सफल नेतृत्वाची प्रेरणादायी कहाणी
By विजय दर्डा | Published: October 2, 2023 06:09 AM2023-10-02T06:09:34+5:302023-10-02T06:10:41+5:30
संजीव मेहतांनी हिंदुस्तान युनिलिव्हरला मूलमंत्र दिला : 'जे भारतासाठी अनुकूल, तेच आपल्यासाठीही!'- या मंत्राने कंपनीला यशोशिखरावर नेले.
डॉ. विजय दर्डा
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
माझ्या या स्तंभात एखाद्या व्यक्तीविषयी मी सहसा लिहीत नाही. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा अपवाद केला, तेवढाचा पण काही लोक वेगळा विचार करतात आणि यशाचे नवे अध्याय लिहितात. संजीव मेहता हे असेच एक अजोड व्यक्तिमत्त्व! त्यांच्या नेतृत्वाच्या प्रेरणादायी कहाणीबद्दल आज लिहावेसे वाटते आहे.
नवा विचार आणि त्यानुसार कृती करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून जगभरच्या कॉर्पोरेट क्षेत्रात संजीव मेहता ओळखले जातात. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीचे माजी अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक तसेच युनिलिव्हर दक्षिण आशियाचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी अत्यंत महत्त्वाची कामगिरी केली आहे. व्यवसायाच्या प्रत्येक पावलावर सामान्य माणसाचा विचार; हे त्यांच्या कार्यपद्धतीचे खास वैशिष्ट्य! कंपनीचे उत्पादन उच्च दर्जाचे, तरीही सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे असावे, हा त्यांचा सर्वोच्च प्राधान्यक्रम! कारण कानपूरच्या एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या संजीव मेहतांना सामान्य माणसाच्या गरजा अचूक समजतात. साफल्याच्या शिखरावर पोहोचलेला त्यांचा प्रवास असाधारण नेतृत्वकौशल्य, दूरदर्शित्व आणि बांधिलकीची झळाळती साक्ष देतो.
१९८३ मध्ये युनियन कार्बाइड नावाच्या कंपनीत विक्री व्यवस्थापक म्हणून काम सुरू करणारा हा माणूस आपल्या कर्तृत्वाचा ध्वज जगभर फडकवील, असे कुणाला वाटले असेल? १९९२ मध्ये ते हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये आले. कर्तबगारी आणि नवनिर्मितीचा ध्यास या बळावर त्यांच्याकडे कंपनीच्या भारतीय कारभाराचे नेतृत्वपद आले. त्यांनी केवळ भारतातच नव्हे तर संयुक्त अरब अमिरात, बांगलादेश, तुर्कस्तान आणि फिलिपाइन्समध्येही कंपनीच्या जबाबदारीच्या पदांवर काम केले आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरच्या दक्षिण आशियाचे नेतृत्व तर त्यांच्याकडे होतेच, शिवाय बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ आणि अन्य देशांची जबाबदारीही होती. संजीव मेहता यांनी हिंदुस्तान युनिलिव्हरला एक मूलमंत्र दिला जे भारतासाठी अनुकूल तेच हिंदुस्तान युनिलिव्हरच्या हिताचे! ग्राहकांसमोर उत्पादनांची उपलब्धता सतत राहिली पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष दिले. मालाची ऑर्डर नोंदवण्याच्या कामातला मानवी हस्तक्षेप काढून त्यासाठी 'शिखर' नावाचे अॅप संजीव मेहता यांच्याच पुढाकाराने तयार केले गेले. ज्यासाठी पूर्वी दोन आठवडे लागत असत. ते काम केवळ दोन दिवसांत होऊ लागले. या अॅपवर सध्या बारा लाखांहून जास्त किरकोळ विक्रेते व्यवहार करतात. ग्राहकाला सतत काहीतरी नवीन लागते हे संजीव मेहता यांना ठाऊक होते. बाजारात टिकून राहायचे असेल तर सातत्याने नवीन काही करावे लागेल, हे जाणून त्यांनी 'इनोवेशन 'हब' तयार केले. ग्राहकाला अन्य कुठे जाण्याची गरजच उरणार नाही, इतकी विविधता त्यांनी उत्पादनात आणली. उदाहरणार्थ, शाम्पूच्या मोठ्या पॅकवर जास्त बचतीची ऑफर दिली आणि शाम्पूच्या पाऊचची किंमत इतकी कमी ठेवली की रस्त्याने जाणारा सामान्य माणूसही ते पाऊच सहज खरेदी करू शकेल. सध्या हिंदुस्तान युनिलिव्हरकडे ५० पेक्षा जास्त बँड्स आहेत. मेहता यांच्या कार्यकाळात कनखजुरा नावाने एक एफएम रेडिओ स्टेशन कंपनीने सुरू केले आणि तेही उत्तम प्रकारे चालले आहे.
