वाचनीय लेख - AI मुळे खुद्द अमिताभ बच्चनच हादरतात, तेव्हा..
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 05:02 AM2023-05-08T05:02:11+5:302023-05-08T05:03:23+5:30
अमिताभ यांनी सहज म्हणून आपल्या आवाजाचा नमुना एआयला दिला आणि या तंत्रज्ञानाने तत्काळ त्यांना ओळखून त्यांचेच एक चित्र तयार करून त्यांना दिले!
- दीपक शिकारपूर, उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक
“मी फक्त माझ्या आवाजाचा नमुना दिला आणि हे पाहा आर्टिफिशियल इंटेलिजन्सने चक्क माझा फोटोच काढून दिला! हे तंत्रज्ञान भविष्यात काय काय करामती करणार आहे, याची भीतीच वाटते” - खुद्द अमिताभ बच्चन यांना एआयने दिलेला हा धक्का सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. अमिताभ यांनी सहज म्हणून आपल्या आवाजाचा नमुना एआयला दिला आणि या तंत्रज्ञानाने तत्काळ त्यांना ओळखून त्यांचेच एक चित्र तयार करून त्यांना दिले.
- यासारखे थक्क करणारे, भीती वाटायला लावणारे अनुभव आता आपल्या सर्वांनाच येऊ घातले आहेत. सोशल मीडियावरची सायबर गुन्हेगारी आपल्याला नवीन नाही. याचीच पुढील आवृत्ती म्हणजे फेक न्यूज. अशा बातम्यांना मसाला व्हॅल्यू उर्फ टीआरपी जास्त असल्याने सोशल मीडियावर त्या अतिशय झपाट्याने पसरतात. याचीच अजून पुढची पायरी म्हणजे फेक व्हिडीओ. समाजमाध्यमांमार्फत ‘व्हायरल’ झालेल्या फोटो किंवा व्हिडीओवरून गैरसमज होऊन त्यातून भांडणे, हिंसाचार , खटले आणि अगदी दंगली उद्भवणे आता नवीन राहिलेले नाही. आपण पाहिलेला फोटो किंवा व्हिडीओ अस्सल आहे की, मॉर्फिंग केलेला म्हणजे संगणकीय साधने वापरून सोयीस्कररीत्या कट - पेस्ट केलेला आहे, याची खात्री न करताच त्याला पाठिंबा किंवा विरोध करण्याच्या हालचाली सुरू केल्या जातात.
खरेतर, ‘फेक’ की ‘रिअल’ याची खात्री करण्याची सुविधा फुकट देणारी अनेक ॲप हाताशी असतानाही आपण तसे न करता घातक व चुकीचे कृत्य करून मोकळे होतो... वर्णनावरून चित्र काढण्याचे जे कौशल्य आपल्यातील काहींमध्ये असते, त्याचाच हा अधिक उच्च पातळीवरचा तांत्रिक आविष्कार आहे! सोशल मीडिया, विविध ॲप्स, ओटीटी फार काय टीव्हीवरदेखील दाखवली जाणारी दृश्ये किंवा प्रसंग त्यांच्या मूळ रुपात असतीलच याची कोणतीही खात्री प्रेक्षकांना मिळू शकणार नाही... पण, येत्या काही दशकांत हा प्रकार वाढत जाण्याचीच शक्यता आहे. कारण असे व्हिडीओ बनवण्यातला एआय (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) उर्फ कृत्रिम बुद्धिमत्तेचा सहभाग वेगाने वाढत असल्याने, दाखवली जाणारी बाब खरी की खोटी, हे ओळखणे जवळजवळ अशक्य बनणार आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉं अश्रुधुरातून मार्ग काढत धावतानाचा एक फोटो मध्यंतरी सर्वत्र पसरला. असे काही घडल्याचे, याबाबत वाचल्याचे आठवत नाही ना? नाहीच आठवणार, कारण असे काही घडलेलेच नाही! हा फोटो संगणकावर एआयने बनवलेला होता. एआयवर आधारित मिडजर्नी नावाचे सॉफ्टवेअर. त्याला पुरवलेल्या मजकुरावरून (टेक्स्ट प्रॉम्प्ट) प्रतिमा तयार करू शकते... आणि त्या प्रतिमा हुबेहूब असतात.
‘चॅट जीपीटी’ चे उदाहरण घ्या. चॅट जीपीटी हे भाषेवर आधारित एक एआय सॉफ्टवेअर आहे. त्याला भाषा आणि शब्दप्रयोगांतील बारकावे व छुपे अर्थही चांगलेच समजतात. चॅट जीपीटीसारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेला तितक्याच दर्जेदार आणि अचूक ऑडिओ - व्हिडीओची जोड मिळल्याने, असे व्हिडीओ किंवा फोटो मूळचेच तसे आहेत, की बनवलेले आहेत हे सांगणे दिवसेंदिवस मुश्किल होत जाणार आहे.
परिणामी सत्य लपवणे, ते वेगळ्या रूपात दाखवणे किंवा स्वतःला सोयीचा असेल तेवढाच भाग सांगणेही अगदी सहजशक्य होईल. नीतिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान ही बाब शालेय, महाविद्यालयीन शिक्षणात अंतर्भूत करायची हीच वेळ आहे.