कार्यकर्त्याला आमदार होण्याची स्वप्ने, त्याचाच परिणाम गुणवत्ता नसलेल्या भारंभार उमेदवारांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 08:39 AM2024-10-31T08:39:49+5:302024-10-31T08:40:19+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : सध्या चालू असलेल्या निवडणुकीचे एक वेगळे वैशिष्ट्य की, दोन आघाड्यांमध्ये ही निवडणूक होत आहे. दोन्ही बाजूंनी प्रत्येकी तीन पक्ष आहेत.

An activist dreams of becoming an MLA, resulting in a rush of unqualified candidates | कार्यकर्त्याला आमदार होण्याची स्वप्ने, त्याचाच परिणाम गुणवत्ता नसलेल्या भारंभार उमेदवारांची गर्दी

कार्यकर्त्याला आमदार होण्याची स्वप्ने, त्याचाच परिणाम गुणवत्ता नसलेल्या भारंभार उमेदवारांची गर्दी

Maharashtra Assembly Election 2024 : ‘उदंड झाली लेकुरे’ असे म्हटले जाते. तसे महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या चौदाव्या निवडणुकीत भारंभार उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यापैकी २८८ जण निवडून येणार असले, तरी हुशार, चाणाक्ष, दक्ष आणि उत्तम संसदपटू पुढे येतील, हा यक्षप्रश्नच आहे. १९६२ मध्ये महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक झाली तेव्हा एकूण ११६१ उमेदवार रिंगणात होते. शेवटची निवडणूक २०१९ मध्ये झाली तेव्हा चार वाढीव मतदारसंघांसह २८८ मतदारसंघांत ३२३८ उमेदवार रिंगणात होते. सध्या चालू असलेल्या निवडणुकीचे एक वेगळे वैशिष्ट्य की, दोन आघाड्यांमध्ये ही निवडणूक होत आहे. दोन्ही बाजूंनी प्रत्येकी तीन पक्ष आहेत. आघाडी किंवा महायुतीमधील घटक पक्षांना २८८ मतदारसंघ वाटून घेतानाच दम लागला. लोकसभा निवडणुकीत देखील अशीच गत झाली होती. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत उमेदवार आणि त्यांचे पक्ष निश्चित होत नव्हते. त्याचा फटका उमेदवारांना प्रचाराला अपुरा वेळ मिळाल्याने बसला.

मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली तरी महायुती आणि महाआघाडीचे उमेदवार जाहीर होत होते. अनेक उमेदवारांना अखेरच्या क्षणात एबी फॉर्म पक्षांकडून मिळाले. नाशिकच्या दोन उमेदवारांसाठी खास विमानाने उमेदवारी अर्ज पाठवून द्यावे लागले तरीदेखील महायुतीचे २८४ आणि महाआघाडीचे २८६ उमेदवार जाहीर करून उर्वरित मतदारसंघ मित्रपक्षांचे आहेत, असे सांगावे लागले. अनेक मतदारसंघांत आघाडी किंवा महायुतीमधील जागावाटप करताना गोंधळ झाल्याने मित्रपक्षांचेच उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. पुन्हा एकदा आघाडी, तसेच महायुतीच्या नेत्यांना बैठका मारून एकमेकांविरुद्धच्या मित्रपक्षांना विनवण्या कराव्या लागणार आहेत. दिवाळीचे चार दिवस त्यातच निघून जाणार आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अखेरची मुदत सोमवार, दि. ४ नोव्हेंबर आहे. राज्यातील २८८ मतदारसंघांत ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. राजकारणाची वैचारिक घसरण झाली आहे. आयाराम-गयाराम आमदारांची चर्चा व्हायचे दिवस मागे पडले आहेत.

भूमिका, विचार, पक्षनिष्ठा सारे काही खुंटीला बांधून ठेवून घाऊक पातळीवर पक्षांतर महाराष्ट्रातील जनतेला पाहावे लागले. राज्यस्तरावरचा दर्जा सुधारण्याऐवजी घसरत चालला आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून उद्याच्या महाराष्ट्राला कोणत्या प्रकारचे राज्यकर्ते मिळणार, याची चिंता करावी अशीच परिस्थिती आहे. पक्षाचा आधार घेऊन राजकारण करणारे उमेदवारी न मिळाल्याने एका रात्रीत पक्ष बदलतात आणि त्याच पक्षाला शिवीगाळ करायला सुरुवात करतात. वास्तविक ही महाराष्ट्राची रीत नव्हती. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला राजकीय सार्वजनिक जीवनमूल्यांच्या तसेच विचारांच्या आधारे एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. असेच अनेक प्रांतांत नेते आणि मुख्यमंत्री होते. पक्ष संघटनांची पकड होती, शिस्त होती. वरिष्ठ-कनिष्ठ असा विचार होत असे. वैचारिक दिशा, रचनात्मक काम यांचीही नोंद घेतली जात असे.

आता या साऱ्या गोष्टी पातळ झाल्या आहेत. नेतेमंडळीच सांगतात की, निवडून येण्याची क्षमता  पाहून उमेदवार निवडले जातील. निवडून येण्याची क्षमता पक्षाचे संघटन किंवा बैठक यावर न ठरविता उमेदवाराची सांपत्तिक स्थिती कशी आहे, याचा सर्वप्रथम विचार होऊ लागला तसे राजकारणाचा दर्जाच घसरत गेला. याला काही डाव्या पक्षांचे अपवाद सोडले तर सारे सारखेच झाले आहेत. कालचा ‘भारत जोडो’ म्हणणारा नेता किंवा कार्यकर्ता गळ्यात नवे उपरणे घालून ‘जय श्रीराम’ म्हणायला लागताे. वास्तविक, प्रत्येकाला स्वातंत्र्य असते. वैचारिक मतांतरे होऊ शकतात. मतपरिवर्तन होऊ शकते. मात्र, केवळ उमेदवारीसाठी कोणत्याही पक्षात प्रवेश केला जातो. अलीकडच्या काळात मतदारसंघ किंवा पक्षाचा आमदार पाहून विकासकामांच्या नावाखाली निधी देण्याचा प्रकार सुरू झाला आहे.

संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाच्या नियोजनानुसार निधीचे वाटप न करता व्यक्तिगत पातळीवर निधी दिला जातो. तो निधी कोणत्या कामावर खर्च करायचा, याचा निर्णय आमदारांनीच घ्यायचा प्रकार वाढल्याने राज्याच्या विकासाची दिशा आणि नियोजन याला महत्त्व राहिलेले नाही. परिणामी आमदारांना हा निधी म्हणजे पैसे वाटण्याचे माध्यम वाटू लागले आहे. आमदार होणाऱ्यांची सांपत्तिक स्थिती ज्या वेगाने बदलताना आपण पाहतो, ते पाहिल्यावर प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याला आमदार होण्याची स्वप्ने पडू लागतात. त्याचाच परिणाम गुणवत्ता नसलेल्या भारंभार उमेदवारांची गर्दी होत आहे.

Web Title: An activist dreams of becoming an MLA, resulting in a rush of unqualified candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.