अमृताचा घनु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2017 01:23 AM2017-06-25T01:23:52+5:302017-06-25T01:23:52+5:30
ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांनी लिहिलेल्या ‘मनातली माणसं’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अलीकडेच पार पडला.
ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांनी लिहिलेल्या ‘मनातली माणसं’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अलीकडेच पार पडला. ज्येष्ठ साहित्यिका आणि मराठी विश्वकोश मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. विजया वाड यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. राधाकृष्ण नार्वेकर यांनी रेखाटलेल्या त्यांच्या मनातील व्यक्तिंच्या शब्दचित्रांबद्दल, तसेच त्यांच्या जीवनानुभवांच्या गाठोड्याची डॉ. विजया वाड यांनी प्रस्तावनेत घेतलेली ही नोंद. अगदी नार्वेकरांच्या गुणसमुच्चयाचीही ओळख पटवून देणारी.
अजातशत्रू, जगन्मित्र, प्रेमळ, विश्वासू, जिगरबाज आणि अत्यंत निर्मळ ही सारी विशेषणे ज्यांना लागू पडतात, असे राधाकृष्ण नार्वेकर ओठांतून बोलतात, तेव्हा ते पोटातून आलेले असते. शब्द उतरतात ते दिलातून, तिथून थेट कागदावर आपली मोहोर उमटवितात. जगात फार मोजकी माणसे इतका गुणसमुच्चय बाळगतात, म्हणून राधाकृष्णांना ‘अमृताचा घनु’ म्हणावेसे वाटते. ‘मनातली माणसं’ हे त्यांचे नवे कोरे पुस्तक म्हणजे, जीवनानुभवांचे एक विलोभनीय गाठोडे आहे. वाचायला घेतले, तेव्हा मी कितीदा डोळे पुसले, कितीदा गहिवरले, याचा हिशेब मला नाही मांडता येणार. एकेक शब्दचित्र ‘घरंदाज’ आहे, ‘फुल्लोर’ आहे, ‘जिवंत झरा’ आहे आणि ‘अमृताचा घनु’ आहे.
आपल्या घरात डोकावताना ते स्वत: हळवे होतात. ‘बाप्पां’ना रंगवताना स्वत: त्या शब्दरंगात माखून निघतात. त्यांच्या अंगावर गुळाचे पाणी ओतून त्याला बांधून ठेवणे ही शिस्त! एखादा ‘हुमल्यांचा घरटा’ त्याच्या अंगावर सोडणे ही शिक्षा! मग आवडामावशीचा ‘बाप्पाला ओरडा खावा लागणं’ हा शिरस्ता! छोट्या राधाकृष्णास मग खांबापासून सोडवून, पाणी ओतून, टॉवेलाने पुसून स्वत:च्या हाताने तेल थपथपणे हे बाप्पांचे स्वयंशासन. वाचता-वाचता तो सारा अनुभव मनाला इथे-तिथे जखमी करीत राहातो. पोरका पोर सांभाळताना खोड्यांनी तो बिघडू नये, म्हणून चुलता शिस्त लावायला जातो नि हुमल्यांच्या ‘चावखुणा’ पुसायला बापाच्या मायेने तेलूमालू करतो, तेव्हा जुना काळ चित्रपटासारखा डोळ्यांत सामावतो आणि मनभर पसरतो. बाप्पांचे शब्दचित्र हे या साहित्यातील ‘बाजूबंद’ ठरावा.
आवडामावशी तर इतकी आवडावी की, प्रत्येकास वाटावे, अशी एक मावशी-आजी आपल्या घरी नक्की असावी. नळाच्या तोटीतून मोठी धार धबाधबा बादलीत पडावी नि बादली पाहता-पाहता गच्च भरावी, तशी तिची धबाधबा माया. त्याला शब्दांचे कुंपण. कधी काटेरी, कधी फुलगच्च. आवडामावशी थकल्यावर ‘कोंबडीची सागुती’ मागणाऱ्या राधाकृष्णांना, ती तिच्या खास ‘आरोंदी’ भाषेत सांगते, ‘आज करू या मरे. कोंबडी मात्र तू मार. माका आता कोंबडी मारूक आणि कापूक जमाचा नाय, पण तू सुटा करून दिलेस, तर मी सूनबाईकडून करून घेतंय.’
पण त्या सागुतीला राधाकृष्णांनी, ‘मावशे, तुझ्या हातची चव येवक नाय,’ म्हटले की, ती प्रेमाने जवळ घेऊन म्हणणार, ‘गुंड्या, असा म्हणा नये. समोर इला ता गोड मानून खावचा. म्हणजे आपोआप गोड लागता.’
माच मावशीची थकिस्त सफर मागते काय गुंड्याजवळ? एक परसातला संडास! बाहेर जायला पावलं थकली, म्हणून ‘हाव’ आणि ‘सोस’ नसलेली प्रेमनिर्झर माणसे आयुष्य श्रीमंत करतात नि मनात कायमची बंदिस्त होतात. अशा अजोड मायेला मी या साहित्यातील ‘वाकी’ म्हणेन.
