कामात सच्चेपणा ठेवणारा शहेनशहा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 04:58 AM2019-09-26T04:58:12+5:302019-09-26T05:00:00+5:30

एक कलाकार म्हणून मला नेहमी आश्चर्य वाटतं की, त्यांनी हा कामातला खरेपणा इतकी वर्ष कसा काय जपला असेल?

amitabh bachchan the actor who always keeps honesty in his work | कामात सच्चेपणा ठेवणारा शहेनशहा

कामात सच्चेपणा ठेवणारा शहेनशहा

Next

- सुबोध भावे, अभिनेते

अमिताभ बच्चन या महान कलाकाराचं एका वाक्यात वर्णन करायचं झालं, तर आपल्या प्रत्येक कामात सच्चेपणा ठेवणारा कलाकार असंच मला नेहमी वाटत आलंय. समाजात अशी अनेक माणसं असतात की, जी भूतकाळात जगत असतात, पण अमिताभ हा वर्तमान आणि भविष्याचा विचार करून जगणारा माणूस आहे. काल आम्हा सर्व कलाकारांसाठी एक अतिशय सुंदर बातमी आली की, महानायक अमिताभ बच्चन यांना प्रतिष्ठेचा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर झाला. ही भारतीय सिनेसृष्टीसाठी आणि अमिताभ बच्चन या नावाच्या वलयासमोर फिरणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे.



मला मुळातच आठवत नाही, मी त्यांना कुठल्या सिनेमात पहिल्यांदा पाहिलं. दिवार, अग्निपथ, नमकहराम यापैकी कुठल्या सिनेमात त्यांना मी पहिल्यांदा पाहिलं खरंच नाही आठवत, पण त्यांना पहिल्यांदा मी स्क्रीनवर पाहिलं, तेव्हापासून त्यांचं इम्प्रेशन आजही माझ्या मनात तसंच आहे. चिकन्याचुपड्या अभिनेत्रींच्या मालिकेमध्ये न बसणारा, उंच, सावळा असा एक माणूस स्क्रीनवर येतो काय आणि आपल्या देहबोलीने, अदाकारीने सगळी स्क्रीनच व्यापून टाकतो आणि ती छाप केवळ त्या स्क्रीनपुरती मर्यादित राहत नाही, ती तुमच्या मनातही कायमचं घर करून जाते. सुरुवातीला आपण सिनेमा अमिताभ बच्चन यांच्यासाठी पाहत नसतो. तो एक सिनेमा आहे म्हणून आपण पाहत असतो, पण एकदा अमिताभ बच्चन यांची पडद्यावरची अदाकारी सुरू झाली की, आपण नकळत त्यात असे काही अडकून जातो की, तुम्हाला हे कळतच नाही की, या माणसाने आपल्यावर अशी काय जादू केली की, ती आपली पाठ सोडत नाही आणि सातत्याने आपण फक्त व फक्त त्यांचेच सिनेमे पाहायला लागतो.



आनंदमधला डॉक्टर बॅनर्जी असो किंवा जंजीरमधला डोळ्यात संताप असणारा इन्स्पेक्टर असेल, या भूमिका कितीही वेळा सिनेमा पाहा, आपली पाठ सोडत नाहीत. ती सतत आपल्या डोळ्यांमध्ये तरळत राहतात. आपल्या मनात त्या भूमिकेविषयी आपसूक एक आत्मीयता येते. ‘ये पुलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं’ हा संवाद अमिताभ यांच्या तोंडून ऐकण्यासाठी त्या काळच्या व्हीसीआरमध्ये अनेकदा रिवाइंड फॉरवर्ड केल्याची हजार उदाहरणं आपल्याला आठवतील. मुळात प्रेक्षकांना आपला अँग्री यंग मॅन मिळाला, तो अमिताभ बच्चन या कलाकारामुळेच. मुळात तो काळच तसा होता. बेकारी, गरिबीने त्रासलेला भारतीय प्रेक्षक पडद्यावरील अमिताभच्या या खणखणीत अदाकारीने इतका मोहून गेला होता की, अमिताभ बच्चन हा शहेनशहा प्रत्येक भारतीय प्रेक्षकाच्या गळ््यातील ताईत झाला.



