अन्फेअर अ‍ॅण्ड अन्लव्हली

By admin | Published: May 23, 2017 06:56 AM2017-05-23T06:56:08+5:302017-05-23T06:56:08+5:30

देशाच्या बाजारात विकली जाणारी सौंदर्यप्रसाधने, त्यातही तुमचा गोरा रंग अधिक गोरा व अधिक उजळ करून देणारी, त्यांच्या जाहिरातींवर वर्षाकाठी २७ हजार कोटींएवढा प्रचंड खर्च करतात

Anger and unavly | अन्फेअर अ‍ॅण्ड अन्लव्हली

अन्फेअर अ‍ॅण्ड अन्लव्हली

Next

देशाच्या बाजारात विकली जाणारी सौंदर्यप्रसाधने, त्यातही तुमचा गोरा रंग अधिक गोरा व अधिक उजळ करून देणारी, त्यांच्या जाहिरातींवर वर्षाकाठी २७ हजार कोटींएवढा प्रचंड खर्च करतात. हा आकडा त्या व्यवसायाची उलाढाल चार लक्ष कोटींएवढी आहे हे सांगणारा आहे. सिनेमातील लोकप्रिय नट आणि नट्यांना जाहिरातीत आणायचे आणि ते ती प्रसाधने वापरत असल्यामुळेच सुंदर व आकर्षक दिसतात असे तिच्यातून सांगायचे हा या व्यवसायाचा खाक्या आहे. या प्रसाधनांचे औषधी-मोल न पाहता त्या नट-नट्यांचे फोटो पाहून हुरळणारी मुले-मुली व चांगली वयस्क माणसे आणि स्त्रियादेखील त्यांच्या नादी लागतात आणि या कंपन्यांच्या तिजोऱ्यात आपले पैसे टाकून आहे तशाच राहतात. काळ्याचा गोरा करू असा दावा करणारी प्रसाधने आहेत. औषधही खपणार नाही एवढे ते बाजारात खपतात. त्याचा लेप लावून आपला रंग कालच्याहून आज किती उजळ झाला हे पाहणारी खुळी माणसे आपल्या अवतीभवतीच असतात. या जाहिराती आणि त्यातील नट-नट्यांनी गौरवून सांगितलेला गोरा वर्ण या साऱ्यांविरुद्ध आता दक्षिणेतील नट-नट्यांनीच एक युद्ध छेडले आहे. गोऱ्या रंगाचे हे महागडे कौतुक समाजात रंगभेदाचा प्रसार करणारे व सावळ्या आणि कृष्णवर्णीयांच्या मनात न्यूनगंड उत्पन्न करणारे आहे, असा या युद्धकर्त्यांचा पवित्रा आहे. सुप्रसिद्ध बंगाली नटी नंदिता दास हिने या युद्धाचे रणशिंग फुंकले असून, तिच्या मागे दक्षिण व पूर्वेकडील अनेक नट व नट्या आणि सामाजिक विचारवंत आता उभे होत आहेत. गोऱ्या रंगाचे कौतुक हा आपल्या रंगवादी परंपरेचाही वारसा आहे. लग्नात व समाजातही या रंगाला व तो धारण करणाऱ्याला जरा जास्तीचे ‘अटेंशन’ लागते. मात्र त्याचवेळी तो प्रकार बहुसंख्येने वावरणाऱ्या काळ्या व सावळ्या रंगाच्या स्त्री-पुरुषात संकोच उभा करतो. हा प्रकार मानसिक असला तरी छळवादी आहे. त्यामुळे अशा जाहिरातींवर बंदी घाला आणि त्यात भाग घेऊन प्रचंड पैसा मिळविणाऱ्या नट-नट्यांवरही बहिष्कार घाला असे या आंदोलकांचे म्हणणे आहे. काळ्या वर्णाची स्त्री वा पुरुषही कमालीचा स्मार्ट असू शकतो. त्याचेही आकर्षण मोठे असते. राम, कृष्ण आणि विठोबासारखी आपली दैवते सावळी व कृष्णवर्णीय होती. येशूही काळाच होता. पैगंबरालाही गौर वर्ण लाभला नव्हता. उत्तरेतील काही राज्ये सोडलीत तर सारा भारतच मोठ्या प्रमाणावर सावळा व काळा रंग मिरवणारा आहे. तो रंग त्याचा आहे, तो सोडून गौरवर्णी