अमितभार्इंचे दिवाळी गिफ्टचे पार्सल दिल्ली नव्हे तर अहमदाबादेतून धाडल्याचे कन्फर्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:11 AM2017-10-23T00:11:29+5:302017-10-23T00:11:41+5:30
अमित भार्इंनी मराठीभूमीत खास दिवाळी गिफ्ट आणि फक्त खास माणसांसाठीच पाठवल्याची बातमी वा-यासारखी पसरली. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या अनेक झेलक-यांची धांदल सुरू झाली.
- राजा माने
अमित भार्इंनी मराठीभूमीत खास दिवाळी गिफ्ट आणि फक्त खास माणसांसाठीच पाठवल्याची बातमी वा-यासारखी पसरली. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या अनेक झेलक-यांची धांदल सुरू झाली. अमितभार्इंचे ते गिफ्ट नक्की दिल्लीतून आले असेल की अहमदाबादमधून? याचा शोध लावण्यासाठी कोकणातून विशेष यंत्रणा कार्यरत केली गेली. अखेर त्या यंत्रणेला यश आले. अनेक बाऊन्सरनी ही मोहीम फत्ते केली! अमितभार्इंचे दिवाळी गिफ्टचे पार्सल दिल्ली नव्हे तर अहमदाबादेतून धाडल्याचे कन्फर्म झाले. ज्यांना ते धाडले आहे त्यांची यादी आपल्या खिशात टाकण्यातही कोकणनरेशांना यश आले होते. त्या यादीत देवेंद्रभाई, चंद्रकांतदादा आणि खान्देशनरेश गिरीश यांचेही नाव नाही, हे बघून कोकणनरेश थोडे भांबावले होते. त्यात यादीत अजितदादा आणि अशोकरावांची नावे पाहून तर ते चक्रावलेच! पार्सल तर रवाना झाले. मग आपल्याला मिळाले कसे नाही? कोकणातल्या ‘परिवारा’ने कुरियरवाल्यालाच मॅनेज तर केले नसेल ना? असा विचारही त्यांच्या मनात आला. पण कोकणनरेश ज्युनिअर १ व ज्युनिअर २ यांनी मोठ्या कॉन्फिडन्सने तो धुडकावून लावला. अशाच अनेक शंकाकुशंका वारणानगरपासून नागपूरपर्यंत अनेक शिस्तप्रेमी कार्यकर्त्यांत व्यक्त होऊ लागल्या. ‘आम्ही आयुष्यभर संघ, दक्ष म्हणत राहायचे अन् अमितभार्इंचे दिवाळी गिफ्ट मात्र कालपरवाच्यांनाच!’ असा सूरही अनेकांनी पकडला. हे वातावरण तापत असतानाच पार्सल मराठीभूमीत ज्या-त्या ठिकाणी पोहोचले. पार्सल कसले, ते केवळ खाकी पाकीटच निघाले! कोकणनरेशांनी मोठ्या उत्सुकतेने ते उघडले, त्यात एक पत्र निघाले. पत्रात एवढेच लिहिले होते, ‘दादा, तूर्तास कोंबड्यांचा बिझनेस चालू ठेवा. कॅबिनेटचे नंतर बघू!’ मराठीभूमीत आलेल्या अशाच इतर लखोट्यातील मजकुराचा शोध पत्रकारांनी लावला. त्यात प्रत्येकाला ‘दिवाळी शुभेच्छा आणि प्राणिमात्रांवर प्रेम करा’ असाच संदेश होता. अजितदादांचे ‘गांडूळ प्रेमाबद्दल’ विशेष अभिनंदन करण्यात आले होते. अशोकरावांना नांदेडनगरी पर्यावरणप्रेमी बनविण्याचा सल्ला दिला होता. तर सोलापूरच्या बापूंना ‘मालक’ विजयकुमारांशी जमवून घेण्याचा कानमंत्र दिला गेला. उर्वरित लखोटे अजून सीलबंद आहेत...