अमित शहांचा भयगंड की आत्मशोध

By Admin | Published: June 27, 2015 12:34 AM2015-06-27T00:34:40+5:302015-06-27T00:34:40+5:30

देशाच्या सत्तेत तर नाहीच नाही, पण खुद्द स्वत:च्या पक्षाच्या सत्तेतही नसताना, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आणीबाणीच्या पुनरागमनाची

Amit Shahhah's self-esteem of horror | अमित शहांचा भयगंड की आत्मशोध

अमित शहांचा भयगंड की आत्मशोध

googlenewsNext

देशाच्या सत्तेत तर नाहीच नाही, पण खुद्द स्वत:च्या पक्षाच्या सत्तेतही नसताना, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आणीबाणीच्या पुनरागमनाची जी भीती गेल्या सप्ताहात जाहीरपणे व्यक्त करुन दाखविली, त्या भीतीचे कवित्व दीर्घकाळ सुरु राहील असे दिसते. अडवाणींच्या मनातील भीतीचा रोख पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या दिशेने असल्याचा श्लेष त्यांच्या त्या मुलाखतीमधून अनेकांनी यथार्थपणे काढला होता. पण त्यावर खुलासा करताना, अडवाणींनी आपला रोख काँग्रेस पक्षाच्या दिशेने असल्याचे जरी म्हटले, तरी त्यावर कोणी विश्वास मात्र ठेवला नाही. आता तीच री भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ओढली आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात जाहीर केलेल्या अंतर्गत आणीबाणीला चार दशके पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपाने राजधानी दिल्लीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात शहा यांनी अडवाणी यांना वाटणारी भीतीच पुन्हा एकदा स्वत:च्या मुखे बोलून दाखविली. विशेष म्हणजे आणीबाणीच्या त्या काळात ज्यांनी तुरुंगवास भोगला, ते खुद्द अडवाणी या कार्यक्रमात हजर नव्हते आणि तितकेच नव्हे तर पक्षाने असा काही कार्यक्रम आयोजिला आहे, याची त्यांना गंधवार्ताही नव्हती. त्यांच्या अनुपस्थितीत बोलताना, शहा यांनी त्या कार्यक्रमात हजर असलेल्या त्यांच्याच कुळातील जनतेशी बोलताना असे जाहीर आवाहन केले की, कोणत्याही व्यक्तीला संघटना अथवा सिद्धांत वा विचार यापेक्षा वरचढ स्थान देऊ नका! ज्या राजकीय पक्षांच्या धमन्यांमध्येच एकाधिकारशाही वा हुकुमशाही असते, असे पक्षच आणीबाणीसारखे पाऊल उचलतात आणि विचारामागे नव्हे, तर व्यक्तीमागे जाण्याचे आवाहन करतात, असेही शहा म्हणाले. देशभरातील सुमारे सोळाशे राजकीय पक्षांपैकी केवळ काहीच पक्ष असे आहेत की जे अंतर्गत लोकशाही आणि विचार यांना सर्वतोपरि मानतात, असा दावाही त्यांनी केला. अडवाणी यांच्याचप्रमाणे शहा यांचे हे उद्गारदेखील नेमके कोणासाठी असा प्रश्न जर कुणी निर्माण केला तर तो अप्रस्तुत ठरु नये. स्वातंत्र्योत्तर काळातील राजकीय नेत्यांचा विचार करता, एकाधिकारशाहीचा आरोप केवळ एकाच व्यक्तीच्या विरुद्ध केला गेला आणि आजही केला जातो व ती व्यक्ती म्हणजे इंदिरा गांधी. पक्ष आणि देशातील जनता यांच्यावर जबर पकड असलेले नेतृत्व म्हणूनही त्यांच्याचकडे बघितले जाते. राजकीय आत्मरक्षणार्थ त्यांनी देशांतर्गत आणीबाणी