‘आपल्या माणसा’चा अमृत महोत्सव

By Admin | Published: December 12, 2015 12:09 AM2015-12-12T00:09:13+5:302015-12-12T00:09:13+5:30

शरद पवार आज ७५ वर्षांचे होत आहेत. मराठी मन, महाराष्ट्र व त्यातल्या पुरोगामी चळवळींना बळ व ऊर्जा पुरविणारा हा नेता त्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करता झाला तरी त्याच्यात

Amrut Mahotsav of 'Man Man' | ‘आपल्या माणसा’चा अमृत महोत्सव

‘आपल्या माणसा’चा अमृत महोत्सव

googlenewsNext

शरद पवार आज ७५ वर्षांचे होत आहेत. मराठी मन, महाराष्ट्र व त्यातल्या पुरोगामी चळवळींना बळ व ऊर्जा पुरविणारा हा नेता त्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करता झाला तरी त्याच्यात व आपल्यात जराही अंतराय आल्याचे मराठी माणसाला पूर्वीएवढेच आजही वाटत नाही. ‘आपला माणूस’ ही त्यांची मराठी मनातील प्रतिमा पूर्वीएवढीच आजही उजळ राहिली आहे. कधी ते जवळचे वाटले, कधी त्यांचा राग आला, कधी त्यांचे कौतुक वाटले तर कधी त्यांच्यावर टीका कराविशी वाटली. मात्र यातल्या कोणत्याही प्रसंगी ते आपल्यापासून दूर आहेत असे मराठी माणसाना कधी वाटले नाही. राजकारण, समाजकारण आणि व्यक्तिगत संबंध यांची क्षेत्रे त्यांनी नेहमीच वेगळी मानली आणि त्यांच्या सीमा त्यांनी कमालीच्या सहजपणे सांभाळल्या. महाराष्ट्राएवढेच त्यांना हे राष्ट्रीय जीवनातही जमले. त्यामुळे दिल्लीत होणाऱ्या त्यांच्या अमृत महोत्सवी सत्काराला सत्ताधाऱ्यांपासून विरोधकांपर्यंतचे सारे राष्ट्रीय व प्रादेशिक नेते हजर होत असलेले दिसले. मोदींपासून सोनिया गांधींपर्यंतच्या साऱ्यांशी, जेथे वैर करायचे तेथे त्यांनी वैर केले आणि जेथे मैत्र साधायचे तेथे तेही साधले. यातली त्यांची दृष्टी सदैव देश व समाज यांच्या हिताची राहिली. यशवंतरावांचे मानसपुत्र मानले गेलेले शरदराव इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनाही त्यांचे वाटले. जोतिबांपासून दलवाईपर्यंतच्या सुधारकांना आपले मानणारे पवार आताच्या ममता-जयललिता-फारुक अब्दुल्ला आणि उद्धव व राज ठाकऱ्यांनाही त्यांचे वाटले. कोणताही निर्णय योग्य वेळी अचूकपणे घेणे व त्यासाठी साऱ्यांना काही काळ संभ्रमात ठेवता येणे त्यांना जमले. मात्र आपल्या प्रत्येक निर्णयामागे ठामपणे उभे राहत असतानाच आपले सहकारीही आपल्यासोबत राहतील याची काळजीही त्यांनी घेतली. वयाच्या ३८ व्या वर्षी महाराष्ट्राचे बहुपक्षीय मुख्यमंत्रीपद हाती घेऊन ते यशस्वी करताना त्यांनी जो संयम व मुत्सद्दीपणा दाखविला तोच त्यांनी राष्ट्रीय राजकारणातही कायम राखला. