अण्णांचा 'सत्याग्रह' कोणाच्या पथ्यावर पडेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 07:28 PM2018-03-27T19:28:09+5:302018-03-27T19:28:09+5:30

देशातील शेतकऱ्यांसाठी, पारदर्शक कामकाजासाठी सशक्त लोकपाल आणि निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी वयाच्या ८१ व्या वर्षी पुनश्च एकदा अण्णा हजारे दिल्लीच्या रामलीला मैदानात बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

Anna Hazare Andolan Protest against Modi government | अण्णांचा 'सत्याग्रह' कोणाच्या पथ्यावर पडेल

अण्णांचा 'सत्याग्रह' कोणाच्या पथ्यावर पडेल

Next

- अनिल गलगली
देशातील शेतकऱ्यांसाठी, पारदर्शक कामकाजासाठी सशक्त लोकपाल आणि निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी वयाच्या ८१ व्या वर्षी पुनश्च एकदा अण्णा हजारे दिल्लीच्या रामलीला मैदानात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. म्हणावी तशी गर्दी नाही, व्यवस्था नाही, नियोजन नाही आणि व्हीआयपी वर्दळ सुद्धा नाही. ही वस्तुस्थिती आहे . गर्दी शोधण्यासाठी निघालेल्या सत्ताधा-यांस , सर्वच राजकीय पक्षास, सोशल मीडियावर असलेले ट्रोलधारक आणि दिल्लीश्वरांस तेथे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहत अण्णाच्या एका हाकेसाठी जीव देण्यासाठी आलेल्यांची दर्दी दिसत नव्हती अशातील भाग नाही पण एकंदरीत संपूर्ण देशातील परिस्थिती अशी होत चालली आहे. मग यांचे काय बरोबर आहे आणि काय चुकले आहे? यावर भाष्य करणे गैर ठरेल. अण्णा हजारेंचे 'सत्याग्रह' आंदोलन नेमके कोणाच्या पथ्यावर पडेल हे आगामी काळात दिसून येईलच.

अण्णांच्या सत्याग्रह उपोषणाला दिल्लीला जाण्याचा संकल्प त्याच दिवशी राळेगणसिद्धी येथे घेतला जेव्हा अण्णाशी अर्धा तास चर्चा झाली होती. मुंबईतील मोठे बिऱ्हाड असलेल्या अनिल अंबानी आणि मुकेश अंबानीच्या खाजगी कंपनीने कसे शासनाचे देय शुल्क अदा केले नाही आणि महाराष्ट्र शासन त्यांच्यावर मेहरबान आहे, याबाबत अण्णानी कागदपत्रे मागितली होती. माझ्या सारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला अण्णांनी वेळ दिला आणि जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा ते आमच्या बाजूला आले आणि प्लस्टिकची खुर्ची ओढत बरोबर बसले. माझी ही पहिलीच व्यक्तिशः भेट आणि पहिल्याच भेटीत हे आपलेच अण्णा वाटू लागले. जाताना जेवून जा, असे आग्रहाने सांगत तश्या सूचनाही केल्यात. मुंबईच्या परतीच्या प्रवाशात निर्णय केला की दिल्लीला सत्याग्रह आंदोलनात एक मुंबईकर या नात्याने भाग घेत अण्णाला साथ देण्यासाठी तेथे उपस्थित राहणे गरजेचे आहे.

पहिल्या दिवशी सकाळीच रामलीला मैदानावर पोचल्यावर लक्षात आले की अण्णा राजघाट येथे प्रथम जाणार आहेत. पोलिसांचा प्रचंड ताफा त्यात तेथील सर्वच उच्चपदस्थ अधिकारी रामलीला मैदानावर अण्णा साठी उभारलेल्या मंडपाच्या चोहोबाजूंनी पाळीपाळीने भेट देत होते. अण्णांनी ज्यांस व्यवस्था आणि अन्य कामांची जबाबदारी दिली होती ते चोखपणे आपआपले कर्तव्य बजावित होते. अण्णा आणि त्यांच्या कोर टीम सहित निवडक लोकांना ओळखपत्र दिले होते त्यांस सर्वत्र प्रवेश होता. माझ्याकडे कोणतेही ओळखपत्र नसल्यामुळे मैदानाचे निरीक्षण चौफेर केले. यावेळी वेगवेगळया राज्यातून आलेल्या कार्यकर्त्यांचे संभाषण ऐकून सामाजिक आंदोलनाच्या काही बाबी प्रकर्षाने जाणवल्या आणि अनुभवात वाढ झाली यात शंकाच नाही.

