अम्मांची तब्येत

By admin | Published: October 13, 2016 01:29 AM2016-10-13T01:29:25+5:302016-10-13T01:29:25+5:30

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता ‘अम्मा’ यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचे गूढ दिवसेंदिवस वाढत चालले असून आता त्याला काही नवनवे फाटेदेखील फुटू लागले आहे

Amy's health | अम्मांची तब्येत

अम्मांची तब्येत

Next

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता ‘अम्मा’ यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचे गूढ दिवसेंदिवस वाढत चालले असून आता त्याला काही नवनवे फाटेदेखील फुटू लागले आहे. मुळात दक्षिणेकडील राज्ये आणि त्यातल्या त्यात तामिळनाडू राज्य एकूणातच भडकपणासाठी प्रसिद्ध. मध्यंतरी जयललिता यांना भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यासाठी तुरुंगवास झाला तेव्हां काही अम्माभक्तांनी पटापटा आत्महत्त्या केल्या होत्या तर शेकडो लोक छाती पिटून शोक व्यक्त करीत होते. आपल्या नेत्यावर इतके अचरट प्रेम करण्यात त्या राज्यातील लोकांचा हात अन्य कोणत्याही राज्यातील लोक धरु शकणार नाही हे वास्तव असल्याने गेल्या जवळजवळ वीस दिवसांपासून अम्मा रुग्णालयात आहेत म्हटल्यावर तिथे काय होऊ शकेल वा शकते याची कल्पनाच केलेली बरी. अम्मांवर उपचार करणारी डॉक्टर मंडळी ‘प्रकृती सुधारत आहे व अम्मा उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत’ इतकेच जाहीर करीत आहेत. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यास गेलेल्या अन्य पक्षांच्या काही राष्ट्रीय नेत्यांनीदेखील तसेच जाहीर केले आहे. पण लोकांचा त्यावर विश्वास बसला नाही म्हणून म्हणा वा अन्य काही कारणांनी म्हणा, काही उपद्व्यापी लोकांनी समाज माध्यमांचा उपयोग करुन अम्मांच्या तब्येतीविषयी नाना प्रकारच्या बातम्या पेरण्यास सुरुवात केली. त्याची तेथील पोलिसांनी अगदी शीघ्रतेने दखल घेऊन एव्हाना ४३ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत व दोघांना तर चक्क अटकदेखील केली आहे. याच सुमारास अम्मांच्या अद्रमुक पक्षाचा हाडाचा प्रतिस्पर्धी वा वैरी असलेल्या करुणानिधी यांच्या नेतृत्वाखाली द्रमुकने राज्याला तूर्तातूर्त तरी पर्यायी मुख्यमंत्री मिळावा म्हणून मागणी करण्यास सुरुवात केली. याचा अर्थ जयललिता यांच्या तब्येतीविषयी संबंधित रुग्णालय आणि काही राष्ट्रीय नेते जे सांगतात त्यावर लोकांचा विश्वास नसावा आणि जोवर त्यांना अम्मा दर्शन होत नाही तोवर तो बसेल अशी शक्यताही नाही. त्यातच द्रमुकने पर्यायी मुख्यमंत्र्याच्या मागणीचा सतत धोशा लावल्याने अखेरीस राजभवनने (अर्थात अद्रमुकच्या सल्ल्यानुसार) ओ. पनीरसेल्व्हम यांच्याकडे अम्मांकडील सर्व खाती सुपूर्द केल्याचा हुकुम जारी केला. याचा अर्थ ते पर्यायी मुख्यमंत्री झाले असे मात्र नव्हे. मुख्यमंत्री अम्माच राहाणार. जयललिता यांना कर्नाटकातील तुरुंगात जेव्हां जावे लागले तेव्हां याच पनीरसेल्व्हम यांच्याकडे त्या राज्याची सूत्रे अधिकृत मुख्यमंत्री म्हणून गेली होती. पण त्यांनी भरताने जसे रामराज्य चालवले तसेच अम्मांचे राज्य चालवले होते. देश पातळीवर गुलझारीलाल नंदा जसे कायम पर्यायी वा खरे तर हंगामी पंतप्रधान म्हणून नावाजले तसेच हे गृहस्थदेखील पर्यायी मुख्यमंत्री म्हणून नावाजले जातील असे दिसते. नेत्याविषयी आदर असावा, नव्हे तो असलाही पाहिजे. पण तामिळनाडूमधील दोन्ही पक्षांच्या नेत्यांविषयी त्यांच्या समर्थकांच्या मनात जी भावना दिसून येते, तिला कोणत्याही कोंदणात बसविणे अवघडच नाही तर अशक्यच आहे.

Web Title: Amy's health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.