लागू करुन व्यापक अटकसत्र चालविले व अनेकांची मुस्कटदाबी केली, हा इतिहास आहे व इतिहासाने इंदिरा गांधी यांना या प्रमादाबद्दल तेव्हांही आणि नंतरही माफ केलेले नाही. पण आज त्या पक्षाची अवस्था काय आहे? इंदिरा गांधींच्या निर्घृण हत्त्येनंतर लगेचच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राजीव गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या इतिहासातील सर्वाधिक जागा जिंकण्याचा विक्रम केला. पण त्यांच्या हयातीतच पक्ष घसरणीला लागत गेला. नंतर त्यांचीही हत्त्या केली गेली व तब्बल पाच वर्षे देश आणि पक्ष गांधी घराण्यापासून दूरच होता. कालांतराने सोनिया गांधींच्या हाती पक्षाची सूत्रे गेली व त्यांनी काँग्रेसला सत्तेत आणूनही दाखविले पण ती सत्ता स्वबळावरील नव्हती. अनेक टेकू आणि आधार घेऊन मगच काँग्रेसला सत्तेत येता आले. आजची स्थिती पाहिली तर काँग्रेस पक्ष अत्यंत दु:स्थितीत आहे, असेच म्हणावे लागते. मग तरीही अमित शहा वा अडवाणी यांना काँग्रेसचे आणि त्यांच्याच भाषेत बोलायचे तर घराणेशाहीचे भय वाटावे, हे त्यांच्यातील भयगंडाचेच लक्षण मानावे लागेल. आपण पुन्हा सत्तेत येऊ आणि पक्षावर आपल्या घराण्याची पकड बसवू, असे स्वप्न राहुल गांधी यांनाही कदाचित पडत नसेल. त्याउलट भाजपाची स्थिती आहे. पक्ष आणि विचार यांच्या तुलनेत व्यक्तीला वरचढ स्थान बहाल करु नका, असे सांगणाऱ्या अमित शहांना गेल्याच वर्षी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीचा व तिच्यातील प्रचाराचा इतक्या लवकर विसर पडावा? ती अवघी निवडणूक आणि तिचा प्रचार एकट्या नरेन्द्र मोदी या नावाभोवती फिरत होता. ‘अब की बार (भाजपा नव्हे) मोदी सरकार’ ही घोषणाच त्याचे द्योतक होती. पण हा भाग केवळ निवडणुकीपुरता राहिला नाही. एकाधिकारशाहीचा आणि कुणावरही विश्वास न ठेवण्याचा आरोप भलेही इंदिरा गांधी यांच्यावर होत राहो, पण त्यांचे स्वत:चे असे काही खास विश्वासू सहकारी, सल्लागार आणि मार्गदर्शक होते. त्यांच्यातीलच एकाने म्हणजे सिद्धार्थ शंकर रे यांनी त्यांना आणीबाणी पुकारण्याचा बदसल्ला दिला होता, असेही आता उघड झाले आहे. पण ज्यांना किंवा ज्याला नरेन्द्र मोदी यांच्या विश्वासातील म्हणता येईल, असे एकही नाव लोकांच्या नजरेसमोर येत नाही. म्हणायला मंत्रिमंडळ आहे, पण त्या मंडळाच्या सदस्यांना स्वयंनिर्णयाचा अधिकार नाही. आपण लोकशाही प्रक्रियेतून देशाच्या नेतृत्वपदावर पोहोचलो आहोत, तेव्हां किमान लोकशाहीचा आभास निर्माण करीत रहावे, असेदेखील मोदींना वाटत नाही. अशा स्थितीत हुकुमशाहीने वागणाऱ्या वृत्ती आणि त्यांच्या ताब्यातील पक्ष याविषयी लोकाना भीती घालून देण्याच्या अमित शहा यांच्या वक्तव्यातून एकतर त्यांच्या मनातील भयगंड तरी डोकावत असावा, नाही तर मोदींची वर्षभराची कारकीर्द जवळून अभ्यासल्यानंतर त्यांनाच लागलेला तो आत्मशोध तरी असावा.

Web Title: Amit Shahhah's self-esteem of horror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.