कोलकता येथून आलेल्या एका कार्यकर्त्यास चोख व्यवस्था नसल्याचे दुःख होते आणि तो सर्वांकडे आशेने विचारत होता की आपण कोठून आलात आणि कोठे व्यवस्था आहे? सर्वांकडून जेव्हा काहीही सकारात्मक प्रतिसाद मिळणे कठीणच होते. त्यावेळी त्यांचे नैराश्य भरभरुन त्याच्या बोलण्यात समजले आणि चेहऱ्यावर झळकले. त्यावेळी एक शीख व्यक्ती ज्यांचे वय जवळपास ६५ असेल त्यांनी त्या बंगाली युवकांस विचारले की क्या गल्ल हैं? युवकांने आपली व्यथा मांडली असता शीख व्यक्तीने त्यांस धीर देत सांगितले की आम्ही पंजाब येथून आलो आहोत. असे बोलताच अजून एक वृद्ध शीख व्यक्ती आला आणि दोघांनी जवळ थांबलेल्या ट्रक कडे खुणावत सांगितले की 4 दिवसांची व्यवस्था आहे. जास्त गरज भासली तर अजून व्यवस्था करु पण या नालायक सरकारला झुकावल्याशिवाय येथून हटणार नाही. तू परत जाऊ नकोस. मैदानावर एका ठिकाणी बसलेल्या समूहाकडे खुणावत ते म्हणाले की तेथे जा, सामान ठेव. आम्ही सर्व शक्तीनिशी लढा देऊ. हे संभाषण एखाद्या कमजोर व्यक्तीला मनाने आणि शरीराने एक आगळीवेगळी ताकद देण्यासाठी पुरेसे आहे. आपल्याला आश्चर्य बसेल कारण दुसऱ्या दिवशी कोलकातातुन आलेला तो युवक चक्क मंचावर होता.

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5 च्या सुमारास जेव्हा अण्णांनी मीडिया सोबत सार्वजनिक पत्रकार परिषद घेतली तेव्हा एका पत्रकाराने प्रश्न उपस्थित केला की यापूर्वीच्या आंदोलनात आणि आताच्या आंदोलनात गर्दीचा फरक आहे. गर्दी नसल्याचा खोचक प्रश्न विचारताच जेव्हा अण्णांनी उत्तर दिले की यावेळी गर्दी नसली तरी काही फरक पडत नाही, जे जमले आहेत त्यांची दर्दी पहा. अण्णांच्या या उत्तराने एक नवीन हुरुप सर्वांना आला पण मला पुन्हा त्या शीख व्यक्तीत आणि कोलकातावरुन आलेल्या युवकांचे संभाषण आठवले. शीख व्यक्तीच्या बोलण्यात आणि क्रियेत जी दर्दी होती ती विलक्षण होती आणि रामलीला मैदानावर एकूण उपस्थितांपैकी 60 टक्के शीख बांधव होते. प्रश्न काय विचारावे आणि कोणत्या स्थानी विचारावेत? हाही एक प्रश्न आहे. एका पत्रकाराने चक्क विचारले की आंदोलनाची फंडिंग कोणी केले? असे एक नाही पुष्कळ प्रश्न होते ज्यावर हसावे की रडावे? असा प्रश्न उदभवला. कोण्याही जिगरबाजांनी हे विचारण्याचे धाडस केले नाही की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सतत लिहिलेल्या पत्रावर उत्तर का दिले नाही याबाबत आपले मत काय आहे? सत्याग्रहाचा इशारा दिल्यानंतर केंद्र सरकारने कोणते पाऊल उचलणे आवश्यक होते आणि आता केंद्र सरकारकडून काय नेमक्या अपेक्षा आहेत.

अण्णांच्या उपोषणावर उलट सुलट चर्चा करत सोशल मीडिया असलेले वाचाळवीर असोत किंवा विरोधी पक्षात असून कोणास विरोध करायचा असतो याचे भान नसलेला विरोधी पक्ष असो आणि प्रसिद्धीसाठी हपापलेला राजकीय दृष्टीने अपरिपक्व असलेला हार्दिक असो, सर्वांनी अण्णांस खलनायक ठरविले आणि स्वतःच्या अपयशाचे खापर फोडले तर यापूर्वी अण्णांच्या आंदोलनास सर्व बाजूनी पाठींबा देणारे सत्ताधारी याची आता काय गरज होती? असे प्रतिप्रश्न आणि विखारी प्रचार करत स्वतःच्या निवडणुकीतील आश्वासनावावर एकही चिक्कार शब्द न बोलता दुसरीकडे राज्यातील एका मंत्र्यांस अण्णांची बोळवण करण्याचा प्रयत्न ही करत होते. असे निर्ढावलेले सत्ताधारी आणि सत्ता हातातून गेल्याने दुःखात डुबलेल्या विरोधी पक्षांकडून अण्णा तर सोडाच या देशातील १२५ कोटी जनतेने अपेक्षा ठेवणे घातक ठरेल, ही वस्तुस्थिती असून अण्णा हजारेच्या मागण्या सरकारला नाईलाजाने मान्य यासाठी कराव्या लागतील कारण यात संपूर्ण समाजाच्या विविध बाबींचा समावेश असून देश बदलण्यासाठी जागतिक दौ-यांवर निघालेल्या मोदी सरकारला आपली गेल्या 4 वर्षातील चूक सुधारत पुन्हा गतिवान होण्यासाठी अण्णा हजारेंचे सत्याग्रह आंदोलन फायदेशीर ठरेल. अण्णांचे आजचे आंदोलन आणि भारतीय राजकारण याचा एकमेकांशी संबंध असून हे 'सत्याग्रह' कोणाच्या पथ्यावर पडेल, हे आगामी काळात कळेलच.
 

Web Title: Anna Hazare Andolan Protest against Modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.