बनले पाहिजे असे म्हणणे हा त्या मोठ्या वर्गावर लादला जाणारा मानसिक अन्याय व अपमानही आहे. ही वृत्ती आपल्या सिनेमात व राजकारणातच आहे असे नाही. काही दिवसांपूर्वी तरुण विजय या नावाच्या भाजपाच्या खासदाराने ‘आम्ही दक्षिणेतील कृष्णवर्णी लोकांसोबत राहतो ही गोष्ट आम्ही वर्णभेद पाळत नाहीत हे सांगणारी आहे’ असे कमालीचे उद्विग्न करणारे उद्गार काढले होते. आम्ही उत्तर भारताकडचे लोक दक्षिणेतील काळ्या लोकांना सहन करतो हाच त्या उद्गाराचा खरा अर्थ होतो. हे तरुण विजय पत्रकारही आहेत. एखाद्या पत्रकाराने कसे लिहू व बोलू नये याचाही हा अपमानजनक नमुना आहे. रंग, वर्ण, जात, धर्म आणि देश या माणसांनी स्वकष्टाने मिळविलेल्या बाबी नाहीत. त्या काहीएक न करता जन्माने प्राप्त होणाऱ्या आहेत. त्याचे दु:ख करणे जेवढे वाईट आणि चुकीचे तेवढाच त्याचा तोरा मिरविणेही तापदायक असते. तो तोरा सांगत आपल्याला मोठे व इतरांना लहान समजणारे आहे व त्या ‘बिचाऱ्यांना’ आम्ही चालवून घेतो असे सांगण्याचा मूर्खपणा हे कोणत्याही सभ्य माणसाचे लक्षण नव्हे. दक्षिणेतील व पूर्वेकडील नट-नट्यांच्या या रंगभेदविरोधी आंदोलनाने आता वेग व मोठे स्वरूप प्राप्त करायला सुरुवात केली आहे. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्यासाठी कोणाला डिवचणे हा क्षूद्रपणा आहे आणि त्याचे स्वरूप तसेच लक्षात घेतले पाहिजे. या आंदोलनाचा परिणाम गोरेपणाचा बडिवार सांगणाऱ्या जाहिरातींवर व तो माल बनविणाऱ्या कंपन्यांवर कितपत होतो हे आताच सांगता येत नाही. त्या जाहिरातीतील बोलक्या नट-नट्यांनीही या आंदोलनाविषयीची त्यांची प्रतिक्रिया अजून सांगितली नाही. मात्र त्याविरुद्ध संघटित होत जाणारा वर्ग मोठा आहे आणि त्याने दक्षिण विरुद्ध उत्तर असे स्वरूप घेण्याआधीच तो शमविणे हे शहाण्या राजकारणाचे व प्रभावी समाजकारणाचे काम आहे. स्त्रीला स्त्री म्हणून कमी लेखणे, शेतकऱ्यांना ग्रामीण वा अडाणी म्हणून दूर लोटणे, रोजगार मिळू न शकलेल्यांना बेकार म्हणून नावे ठेवणे हा प्रकार जेवढा असभ्य तेवढाच एखाद्या स्त्रीला वा पुरुषाला तिच्या वाट्याच्या वर्णावरून कमी लेखणे असभ्यपणाचे आहे. हे असभ्यपण थांबविणे हा सामाजिक
शहाणपणाचा मार्ग आहे. अशी आंदोलने चर्चेतून शमविता येतात; मात्र तसे होताना त्या विषयीचा तोरा मिरविणाऱ्यांना आवर घालणे आवश्यक असते. एखाद्याला कुरूप म्हणणे याएवढा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अपमान होतानाही तो त्याला कायमचा जिव्हारी लागणारा घाव ठरतो. तो कळत केला काय आणि नकळत केला काय त्यातला दुष्टावा कायम असतो. जाहिरातीही विधायक मार्गाने करता येतात. कोणाला तरी अपमानीत करून त्या करणे हा व्यावसायिक कल्पकतेचा अभाव दाखविणाराही प्रकार आहे.

Web Title: Anger and unavly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.