भाष्य - अज्ञ प्रकाश आमटे?
By admin | Published: January 10, 2017 12:30 AM2017-01-10T00:30:18+5:302017-01-10T00:30:18+5:30
ज्याला अति मागास म्हणून नेहमीच हिणवले जाते, त्या बिहार राज्यात जर संपूर्ण दारुबंदी होऊ शकते, तर मग महाराष्ट्रात ती का होऊ नये, असा प्रश्न
ज्याला अति मागास म्हणून नेहमीच हिणवले जाते, त्या बिहार राज्यात जर संपूर्ण दारुबंदी होऊ शकते, तर मग महाराष्ट्रात ती का होऊ नये, असा प्रश्न डॉ. प्रकाश आमटे यांना पडला असून तो अज्ञानमूलक आहे, असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्रात दारुबंदी नाही हे त्यांना कोणी आणि कसे सांगितले बरे? आता संपूर्ण आणि अपूर्ण हा घोळ घालण्यात अर्थ नाही. हुंड्याच्या प्रथेवर, बालविवाहावर, सती जाण्यावर संपूर्ण बंदी आहेच की म्हणून हे सारे प्रकार थांबले असे थोडेच आहे? परवा एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांच्या दरम्यान दारुबंदीच्याच विषयावर जे ‘अहो रुपम, अहो ध्वनि:’ झाले त्यातील मोदींच्या गुजरातेत संपूर्ण दारुबंदी लागू झाली आहे असे म्हणणे म्हणजे दंतकथेला प्रोत्साहित करण्यासारखे आहे. महाराष्ट्रातून गुजरातेत प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर जी दारुची दुकाने आहेत, त्यांची विक्री एकदा आमटे यांनी जातीने तपासून पाहावीत म्हणजे सारा उलगडा होऊन जाईल. पण सध्या मुद्दा महाराष्ट्राच्या दारु आणि तिच्यावरील बंदीचा आहे. तर महाराष्ट्रात ती आहेच. कोणालाही दारु विकत घेणे, बाळगणे, वाहून नेणे आणि प्राशन करणे या बाबी वैध परवाना असल्याखेरीज करण्यावर संपूर्ण बंदी आहे. उत्पादन शुल्क खात्याच्या विद्यमान आयुक्तांनी अलीकडेच या बाबींवरदेखील काही मर्यादा घातल्या आहेत. याचा थोडक्यातला अर्थ इतकाच की महाराष्ट्रात वैध परवाना असल्याखेरीज दारुचा थेंबदेखील मिळू शकत नाही आणि त्याचे संपूर्ण श्रेय बाळासाहेब भारदे आणि विठ्ठलराव पागे या महाराष्ट्रातीलच आता दिवंगत थोर गांधीवादी नेत्यांकडे जाते. एरवी राज्याचे प्रथम मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सत्तरच्या दशकात दारुबंदीचे धोरण मोडीत काढण्याचा व दारु पूर्णपणे बंधमुक्त करण्याचा निर्णय घेतला तेव्हां या दोघांनीच तसे करु नका, पिणाऱ्याला ती पिऊ द्या पण परवाना ठेवा असा आग्रह धरला. तेव्हां दारुबंदी आहे हो!