संजीव मेहता चेन्नईतल्या वस्त्यावस्त्यात गेले आणि त्यांनी महिलांना विचारले, तुम्ही कोणते तेल वापरता?. अनेकींनी इंदुलेखा तेलाचे नाव घेतले आणि सांगितले, या तेलामुळे केस दाट काळे आणि मजबूत होतात. संजीव यांनी तत्काळ आपल्या सहकाऱ्यांना सांगितले की, आता आणखी नवे संशोधन करण्याची गरज नाही. हिंदुस्तान युनिलिव्हरने इंदुलेखा हा अँड्च खरेदी केला. संजीव मेहता यांनी जीएसके म्हणजेच ग्लॅक्सोस्मिथक्लाइन कन्झ्युमर हेल्थलाही हिंदुस्थान लिव्हरच्या पंखाखाली आणले.
कॉर्पोरेट क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीचे पुष्कळ किस्से आहेत; पण इतरांपेक्षा त्यांचे वेगळेपण हे, की संजीव मेहता सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहिले. देशात परकीय चलनाची चणचण निर्माण झाली, तेव्हा आपल्या उत्पादनांसाठीचा कच्चा माल देशांतर्गत बाजारपेठेतून कसा उपलब्ध होईल याचा विचार करून त्यांनी अमूल्य परकीय चलन वाचवले. तंत्रज्ञानाचा वापर करून कंपनीच्या उत्पादन प्रक्रियांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण निम्म्यावर आणले. 'लोकमत'च्या सहकार्याने हिंदुस्तान युनिलिव्हरने 'रिन' या ब्रँडच्या माध्यमातून महाराष्ट्रात पाणी बचतीचे मोठे आणि अभिनव उपक्रम राबविले. जवळपास १.३ लाख कोटी लिटर पाणी त्यातून वाचले. हा उपक्रम नंतर देशभर चालवला गेला. भारतीयांना दोन वर्षे पिण्यासाठी पुरेल इतके पाणी या उपक्रमातून वाचले. पाणी वाचवण्याविषयी संशोधन करताना त्यांच्या असे लक्षात आले की, पाण्याचा सर्वाधिक वापर शौचालय, हात धुणे, अंघोळ आणि कपडे धुताना होतो. त्यांनी सार्वजनिक सुविधा केंद्र उघडण्यासाठी सरकार आणि मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितली. त्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त काळ लागला. शेवटी घाटकोपरमध्ये पहिले सुविधा केंद्र सुरू झाले. आतापर्यंत अशी १२ सुविधा केंद्रे सुरू झाली असून, दररोज ४० हजार लोक त्याचा उपयोग करत आहेत. या सुविधा केंद्रात उपयोगात आणले जाणारे पाणी शुद्ध करुन पुन्हा वापरले जाते. सरकार आता युनिलिव्हरला आणखी नवी सुविधा केंद्रे उघडायला सांगत आहे. कोविडची साथ आली तेव्हा धारावीच्या दाट वस्त्यांमध्ये कंपनीने साबण वाटणे सुरू केले. लोक हात धूतील आणि महामारीला अटकाव होईल, हा हेतू त्यामागे होता. कोविड पसरतो आहे याचा अंदाज कंपनीला वेळेच्या आधी आला होता. त्यामुळे ७० हजार कोविड टेस्ट किट मागवून महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशात मोफत वाटण्यात आले. हिंदुस्तान युनिलिव्हरने हे ७० हजार संच वाटले, तेव्हा भारत सरकार केवळ लाखभर संच पैदा करू शकले होते, हे इथे लक्षात घेण्यासारखे! आपल्या पैतृक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचा उपयोग करून संजीव मेहता यांनी अमेरिका, चीन, ब्रिटन आणि फ्रान्समधून ५ हजारपेक्षा जास्त ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मागवले, ज्यामुळे कोविडग्रस्तांचे प्राण वाचवायला मदत झाली.
