आणि एकांकिका वाहून गेली...

By Admin | Published: December 25, 2014 11:30 PM2014-12-25T23:30:09+5:302014-12-25T23:30:09+5:30

एका आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत घडलेला हा किस्सा. आज अचानक आठवला, कारण आता काही दिवसांनी हे वर्ष संपेल आणि नवीन वर्षाला आरंभ होईल.

And the monkeys were carried away ... | आणि एकांकिका वाहून गेली...

आणि एकांकिका वाहून गेली...

googlenewsNext

संजय मोने,प्रसिद्ध अभिनेते व लेखक -
एका आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत घडलेला हा किस्सा. आज अचानक आठवला, कारण आता काही दिवसांनी हे वर्ष संपेल आणि नवीन वर्षाला आरंभ होईल. जर मागच्या वर्षाचा शेवटचा दिवस साजरा केला नाही, तर नवीन वर्ष चांगलं जाणार नाही अशी आमच्या एका मित्राची समजूत होती. म्हणून गेली पस्तीस चाळीस वर्षं तो हा दिवस काही मित्रांना बोलावून साजरा करत आला आहे. मात्र, मागील वीस-बावीस वर्षं तो अत्यंत सुखात आहे कारण तो मुंबईच्या बाहेर आपल्या गावी राहतो. यावेळी तो कामानिमित्त मुंबईत आहे म्हणून त्याची एकतीस तारखेला एक मेजवानी आहे. त्याचं आमंत्रण करायला तो आला होता, मी नेमका एका स्पर्धेच्या ठिकाणी बक्षीस समारंभाला गेलो होतो. माझी वाट बघत तो थांबला होता. आल्या आल्या त्याने विचारलं...
...कशी झाली स्पर्धा? सगळ्या एकांकिका नीट पार पडल्या?
मी होकार दिल्यावर तो नाराज दिसला.
...छे!म्हणजे आता पूवीर्ची गंमत नाही एकंदरित?
...नाही. हल्ली जरा शिस्त असते.
...आपल्या वेळेला काय धम्माल असायची नाही? संजय! ती कुठली रे एकांकिका? मी धमाल केली होती ती?
मी म्हटलं, ...एक का सांगता येईल? तुझ्या नावावर अशा बऱ्याच एकांकिकांची नोंद आहे.
तो मनापासून हसला.
...पण आता मी सगळं सोडलंय हं. गावाला मुंबईची बरीच नाटकं येतात. गपचूप बसून बघतो, कॉलेजांत असताना वाटायचं आपल्याला पण अभिनय येतो, आता कळलं आपलं ते काम नव्हतं.
ह्याला कॉलेजात असताना अभिनय करायची जाम इच्छा होती, कलाकारांची निवड होणार होती तेव्हा हा तिथे गेलाही होता, पण त्याला वगळण्यात आलं, आम्हाला काही जणांनाही वगळलं, आम्ही सोडून दिलं पण याला मनापासून राग आला होता, त्याने एक योजना आखली. दिग्दर्शकाला जाऊन तो भेटला आणि अत्यंत दीनवाणा चेहरा करून म्हणाला,
... माझी निवड झाली नाहीये पण मी तालमींना आलो तर चालेल का? झाली तर माझी मदतच होईल तुम्हाला. इतर सगळी कामं मी करेन...
दिग्दर्शक मनापासून खूष झाला. बघा! हा कसा खिलाडूवृत्तीचा आहे वगैरे म्हणून त्याने त्याला शाबासकी दिली वर पुढच्या एकांकिकेत एखादी छोटीसी भूमिका देईन असं वचनही दिलं. तालमी सुरू झाल्या. हा सगळ्यांच्या आधी जाऊन चहापाणी, नेपथ्य वगैरेची मांडामांड करणं वगैरे करू लागला, वेळेला संवाद म्हणायला मदत कर, पटकन एखादी गोष्ट लागली तर आणून दे,
रात्री कोणाला सोडायचं असेल तर ते कामही करून टाक अशी त्याची चौफेर मदत सुरू झाली, बघता बघता संपूर्ण एकांकिकाही पाठ झाली,
कधी दिग्दर्शकाला यायला थोडा उशीर झाला, तर तालीम सुरू करून कलाकारांना हालचाली सांगणंही अगदी चोख सुरू ठेवलं..एक वेळ अशी आली की, एकांकिकेतलं सर्व माहीत असलेला दिग्दर्शकाखेरीज तो एकटाच होता.
रंगीत तालमीला दिग्दर्शकाने निवडीसाठी आलेल्या सर्व कलाकारांना तसंच कॉलेजच्या संबंधित प्राध्यापकांना बोलावलं. त्या दिवशी तर त्याने सर्व व्यवस्था अगदी चोख पार पाडली. प्राचार्यांनी त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली.
... सर! सगळेच शिवाजीमहाराज झाले, तर मावळ्यांची कामं कोण करणार?... असं म्हणून त्याने त्याच्या सगळ्या वागण्यावर कळस चढवला. दिग्दर्शकाचेही डोळे पाणावले, त्याने आमच्या मित्राला कडकडून मिठी मारली.
... एकांकिका पहिली आली तर त्यात तुझा सिंहाचा वाटा असेल... दिग्दर्शक गदगदल्या आवाजात म्हणाला.
आणि स्पर्धेचा दिवस उजाडला. दोन एकांकिका झाल्या आता तिसरी मित्राची. एकांकिकेचा पडदा उघडला. आम्ही बघतो तो आमचा मित्र पार मागच्या बाजूला जाऊन बसलेला... का? वाटलं की आयत्या वेळेला दिग्दर्शकाने बदल करून कोणाचा तरी प्रवेश प्रेक्षगृहातून आखला असेल, त्या काळात हे प्रकार सर्रास चालायचे, तर एकांकिका सुरू झाली नाटकाची नायिका प्रवेश करती झाली आणि अचानक मागून मित्राचा दबका; पण सगळ्यांना ऐकू जाईल असा आवाज आला.
...या! कोचावर बसा...
आणि नायिका कोचावर बसली..
... चला! आता उजवीकडे बघा. आणि मग डावीकडे बघा. आता फोन वाजणार आहे...
मित्र म्हणत होता अगदी तस्सा प्रसंग घडत होता.
... दरवाजात तुमचे डॉक्टर आले आहेत त्यांना वडिलांची तब्येत विचारा...
हिरोईन म्हणाली,
डॉक्टर आता बाबांची तब्येत कशी आहे?
डॉक्टरांचं उतर यायच्या आत मित्राचा आवाज प्रेक्षागृहातून लोकांपर्यंत पोचला.
... आॅपरेशनशिवाय पर्याय नाही...
ठरल्याप्रमाणे डॉक्टरची भूमिका करणाऱ्याला तेच वाक्य म्हणावं लागलं.
हळूहळू प्रेक्षकांचा गलका वाढला आणि एकांकिका पार कोसळली. आमचा मित्र म्हणत होता तसं सगळं घडत होतं..अचानक प्रेक्षागृहातून अजून एक आवाज आला.
... अहो! इतकं माहीत आहे तर शेवटही सांगा!...
मित्राने शेवटही सांगून टाकला..आणि प्रेक्षकातून एकमुखाने आवाज आला
हर हर महादेव..
आणि त्या गजरात उरली सुरली एकांकिकाही वाहून गेली.

Web Title: And the monkeys were carried away ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.