अण्णांचा स्वप्नभंग
By admin | Published: September 8, 2016 04:40 AM2016-09-08T04:40:17+5:302016-09-08T04:40:17+5:30
आपले शिष्य असूनही अरविंद केजरीवालसुद्धा ‘त्याच वळणावर’ जावेत आणि त्यांच्या सभोवती घोटाळेबाजांचा राबता असावा याचे अण्णा हजारे यांना परम दु:ख झाल्याचे त्यांनीच बोलून दाखविले आहे
आपले शिष्य असूनही अरविंद केजरीवालसुद्धा ‘त्याच वळणावर’ जावेत आणि त्यांच्या सभोवती घोटाळेबाजांचा राबता असावा याचे अण्णा हजारे यांना परम दु:ख झाल्याचे त्यांनीच बोलून दाखविले आहे आणि त्यांना तसे वाटणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. काँग्रेस राजवटीत अण्णा हजारे यांच्या उपोषणास्त्राने केन्द्रातील संपुआचे आणि महाराष्ट्रातील आघाडीचे अशी दोन्ही सरकारे पुन:पुन्हा घायाळ होत होती. अण्णांना सावरणे हा तेव्हांचा त्या दोन्ही सरकारांचा मोठा कटकटीचा पण तरीही प्राधान्याचा विषय बनला होता. हजारे यांना दोन्ही आणि विशेषत: केन्द्रातील सरकार वचकून राहाते हे ज्ञात झाल्यानंतर ज्या अनेकांचा अण्णांना गराडा पडला त्यात किरण बेदी, अण्णा हजारे, भूषण पितापुत्र असे अनेक होते. यातील केजरीवाल मूलत: सनदी नोकर असल्याने लोकांच्या माहितीचे असण्याचे काही कारणच नव्हते. अण्णांच्या सान्निध्यात राहिल्याने त्यांना ओळख प्राप्त झाली. एकदा ती झाल्यावर मग केजरीवाल यांनी त्यांच्या सुप्त मनातील कार्यक्रमाला उजेडात आणण्यास सुरुवात केली. हा कार्यक्रम होता सक्रीय राजकारणात प्रवेश करुन सत्ताकारणास प्रारंभ करण्याचा. हजारे यांना ते अजिबातच मान्य नव्हते. सरकारबाहेर राहून सरकारवर सतत अंकुश ठेऊन आपण लोकांचे जेवढे भले करु शकतो तेवढे सरकारात जाऊन वा स्वत: सरकार बनवून करु शकत नाही, ही त्यांची मानसिकता होती. साहजिकच हजारे आणि केजरीवाल यांचे रस्ते तिथेच वेगळे झाले. केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीची स्थापना केली आणि एकदा नव्हे दोनदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता त्यांच्या ताबडतोबीच्या लक्ष्यावर पंजाब आणि गोवा ही राज्ये आहेत. पण तिकडे दिल्लीत त्यांच्या पक्षाचे सुमारे अर्धा डझन आमदार आणि पाव डझन मंत्री गैरव्यवहार ते गैर वर्तणूक अशा आरोपांमध्ये अडकले आहेत. अण्णांच्या दु:खाचे तेच महत्वाचे कारण आहे. केजरीवाल यांचे प्रारंभ काळातील सहकारी व आजचे टीकाकार योगेन्द्र यादव यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करताना केजरीवालांनी अण्णांना कधी गांभीर्याने घेतलेच नाही असे म्हटले आहे. याचा अर्थ अण्णा हजारे केजरीवालांना त्यांचा शिष्योत्तम धनुर्धारी चक्रधर श्रीकृष्ण मानीत असले म्हणून केजरीवाल अण्णांना सांदिपनी मानतात असे नाही.