संजीव मेहता चार्टर्ड अकाउंटंट देखील आहेत. प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांचे वडील, पूर्व केंद्रीय मंत्री एन. के. पी. साळवे नागपूरमध्ये एक सीए फर्म चालवत असत. या फर्ममध्येच संजीव मेहता यांनी आर्टिकलशिप केली होती. हिंदुस्तान युनिलिव्हर आणि 'लोकमत'चे संबंध पुष्कळ जुने आहेत. डॉ. दत्ता सामंत यांनी मुंबईमध्ये मोठा संप घडवून आणला तेव्हा हिंदुस्तान युनिलिव्हरचा मुंबईतला कारखाना वर्षभरापेक्षा जास्त काळ बंद होता. कंपनीचे तत्कालीन प्रमुख डॉ. अशोक गांगुली यांनी त्यावेळचे राज्याचे उद्योगमंत्री माझे वडील ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक श्री जवाहरलाल दर्डा यांच्याकडे मदत मागितली. बाबूजींनी त्यांना सल्ला दिला, की कंपनीच्या उत्पादन केंद्रांचे विकेंद्रीकरण करा आणि संवादासाठी इंग्रजी नव्हे, तर स्थानिक भाषेचा वापर करा.
- बाबूजींचा हा सल्ला मानला गेला. बाबूजींनी हिंदुस्तान युनिलिव्हरला यवतमाळमध्ये तयार औद्योगिक शेड उपलब्ध करून दिली. तिथेच पुढे उत्पादन सुरू झाले. त्यानंतर खामगावमध्ये जमीन दिली गेली. तिथे उभ्या राहिलेल्या कारखान्यातच आज पीअर्स साबण तयार आणि जगभर जातो. बाबूजींच्या सल्ल्याने छिंदवाडामध्येही कंपनीचे उत्पादन सुरू झाले. डॉ. गांगुली नंतर माझे राज्यसभेतील सहकारी झाले. ते नेहमी बाबूजींनी केलेल्या मदतीची आठवण काढत असत. अशा या कंपनीला संजीव मेहता यांनी आपली कार्यक्षमता आणि प्रतिभेच्या जोरावर साठ हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेली कंपनी म्हणून नावारूपास आणले. आज देशाच्या संसदेत महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी संघर्ष चालला आहे. याबाबतीत संजीव मेहता यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्तान युनिलिव्हरने बराच पुढचा पल्ला गाठला आहे. या कंपनीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त नेतृत्व महिलांकडे आहे. कर्मचारी आणि अधिकारी प्रशिक्षणावर विशेष लक्ष दिले जाते. हिंदुस्तान युनिलिव्हर हे आजच्या कॉर्पोरेट क्षेत्रासाठी जणू 'विद्यापीठ' ठरले आहे; याचे श्रेय निःसंशय संजीव मेहता यांचे! त्यांच्या या विद्यापीठात काम करून, संपन्न अनुभव गाठीशी बांधून निघालेले प्रशिक्षित, कर्तबगार लोक आज दुसऱ्या मोठ्या कंपन्यांचे नेतृत्व करताना दिसतात. सेवानिवृत्तीनंतर आता संजीव मेहता डॅनोन आणि एअर इंडियाच्या बिगर कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत. खरे सांगायचे तर संजीव मेहता नावाचा हा कर्तबगार, प्रतिभाशाली माणूस या देशाचा अमूल्य ठेवा आहे!