अनंत अंबानींची दूरदृष्टी : वनतारा- एक अद्वितीय अभयारण्य

By Rishi Darda | Updated: March 10, 2025 16:32 IST2025-03-10T16:31:03+5:302025-03-10T16:32:06+5:30

३,५०० एकर जागेत असलेले हे वनतारा प्राण्यांसाठी सुरक्षित अधिवास तयार करते. प्राण्यांची काळजी घेणं, नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्राण्यांचं संवर्धन आणि त्यांना सुरक्षितता देणं, यासाठी हे जागतिक दर्जाचे अभयारण्य आहे. 

Anant Ambani’s Vision: Vantara, A Sanctuary Like No Other | अनंत अंबानींची दूरदृष्टी : वनतारा- एक अद्वितीय अभयारण्य

अनंत अंबानींची दूरदृष्टी : वनतारा- एक अद्वितीय अभयारण्य

अनंत अंबानींसोबत दोन तास गप्पा झाल्या, त्या संवादात एकच गोष्ट ठळकपणे जाणवली! वन्यजीव संरक्षणासाठी त्यांची कळकळ आणि अढळ समर्पण! प्राण्यांप्रती, विशेषतः संकटात असलेल्या जीवांप्रती त्यांना जाणवणारं ममत्व आणि बांधिलकी विलक्षण आहे. केवळ शाब्दिक नव्हे तर त्यांनी गेली अनेक वर्षे आपलं हे काम नेटानं सुरू ठेवलं आहे.


काही जागा तुम्हाला भारावून टाकतात. त्यांची भव्यता तर अचंबित करतेच; पण त्यामागची दृष्टी आणि काम करण्याची पद्धत प्रेरणादायी असते. वनतारा, जगातील सर्वात मोठे प्राणी संरक्षण आणि पुनर्वसन केंद्र ही अशी अत्यंत उमेदीची जागा आहे. मी जाण्यापूर्वी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वनतारा’ला भेट दिली होती. त्यांनी तब्बल नऊ तास त्या अभयारण्यात घालवले. तिथं गेल्यावर माझ्या लक्षात आलं की कित्येक तास या जागी राहावं, ते जग पाहावं, असं का वाटतलं. अभयारण्यात मी दोन दिवस होतो तरी मला असं वाटलं की अजून इथं राहायला हवं, बारकाईने पाहायला हवं हे जग, निसर्गात एकरूप व्हावं.

३,५०० एकर जागेत असलेले हे वनतारा प्राण्यांसाठी सुरक्षित अधिवास तयार करते. प्राण्यांची काळजी घेणं, नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्राण्यांचं संवर्धन आणि त्यांना सुरक्षितता देणं, यासाठी हे जागतिक दर्जाचे अभयारण्य आहे. त्याची व्याप्ती आणि भव्यता पाहून अचंबित व्हायला होतं.

>> ३,७०० कर्मचारी, पशुवैद्य, जीवशास्त्रज्ञ, आहारतज्ज्ञ, प्रशिक्षक आणि सांभाळ करणारे कर्मचारी समाविष्ट आहेत.
>> ३०० हून अधिक कार्गो विमाने, ज्याद्वारे जगभरातून प्राण्यांची वाहतूक करण्यात आली आहे.
>> १०५ चित्ते, १,००० मगरी, ४०० हत्ती आणि असंख्य इतर प्रजातींचे संरक्षण.

चित्ते आणि झेब्रा तुमच्या वाहनाभोवती मुक्त संचार करतात, हे दृश्य एरव्ही आफ्रिकन जंगलातच दिसतं, ते इथं सहज अनुभवता येतं. प्राण्यांसाठी वनतारामध्ये ४५ हून अधिक वैद्यकीय केंद्रे आहेत. माणसांसाठी असलेल्या सुप्रसिद्ध रुग्णालयांसारखा त्यांचा दर्जा आहे. येथे एंडोस्कोपी, एक्स-रे, रक्त तपासणी होते. आणि अगदी हत्तींसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रियाही केली जाते. प्रत्येक गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक नियोजनपूर्वक आखलेली दिसते.

>> प्रत्येक पक्षी आणि प्राण्यासाठी सुस्पष्ट आहार योजना, त्यासाठी ठरावीक प्रमाण आणि वेळापत्रक असते.
>> फळे हाताने कापली जातात, त्यांच्या गुणवत्तेची योग्य खबरदारी घेतली जाते.
>> प्रत्येक बंदिस्त जागेबाहेर क्युआर कोड असतो, ज्याद्वारे डॉक्टर, प्रशिक्षक आणि आहारतज्ज्ञ त्वरित माहिती अपडेट करू शकतात.

वनतारामध्ये सिंह, वाघ, गेंडे, सरपटणारे प्राणी, मासे आणि अगदी विविध देशांमधून आणलेले श्वानदेखील दिसतात. मला आवडलेले दोन प्राणी मात्र विलक्षण आहे. कॅसोवरी पक्षी. हा एक आकर्षक, दुर्मीळ आणि भव्य पक्षी असतो. भारतीय अखल-टेके घोडा! हा सोनेरी अबलख घोडा अत्यंत सुंदर दिसतो.

वनतारा पाहून आल्यावर वाटतं की आजवर अनेक लोकांनी मोठ्या प्रमाणावर प्राणीसंग्रहालये उभारण्याची स्वप्नं पाहिली, निर्माण केली; पण पण जगातील सर्वात मोठे प्राणी देखभाल केंद्र तयार करायची कल्पनाच किती वेगळी आहे. त्या आगळ्या कल्पनेतून साकारलेलं वनतारा म्हणून इतरांपेक्षा वेगळं ठरतं. दूरदृष्टी, अत्यंत काटेकोर नियोजन, अढळ बांधिलकी यातूनच हे अभूतपूर्व आणि भव्य काम उभे राहू शकते.

तुम्हाला कधी वाटलंच की आपला दृष्टिकोन अधिक व्यापक व्हायला हवा तर वनताराकडे पाहावं. कळकळ आणि अंमलबजावणी हातात हात घालून किती उत्तम काम करतात तर वनताराकडे पाहायला हवं. वन्यजीवन भविष्यात कसं दिसू शकतं, याचा उत्कट अनुभव म्हणजे वनतारा!

Web Title: Anant Ambani’s Vision: Vantara, A Sanctuary Like No Other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.