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या पवारांनी केंद्रात संरक्षणापासून कृषीपर्यंतची महत्त्वाची मंत्रिपदेही यशस्वी केली. स्वत:बाबत सदैव नि:शंक असलेल्या पवारांना या सबंध काळात कुणी गृहीत मात्र धरू शकले नाही. मात्र गृहीत धरता येत नसले तरी साऱ्यांना आधार त्यांचाच वाटत राहिला. ते चालत नाहीत आणि त्यांच्यावाचूनही चालत नाही, असेच त्यांचे राजकारणातले वागणे राहिले. अनपेक्षित आणि अचूक निर्णय घेणाऱ्या पवारांमध्ये कोणतीही मोठी जबाबदारी तिच्यातल्या जोखमीसह पत्करण्याची तयारी सदैव राहिली. ती पत्करताना त्यांनी आपल्या जवळच्यांना प्रसंगी दुखावलेही आहे. मात्र त्या जबाबदारीचे त्यांनी सोने केल्याचा त्या नाराजांना नंतर अभिमानही वाटला आहे. यशवंतरावांशी ते विश्वासाने वागले नाहीत असा एक आरोप त्यांच्यावर आहे. सोनियांशी दुरावा करताना त्यांनी काँग्रेसची नाराजी ओढवून घेतली हेही खरे आहे. पुलोदचे मुख्यमंत्रीपद स्वीकारताना त्यांनी स्वपक्षाचा रोष असाच ओढवून घेतला. मात्र त्या साऱ्या तेढीच्या काळातही ते ताठ राहिले आणि नव्यांएवढेच जुन्या सहकाऱ्यांनाही ते कुठेतरी आपलेच वाटत आले. आजच्या फडणवीसांनाही ते वैरी वाटत नाहीत आणि उद्धव व राज यांनाही ते आपलेच वाटतात. राष्ट्रवादी हा त्यांचाच पक्ष आहे पण काँग्रेसनेही त्यांच्याविषयीची आत्मियता (व आशा) अजून कायम ठेवली आहे. ते मोदींशी सल्लामसलत करतात आणि राहुल गांधींशीही बोलत असतात. या राजकारणी माणसाचे सुसंस्कृत असणे हे त्याच्या या यशाचे महत्त्वाचे कारण आहे. बाळासाहेब ठाकऱ्यांना मातोश्रीवर जाऊन भेटण्यात, मृणाल गोऱ्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेण्यात किंवा कवी, साहित्यिक व विचारवंतांशी मतभेद राखूनही मैत्र करण्यात त्यांना कधी अडचण आली नाही. त्यांच्यातल्या औदार्याने त्यातल्या अनेकांना प्रसंगी संकोचूनही टाकले आहे. साऱ्यांसाठी जमेल ते सारे करावे पण त्याची साधी वाच्यताही कधी करू नये हा त्यांच्या व्यक्तित्वाचा आणखी एक विशेष आहे. मुंबईतील काँग्रेसचे एक नेते मृत्यू पावले असताना त्यांना अखेरचे पाहाण्याची इच्छा असणाऱ्या त्यांच्या मैत्रिणीला त्यांच्या शवाजवळ स्वत:सोबत नेऊन साऱ्यांना त्यांच्या भुवया उंचावायला लावण्याचे साहसही त्यांना जमणारे होते. जबर आत्मविश्वासाच्या जोरावर दुर्धर व असाध्य रोगाला पराभूत करण्याचा पराक्रमही त्यांच्या नावावर आहे. तात्पर्य, कोणालाही आपलासा वाटावा आणि तरीही मनाच्या एखाद्या कोपऱ्यात त्याचा राग असावा असा हा नेता आहे. त्याचे प्रादेशिकपण आता लोपले आहे. आसामपासून गुजरातपर्यंत आणि काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत त्यांचे मित्र सर्वत्र व सर्व पक्षात आहेत. देशात कधीकाळी सर्वपक्षीय सरकार स्थापन झालेच तर त्याचे पंतप्रधानपद सहजगत्या त्यांच्याकडे यावे एवढी राष्ट्रीय मान्यता त्यांना आहे. अमृत महोत्सवी मुहूर्तावर त्यांना कोणत्या शुभेच्छा द्यायच्या? त्यांच्या महत्त्वाकांक्षा खऱ्या ठराव्या, त्यांच्या हातून देशाची आणखी सेवा घडावी आणि आपल्या व त्यांच्या संबंधात कधी अंतराय येऊ नये अशी सदिच्छाच अशावेळी व्यक्त करायची. त्यांना आरोग्यसंपन्न व सेवामय दीर्घायुष्य लाभावे ही प्रार्थनाही अशाचवेळी करायची.

Web Title: Amrut Mahotsav of 'Man Man'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.