वैविध्य जपणारी अन्नपूर्णा अभिनेत्री...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:23 AM2018-11-19T00:23:52+5:302018-11-19T00:24:26+5:30
लालन सारंग म्हणजेच आमच्या लालनतार्इंनी नाट्यसृष्टीसाठी झोकून दिले होते. कमलाकर सारंग यांच्या नावातला क, लालन या नावातला ला आणि सारंग या आडनावातला रंग;
- विजय कदम (ज्येष्ठ अभिनेते)
लालन सारंग म्हणजेच आमच्या लालनतार्इंनी नाट्यसृष्टीसाठी झोकून दिले होते. कमलाकर सारंग यांच्या नावातला क, लालन या नावातला ला आणि सारंग या आडनावातला रंग; अशी अक्षरे घेऊन त्यांनी त्यांच्या संस्थेचे नाव कलारंग ठेवले होते. १९८0 पासून मी त्यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली; परंतु ही माझी त्यांच्याशी पहिली ओळख नव्हे. त्याच्याही आधीपासून मी त्यांची नाटके शिवाजी मंदिरला पाहत आलो होतो.
त्यांच्या भूमिकांमध्ये प्रचंड वैविध्य होते. त्यांची सखाराम बार्इंडर या नाटकातली चंपा वेगळी होती; तर सूर्यास्तमधली त्यांची वृद्धा ही अतिशय वेगळ्या बाजाची होती. कमला असो किंवा रथचक्र; त्यांच्या भूमिका विविधता जपणाऱ्या होत्या. चंपा साकारताना त्यांच्यातल्या बंडखोरीचे दर्शन व्हायचे. या भूमिकेसाठी आवश्यक असलेला बेलगामपणा त्यांनी त्यांच्यात मुरवून घेतला होता. सत्तरीच्या दशकात अशी भूमिका पेलणे हे ग्रेट होते.
रथचक्रमध्ये मी त्यांच्या मुलाचे काम केले होते. यातल्या लालनताई आणि जंगली कबूतर या नाटकातल्या लालनताई या पूर्णत: वेगळ्या होत्या. रथचक्र मध्ये त्यांनी जशी भूमिका केली; त्याच्या अगदी उलट अशी भूमिका त्यांची सूर्यास्तमध्ये होती. या दोन भूमिकांमधले वैविध्य त्यांनी ज्या पद्धतीने दाखवले होते, त्याला तोड नाही. मला नाटकाचे नाव आठवत नाही; पण शंकर घाणेकर भूमिका करत असलेल्या एका नाटकात लालनताई आणि सुलभा देशपांडे यांनी चक्क विनोदी भूमिका रंगवल्या होत्या. या भूमिकेतून लालनतार्इंचा एक वेगळाच पैलू समोर आला.
नाटकांच्या दौºयांमध्ये लालनताई अधिक कळून चुकल्या. कमलाकर सारंग नसले; की आमची गाठ त्यांच्याशीच असायची. आमच्याशी त्या खूप गप्पा मारायच्या. काल तू ते असे केलेस, परवा तू तसे करायला हवे होतेस; अशा त्या टिप्स द्यायच्या आणि या टिप्स नक्कीच महत्त्वाच्या होत्या. लालनताई सांगणार ते चुकीचे सांगणार नाहीत, याविषयी आम्हाला खात्री होती. त्यांच्यासोबत काम करताना सुरुवातीला मला दडपण आले होते. कारण तो माझ्या उमेदवारीचा काळ होता; पण त्यांनी सर्वांनाच सांभाळून घेतले होते.
त्यांनी संघनायिका म्हणूनही उत्तम कामगिरी बजावली. त्यांच्या संस्थेच्या नाटकाच्या वेळी त्यांचा हा पैलू विशेष जाणवायचा. त्यांची पाककृती बनवण्याची हौसही प्रयोगानंतर प्रकट व्हायची. प्रयोग संपल्यावर त्या नाटकातल्या मंडळींसाठी काहीतरी पदार्थ बनवणे आणि तो सर्वांना खाऊ घालणे, हा त्यांचा एक उद्योगच असायचा. बरं, हे पदार्थ खाऊ घालताना त्यांनी कधी भेदभाव केला नाही. आमच्या चमूतल्या सर्व जणांना त्यांच्या हातचा खाऊ खायला मिळायचा. दोन प्रयोगांमध्ये वेळ असला की त्या आम्हाला खिलवण्यासाठी घरी घेऊन जायच्या. पण ते सर्व त्या आधी करूनच आलेल्या असायच्या. कदाचित या सगळ्यातूनच त्यांच्यात व्यावसायिकता आली असावी आणि त्यांनी त्यांचे हॉटेल काढले. मूळच्या त्या गोव्याच्या असल्याने त्या केवळ मांसाहारीच पदार्थ करत असतील असे वाटायचे; पण तसे ते नव्हते. त्यांनी बनवलेल्या शाकाहारी पदार्थांनाही त्यांच्या हाताची खास चव होती.
आम्ही त्यांना लालनताई अशी जरी हाक मारत असलो; तरी ती आम्हा सर्वांची आई होती. मायेपोटी, आपुलकीने त्या आमची काळजी घ्यायच्या. त्या आम्हाला अनेकदा फिरायलाही घेऊन जायच्या. मात्र नाटकांच्या तालमींमध्ये लालनताई आम्हाला खºया अर्थाने अधिक समजत गेल्या. त्या वेळी त्यांच्यात असलेली ऊर्जा शेवटपर्यंत तशीच होती.