‘सोन्यासारखा भाऊ’ म्हणजे बाप्पांचे -विठ्ठल रवळूशेट नार्वेकर यांचे चिरंजीव. सदाशिव विठ्ठल नार्वेकर चुलतभाऊ, पण ‘चुलतेपण जावे विरघळोनी, आपुलेपण ओघळावे भरभरोनी’ असा सारा मामला. मुंबईत राधाकृष्णांची सात-आठ माणसांनी भरलेल्या खोलीत पहिली सोय कोणी केली? भाऊंनी! शालांत परीक्षेत ६० टक्के गुण मिळविणाऱ्या गुंडूच्या हातावर दहाची नोट कोणी ठेवली? भाऊंनी! शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च विनातक्रार कोणी उचलला? अर्थात, भाऊंनीच! हे शब्दचित्र म्हणजे या साहित्यकृतीचा ‘चंद्रहार’.
निळुभाऊ उर्फ नीळकंठ खाडिलकर यांनी पत्रकार म्हणून राधाकृष्णांना खरोखर घडविले. एखाद्या सभेचा ‘आँखो देखा हाल’ कसा टिपावा, लोकांच्या समोर ती कशी चित्रदर्शी उभी करावी, हे निळुभाऊंनी त्यांना शिकविले. न भीता एखाद्या घटनेस कसे भिडावे, याचे उत्तम ‘बाळकडू’ निळुभाऊंनी राधाकृष्णांना दिले. ते साक्षात नजरेत सामावतात.
‘अनाथांचा नाथ’ असे शीर्षक असलेला बॅरिस्टर नाथ पै यांच्यावरील विस्तृत लेख कोकणच्या या हिऱ्याचे सारे पैलू उलगडून दाखवितो. बॅरिस्टर नाथ पै यांच्यातले माणूसपणाचे कंगोरे मनाला मोह घालतात. सामान्य माणसांसाठी तळमळणारे त्यांचे हृदय, टीकास्त्र उचलताना, परजताना, शरसंधान करताना, अंगी असलेला निर्भयपणा... वा, नार्वेकरांचे हे बॅरिस्टर नाथ पै यांचे शब्दचित्र म्हणजे, या पुस्तकाचा कंठमणी आहे.
‘महाराष्ट्राचा भाग्यविधाता’ हा यशवंतराव चव्हाण यांच्यावरील लेख केवळ अप्रतिम! १९७७-७८ला राधाकृष्ण ‘मुंबई मराठी पत्रकार संघा’चे अध्यक्ष होते. तेव्हा लोणावळा येथे विश्रामगृह बांधावे, ही पत्रकार संघाची इच्छा त्यांनी यशवंतरावांजवळ कशी बोलून दाखविली आणि शरद पवारांच्या अपूर्व सहकार्याने ती कशी पूर्ण झाली, हा किस्सा मोठा रोचक आहे. वाचकांनी तो मुळातूनच वाचायला हवा.
आपल्या समाजाला एखादा महत्त्वाचा संदेश द्यायचा असेल, तर आपली कृती त्यास सुसंगत असली पाहिजे, म्हणून जाणीवपूर्वक ‘एकच मुलगी’ हे पत्नीसह आपले कुटुंब ठेवणारे शरद पवार, महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा म्हणून सदैव लक्षात राहिलेले शरद पवार, महिला सबलीकरणासाठी अथक प्रयत्न करणारे शरद पवार, शिक्षण आणि श्रम यांवर असाधारण विश्वास ठेवणारे शरद पवार असे विविधांगी कॅलिडोस्कोपिक शब्दचित्र म्हणजे या पुस्तकाची ‘मेखला’ आहे.
बाळासाहेबांची ‘मुलाखत’ रोचक आणि हृदयस्पर्शी झाली आहे. हिंदुहृदयसम्राटांचे शब्दचित्र भावनेने ओथंबलेले तर आहेच, पण बाळासाहेबांची जीवनशैली अचूक टिपणारे आहे, तसेच दिलखुलास चित्र विलासराव देशमुखांचेही.
‘स्वत:ला घडवणारा माणूस’मध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्याबद्दल ते म्हणतात, ‘अगदी जन्मापासून आयुष्यभर प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत, स्वत:ची पात्रता सिद्ध करत देशाच्या उच्च व उच्चतर स्थानावर आरूढ होणारा, या देशातील एकमेव राजकीय नेता कोण? असे विचारले, तर या प्रश्नाला सुशीलकुमार शिंदे याशिवाय दुसरे नाव सांगता येणार नाही. मुळातले ‘दगडू’ हे नाव त्याने ‘सुशील’ कसे केले, ती कहाणी फारच रोचक आहे. मुळातूनच वाचा, प्रिय वाचकांनो!