने घ्यावे लागेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘जी २०’ संमेलनातील भारताच्या भूमिकेचे बलाढ्य अमेरिकेनेही कौतुक केले आहे.
‘जी २०’ या समूहाचा पाया ‘जी ७’च्या स्वरूपात घातला गेला होता. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि कॅनडा या देशांनी एकत्र येऊन ‘जी ७’ची स्थापना केली होती. रशिया नंतर त्यात सामील झाला. आता तो वीस देशांचा समूह झाला आहे. ‘जी २०’ मध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्कस्तान, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपीय संघ सामील आहे.
जगातल्या जवळजवळ ६० टक्के लोकसंख्येचा अधिवास याच देशांमध्ये आहे. यावरून या समूहाचे महत्त्व लक्षात येईल. जगाच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या सुमारे ८० टक्के हिस्सा याच देशातून येत असतो; इतकेच नव्हे तर जागतिक व्यापाराच्या ७५ टक्क्यांहून जास्त हिस्सा या देशांशी जोडला गेलेला आहे. जागतिक गुंतवणुकीत या देशांचा वाटा सुमारे ८० टक्के आहे. अशा समूहाचे अध्यक्षपद भारताकडे येणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.
दोन भागांत विभागले गेलेले जग वर्चस्वाच्या लढाईसाठी भांडत असताना जागतिक महाशक्तींमध्ये खोलवरचा अविश्वास आहे. आर्थिक हत्यारे वापरून चीनने अनेक देशांना जखमी केले; आता त्याची विस्तारवादी धोरणे छोट्या छोट्या देशांना गिळंकृत करण्याच्या पवित्र्यात आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. जगभरातील पुरवठ्याची साखळी त्यामुळे विस्कळीत झाली आहे. पाकिस्तान दहशतवादाचा किल्ला झाला असल्याचे वास्तव खुद्द् जो बायडेन यांनी जाहीरपणे बोलून दाखवले आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांना भारताकडे ‘जी२०’चे अध्यक्षपद येणे खूपच टोचले असणार. असे कसे झाले? आणि आता भारताचा रोख काय असेल याची चिंता त्यांना लागणार.
वास्तविक सतराव्या संमेलनाच्या वेळी भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘आम्ही कोणत्याही बाजूचे नाही, वसुधैव कुटुंबकम्’वर विश्वास ठेवतो- ही ती भूमिका आहे. मागच्या सप्टेंबर महिन्यात ‘शांघाय सहयोग संघटने’च्या बैठकीत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना मोदी यांनी सांगितले होते की ‘ही वेळ युद्धाची नाही.’ यावेळीही पुन्हा तेच सांगितले गेले. ‘जी २०’च्या घोषणापत्रात त्याची नोंदही झाली. या संमेलनात मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले की, या संघटनेला भारत विश्व कल्याणाचे साधन बनवेल. वास्तवात भारत आज एकीकडे अमेरिकेशी स्पष्ट बोलू शकतो आणि दुसरीकडे आपला जुना मित्र असलेल्या रशियाच्या चुकांकडेही बोट दाखवण्यात मागे पुढे पाहत नाही. अर्थातच ‘जी २०’चे अध्यक्षपद हा काही फुलांचा बिछाना नव्हे, विद्यमान परिस्थितीत तर तो नक्कीच काटेरी आहे. परंतु मोदी यांची कूटनीती सर्वांशी सहज संबंध स्थापित करणारी आहे. ते कोणाशी गळामिठी करतात, तर कोणाच्या पाठीवर थोपटतात. त्यांचा आविर्भाव स्वाभिमानाने भरलेला असतो. हा स्वाभिमान भारताचा आहे, हे उघडच होय. विद्यमान परिस्थितीत मोदी यांनी भारताला ज्या प्रकारे गटबाजीपासून दूर ठेवले, ते पाहता मला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आठवण येते. भारत स्वतंत्र झाला होता. कमजोर होता. परंतु पंडितजींनी कुठल्या एखाद्या गटात सामील न होता निरपेक्षतेचा रस्ता अवलंबिला. त्याच रस्त्यावरून इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी पुढे गेले.
आता नरेंद्र मोदी तेच धोरण यशस्वीरीत्या पुढे नेत आहेत. ‘जी२०’च्या अध्यक्षपदाचा भारताचा कार्यकाल एक डिसेंबरपासून सुरू होईल. पुढच्या वर्षीचे संमेलन भारताच्या अध्यक्षतेखाली होईल.
यादरम्यान दोनशे कार्यक्रमांची रुपरेषा आधीच तयार केली गेली आहे. सर्वांना बरोबर घेण्याच्या आपल्या धोरणाचा परिचय देत भारताने २०२३च्या संमेलनासाठी बांगलादेश, तुर्कस्तान, मॉरिशस, नेदरलँड, नायजेरिया, ओमान, सिंगापूर, स्पेन आणि संयुक्त अरब अमिरातीला अतिथी देश म्हणून आमंत्रित केले आहे. भारतासाठी ही एक मोठी संधी आहे. ‘जी २०’च्या अध्यक्षपदाची सफलता भारताला विश्वसनीयता मिळवून देईल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना आकर्षित करणे अधिक सुलभ होईल. भारतीय व्यापारी आणि उद्योगपती यांना जगभर काम करणे सोपे जाईल. भारतीय तरुणांना शिक्षणापासून कौशल्यांपर्यंत नवे रस्ते सापडतील.
२०५० पर्यंत भारत जगातली दुसरी आर्थिक शक्ती म्हणून विकसित होईल, हे मी यापूर्वीच लिहिले आहे. भारताची वाढती सक्रियता याच गोष्टीकडे निर्देश करणारी आहे... हे सारे प्रत्यक्षात येईल, अशी आशा आपण करू या.