अमित शाह जेवले!
By admin | Published: June 3, 2016 02:18 AM2016-06-03T02:18:52+5:302016-06-03T02:18:52+5:30
अन्न आणि पाणी या कोणत्याही सजीवाच्या अत्यंत मूलभूत अशा जीवनावश्यक गरजा असल्याने कोणत्याही स्थितीत तो त्या भागवतच असतो.
अन्न आणि पाणी या कोणत्याही सजीवाच्या अत्यंत मूलभूत अशा जीवनावश्यक गरजा असल्याने कोणत्याही स्थितीत तो त्या भागवतच असतो. साहजिकच मग आज आपण आपली भूक भागवली, आपण जेवलो असे काही कोणी कोणाला आवर्जून सांगत बसत नाही. त्यामुळेच मग कोण, कुठे, कधी, का, कसा आणि कोणाबरोबर जेवला याची वाच्यता होण्याचे कारण नाही व तशी ती होतही नसते. आणि म्हणूनच जेव्हां भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी दलिताघरी जेवण केले याची छायाचित्रासकट बातमी होते तेव्हां त्याचा अर्थ एकच असतो आणि तो म्हणजे आजही दलितांना कुठेतरी निम्न किंवा दुय्यम स्तरावर नेऊन बसविणे आणि त्यांच्या समवेत भोजन घेऊन आपण त्यांना जणू उपकृत केले आहे असे त्यांना आणि जगालाही दाखवून देणे. जर तसे नसते आणि अमित शाह यांचे शाही भोजन हा प्रसार माध्यमांच्या नजरेत आकर्षणाचा आणि कुतुहलाचा विषय असता तर रोजच त्यांनी न्याहारी कुठे केली, दुपारचे भोजन कुठे केले आणि रात्रीभोज घेताना त्यांच्या समवेत कोण होते याच्याही बातम्या झाल्या असत्या. पण त्या होत नाहीत. पण अशी चातुर्वर्णाश्रमी मानसिकता बाळगणारे अमित शाह एकटे आहेत म्हणावे तर तसेही नाही. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विदर्भातील कलावतीचा घेतलेला पाहुणचार आणि उत्तर प्रदेशात असेच एका दलिताघरी स्वीकारलेले भोजन ही याच मानसिकतेची उदाहरणे. राहुल गांधी यांनी एका दलिताघरी निवास केल्यानंतर विशिष्ट प्रकारच्या सुगंधी साबणाने आंघोळ केल्याची कडवट टीका मायावती यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर देशाचे माजी राष्ट्रपती के.आर.नारायणन यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली तेव्हां देशाचे पहिले दलित राष्ट्रपती अशा बातम्या झळकल्या. पण त्यांनी त्या यथार्थपणे नामंजूर केल्या. विद्वत्तेच्या जोरावर त्यांना देशातील सर्वोच्च पद लाभले होते. पण ते अमान्य करण्यासाठी त्यांच्यातील दलितत्वाचा उल्लेख करणे आणि अमित शाह यांच्या दलिताघरच्या जेवणाला अकारण महत्व देणे यामागील मानसिकता एकसारखीच आहे.