अमिताभ बच्चन जे जे पात्र पडद्यावरती रंगवत होते, ते प्रत्येक पात्र आपल्याला तोवर खरं वाटायला लागलं होतं. यात काहीही खोटं नाही, अशी तोपर्यंत आपली एक धारणाही झाली होती. हे कामातलं सातत्य त्यांनी मुळात कुठून आणलं माहीत नाही, पण त्यांचं आपल्या आयुष्यात असणंही तितकंच महत्त्वाचं होतं. आपण सगळे जण त्यांचे चाहते आहोत. त्यांच्या आवाजाचे, त्यांच्या देहबोलीचे, त्यांच्या प्रत्येक व्यक्तिरेखेचे आणि मुळात हा संपूर्ण काळ त्यांचा आहे. तो समाजमनावर आहे, भारतीय चित्रपटसृष्टीवर आहे आणि तो आपण कधीच नाकारू शकत नाही. हा पगडा आपल्या कोणाच्याच मनातून कधीच जाणार नाही. या सर्वोच्च पुरस्कारासाठी त्यांची निवड सार्थ आहे हे पदोपदी जाणवतं. कारण या शहेनशहाने यशाचं अत्युच्च शिखर गाठल्यानंतर ९०च्या दशकात सिनेमातील अपयशही पाहिलं आहे. एबीसीएल या आपल्या कंपनीचं झालेलं वाटोळंही पाहिलेलं आहे. भोगलं आहे, पण फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभारी घेऊन अमिताभ बच्चन या वादळाने सिनेमाच नाही, तर जाहिरात आणि छोट्या पडद्यावरही पुन्हा शून्यातून विश्वनिर्मिती केली, हे त्यांचं किती मोठेपण आहे. सध्याच्या रिअ‍ॅलिटी शोच्या जमान्यात जनसामान्यांच्या नसानसात भिनलेला करोडपतीचा कार्यक्रम आपल्या सहजसुंदर वाणीने आणि वागण्याने त्यांनी घराघरांत पोहोचविला. तेव्हा या सम हाच, ही उक्ती आपल्या मनात अधिकच घर करून जाते.



एक कलाकार म्हणून मला नेहमी आश्चर्य वाटतं की, त्यांनी हा कामातला खरेपणा इतकी वर्ष कसा काय जपला असेल? आजच्या पिढीतल्या दहा ते पंधरा वर्षे काम केलेल्या कलाकाराला एका ठरावीक काळानंतर कामाचा कंटाळा यायला लागतो, पण इतकी वर्षे काम करूनही न कंटाळणारा हा अवलिया कलाकार पाहिला की त्यांचं कौतुक वाटतं. यामागे त्यांच्या आईवडिलांचे आशीर्वाद, त्यांच्यावर लहानपणी झालेले संस्कार कामी आले असतील इतकं मात्र नक्की. त्या संस्कारात आपल्या अभिनयाचे संस्कार मिसळून त्यांनी त्याला कुठे पुसू दिलं नाही आणि अन्य खोटा-खोटा अभिनय करणाऱ्या कलाकारांच्या मांदियाळीत स्क्रीनवरची आपली प्रत्येक व्यक्तिरेखा तितक्याच तन्मयतेने प्रेक्षकांसमोर उभी केली.

आज त्यांना अतिशय सन्मानाचा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर झाल्यावर मनात पहिली गोष्ट हीच आली की, हे आमच्या सर्व कलाकारांचं शक्तिस्थान आहे. हेच आमचे जय, अ‍ॅन्थॉनी आहेत. हेच आमचे खुदा गवाह आहेत...बच्चन साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

Web Title: amitabh bachchan the actor who always keeps honesty in his work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.