अराजकतेचे मूळ प्रजासत्ताकात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 12:44 AM2017-11-19T00:44:53+5:302017-11-19T00:45:23+5:30
देशाचे काय व्हायचे ते होवो, मला माझी पोळी शेकता आली पहिजे. केवळ याच विचारातून देशभर अनेक दबावगट कार्यरत होतात. मग ते धर्माच्या, जातीच्या, भाषेच्या नावे असोत वा तथाकथित पुरोगमित्वाच्या नावावर असो वा अगदी अमुकतमुक कल्याणाच्या नावे असोत.
- डॉ. नीरज देव
देशाचे काय व्हायचे ते होवो, मला माझी पोळी शेकता आली पहिजे. केवळ याच विचारातून देशभर अनेक दबावगट कार्यरत होतात. मग ते धर्माच्या, जातीच्या, भाषेच्या नावे असोत वा तथाकथित पुरोगमित्वाच्या नावावर असो वा अगदी अमुकतमुक कल्याणाच्या नावे असोत. हेच तर असते, झुंडसत्ताक आणि ज्यांच्या हाती सत्ता आहे, ते प्रजाजन ते जनतेचे सेवक काय करतात?
देशात गेली कित्येक दशके चाललेला गोंधळ, भ्रष्टाचाराचे माजलेले थैमान पाहून कुणाही सुजाण नागरिकाला स्वाभाविकपणे चीडच येते. येणारच ना ! पण याचे मूळ कशात असावे? सारे जण आपापल्या परीने शोधतात. मला वाटते याचे मूळ असावे आपल्या प्रजासत्ताकात.
प्रजासत्ताक म्हटले की, एकप्रकारे मानसिकताच बनते आपण प्रजा असल्याची. प्रजा कधीच कर्तव्य पार पाडत नसते. म्हणून तर नजर ठेवायला राजा लागतो; अमर्याद अधिकार असलेला. आणि जेथे राजा नसतो तेथील प्रजाच राजा होण्याचा प्रयास करते. प्रत्यक्षात काय दिसते? आज प्रजेतील प्रत्येक जण राजा होण्याचा प्रयास करतो. जो राजा होतो, तो तर जितके लुटता येईल तितके लुटतोच, पण राजा न होता आल्याने नाइलाजाने प्रजा रहिलेली प्रजासुद्धा लूटच करते. संधी मिळाली पण लूट केली नाही तर तो विरळाच.
बरे गंमत म्हणजे राजा झालेली प्रजा स्वत:ला सेवक म्हणविते. तुम्हाला नाही वाटत जनतेचा सेवक हा स्वत:ला जनतेपासून वेगळा समजत असतो, मोठा समजत असतो म्हणून तर तो सेवक बनतो. समजा तो नाही समजत तसे पण मला सांगा, नगरसेवक असो वा प्रधान सेवक; सामान्यत: सेवक काय पाहतो, जबाबदारी की लाभ? लाभच म्हणून तर सेवक आलिशान गाड्यांतून फिरतात, मोठमोठ्या निवासस्थानात राहतात अन् झेड सुरक्षेतून वावरतात आणि जे सेवा घेतात ती प्रजा तो तथाकथित मतदारराजा सामान्य जीवन व्यतीत करतो.
थोडक्यात काय प्रजासत्ताकातील राजा बनलेली प्रजा आणि राजा बनता न आल्याने प्रजा रहिलेली प्रजा केवळ आपले अधिकारच बघते. जेथे अधिकार परवलीचा शब्द बनतो तेथे कर्तव्याला तिलांजली दिली जाते आणि त्यातून जन्म होतो झुंडसत्ताकाचा.
देशाचे काय व्हायचे ते होवो, मला माझी पोळी शेकता आली पहिजे. केवळ याच विचारातून देशभर अनेक दबावगट कार्यरत होतात. मग ते धर्माच्या, जातीच्या, भाषेच्या नावे असोत वा तथाकथित पुरोगमित्वाच्या नावावर असो वा अगदी अमुकतमुक कल्याणाच्या नावे असोत. हेच तर असते, झुंडसत्ताक आणि ज्यांच्या हाती सत्ता आहे ते प्रजाजन ते जनतेचे सेवक काय करतात? सत्तेच्या लालसेपायी, आपले राजेपद टिकावे यासाठी न्याय, नीती, देशहित कसलाही विचार न करता झुंडशाहीपुढे वारंवार झुकताना दिसतात. झुंडशाही बळकट करताना दिसतात.
अपेक्षा तर ही असते की प्रजासत्ताक विकसित होत होत हळूहळू नागरिकसत्ताक व्हावे. अर्थातच प्रजेनेही नागरिक व्हावे. नागरिक होताच तिला पहिली जाणीव होते आपल्या कर्तव्याची! कर्तव्य केवळ राष्ट्रगीताच्या सन्मानातून दिसत नसते तर ते दिसते रोजच्या व्यवहारातून। बरे ! हे कर्तव्य मी केले असा डांगोरा पिटायचा नसतो तर कर्तव्य करून मोकळे व्हायचे असते. मला वाटते आपली ही नागरिकसत्ताकाची अपेक्षा अद्याप तरी फोलच ठरलीय. अन् तिचे कारण हेच की आपण स्वतंत्र भारतातील नागरिकांना त्यांच्या सामर्थ्याची, नागरिकत्वाची जाणीव न देता वारंवार हेच बिंबवतो की तुम्ही प्रजा आहात, दीनदुबळी जनता आहात, गोरगरीब प्रजाजन आहात. तुम्ही भारतीय प्रजासत्ताकात राहता.
(लेखक प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आहेत)