डॉ. प्रदीप कुरूलकर नावाची कीड! ही व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती असते

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 07:53 AM2023-07-11T07:53:34+5:302023-07-11T07:53:53+5:30

आपण प्रत्यक्ष भेटू तेव्हा अधिक तपशील, डिझाइनच्या कॉपीज देऊ, असे त्यांनी झारा दासगुप्ता नाव धारण केलेल्या पाक हस्तकाला शब्द दिला.

An insect called DRDO Dr Pradip Kurulkar! It is not a person but a tendency | डॉ. प्रदीप कुरूलकर नावाची कीड! ही व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती असते

डॉ. प्रदीप कुरूलकर नावाची कीड! ही व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती असते

googlenewsNext

साठीला पोहोचलेला देशाच्या संरक्षणसिद्धतेशी संबंधित उच्चपदस्थ अधिकारी सोशल मीडियावर महिला बनून वावरणाऱ्या परकीय हस्तकाच्या जाळ्यात अडकतो काय आणि त्या आभासी सुंदरीची कधी तरी भेट होईल या आशेवर देशाच्या सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती बिनदिक्कत तिला पुरवतो काय, हे सारे धक्कादायक आहे. गेल्या मे महिन्याच्या सुरुवातीला संरक्षण संशोधन व विकास संस्था म्हणजेच डीआरडीओचे पुण्यातील संचालक डॉ. प्रदीप कुरूलकर यांना अटक झाली तेव्हा हाच धक्का होता. या कुरुलकरांच्या संशयास्पद वागण्याबद्दल डीआरडीओकडूनच दहशतवादविरोधी पथक अर्थात एटीएसला माहिती देण्यात आली होती आणि प्राथमिक तपासानंतर त्यांना अटक झाली. तथापि, कुरुलकर असे काही करतील यावर अनेकांचा विश्वास नव्हता. त्यांना फसविण्यात आले असावे, अशी कुजबुज मोहीम याच मंडळींनी चालवली पण आता एटीएसकडून न्यायालयात सादर करण्यात आलेल्या दोषारोपपत्राने सारे काही उघड झाले आहे. त्यातील तपशील कुरुलकरांच्या अटकेइतकेच धक्कादायक आणि संतापजनकही आहेत.

किंबहुना हनीट्रैप म्हणजे देशाबाहेर कुठेतरी दूर बसलेल्या एखाद्या महिलेच्या जाळ्यात ते अडकले, असे म्हणणे म्हणजे मानवी स्वभावाच्या नावाखाली कुरुलकरांच्या देशद्रोहावर मुलामा चढविण्यासारखे, त्यांचा बचाव करण्यासारखेच आहे. झारा दासगुप्ता, जुही अरोरा नावाने पाकिस्तानचे हस्तक कुरुलकरांवर जाळे टाकत होते. त्यापैकी झाराच्या जाळ्यात हे महाशय अडकले. इंग्लंडमध्ये काम करणारी सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याचे सांगून ती व्हॉटस्अॅपवर मादक छायाचित्रे पाठवत राहिली आणि बेब, बेब करीत कुरूलकर तिच्याशी टेक्स्ट, व्हॉइस व व्हिडीओ कॉलवर गुलुगुलु करीत राहिले. भारताचे संरक्षण, त्याच्याशी संबंधित विविध योजना, ब्राह्मोस अग्नी आकाश वगैरे क्षेपणास्त्रे, त्या क्षेपणास्त्रांचे डिझाइन व लाँचर, सॅम म्हणजे सरफेस टू एअर मिसाइल्स, अनमॅन कॉम्बॅट एअर व्हेइकल, ड्रोन वगैरे गोष्टींमध्ये तिला इतका रस का आहे, असा प्रश्न प्रदीप कुरुलकरांना सुरुवातीलाच पडायला हवा होता; पण तसे झाले नाही. उलट तिच्या सांगण्यावरून त्यांनी नवा मोबाइल घेऊन सगळी माहिती त्यावर घेतली, तसेच बिंग चॅट व क्लाउडचॅटवर या संरक्षणसिद्धतेची माहिती टाकली.

आपण प्रत्यक्ष भेटू तेव्हा अधिक तपशील, डिझाइनच्या कॉपीज देऊ, असे त्यांनी झारा दासगुप्ता नाव धारण केलेल्या पाक हस्तकाला शब्द दिला. ही झारा दासगुप्ता नावाची कोणी महिला अस्तित्वातच नाही. या चॅटचे आयपी अॅड्रेस प्रत्यक्षात पाकिस्तानात सापडले. पाक गुप्तहेर संघटनेच्या एका सुनियोजित षडयंत्रात कुरूलकर अडकले. सप्टेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या सहा महिन्यांतील या सगळ्या घडामोडीचे तपशील आता एटीएसने न्यायालयात सादर केलेल्या १८३७ पानांच्या दोषारोपपत्रात नोंदले गेले आहेत. अत्यंत कळीचा व गंभीर मुद्दा हा आहे, की लष्करातील सामान्य सैनिक किंवा कमी महत्त्वाच्या पदावर काम करणारी व्यक्ती हनीट्रॅपमध्ये अडकली तर समजू शकतो; परंतु डीआरडीओसारख्या सर्वोच्च संशोधन संस्थेत अशी कीड इतक्या उच्च पदापर्यंत कशी पोहोचली आणि इतकी वर्षे कशी काय टिकली? आणखी थोडा खोलात विचार केला तर विशिष्ट धर्म, जात किंवा संघटना म्हणजे देशप्रेम आणि तसाच विशिष्ट धर्म किंवा जात म्हणजे देशद्रोह अशी विचित्र व्याख्या जनमानसात रुजविण्याच्या या काळात प्रदीप कुरुलकरांचे हे प्रकरण एकप्रकारे देशवासीयांच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहे.

स्वतःच्याच देशभक्तीचे गोडवे गाणारी, कौटुंबिक पार्श्वभूमी सांगणारी कुरुलकरांची भाषणे, उपदेश गेले तीन महिने सोशल मीडियावर फिरताहेत. त्यांनी राष्ट्रप्रेमी अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावरूनही अशी भाषणे केली आहेत. त्या भाषणांमध्ये बऱ्यापैकी अप्रत्यक्ष धार्मिक, जातीय, तसेच संघटनात्मक अहंकारही आहे. त्यामुळेच कुरुलकर पकडले गेले तेव्हा अनेकांना धक्का बसला. ही व्यक्ती असे कसे करू शकते या प्रश्नापासून छे, ते असे करणे शक्यच नाही, इथपर्यंत प्रतिक्रिया उमटल्या. काही शंकाही उपस्थित केल्या गेल्या. त्या सगळ्या शंकांचे निरसन आता एटीएसच्या दोषारोपपत्रामुळे झाले असे म्हणावे लागेल. कुरूलकर ही व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती असते. देशभक्ती, राष्ट्रप्रेम वगैरे गोष्टी कुणाची मक्तेदारी नसते. देशभक्तीचा जन्माशी संबंध नसतो. कोणी विशिष्ट धर्मात किंवा जातीत जन्माला आले म्हणून तो देशभक्त किंवा देशद्रोही ठरत नाही, या गोष्टी कुरूलकर प्रकरणातून समजून घेतल्या तरी खूप झाले. 

Web Title: An insect called DRDO Dr Pradip Kurulkar! It is not a person but a tendency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.