भाष्य - अण्णा, थोडं थांबा !
By admin | Published: March 31, 2017 12:13 AM2017-03-31T00:13:11+5:302017-03-31T00:13:11+5:30
लोकपाल कायदा होऊनदेखील त्याची अंमलबजावणी झालेली नाही. हा जनतेच्या भावनांचा अपमान असून, लोकपालसाठी पुन्हा
लोकपाल कायदा होऊनदेखील त्याची अंमलबजावणी झालेली नाही. हा जनतेच्या भावनांचा अपमान असून, लोकपालसाठी पुन्हा आंदोलन करण्याची गरज निर्माण झाली आहे. माझं मन मला सांगतंय, आंदोलन कर, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचे सूतोवाच केले आहे. मोदी सरकार येऊन तीन वर्षे झाली तरी देशातील भ्रष्टाचार थांबलेला नाही, असंही निरीक्षण अण्णांनी नोंदविले आहे. आंदोलन करावं की नाही, हा सर्वस्वी अण्णांचा वैयक्तिक मामला आहे. अण्णांनी त्यांच्या अंतर्मनाचा आवाज ऐकून आंदोलन उभारलं तरी त्यास कोणाची हरकत असण्याचे कारण नाही. पण गेल्या तीन-चार वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. भ्रष्टचाराच्या विरोधात अण्णांनी आजवर मोठा लढा दिलेला आहे. २०११ साली दिल्लीत रामलीला मैदानावर ऐतिहासिक असे आंदोलन उभे केले. ज्याची दखल ‘टाइम’सारख्या जागतिक माध्यमांनी घेतली. अण्णांच्या या आंदोलनामागे ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ आणि ‘टीम अण्णा’च्या बॅनरखाली अरविंद केजरीवाल, किरण बेदी, योगेंद्र यादव, भूषण पितापुत्र आणि असंख्य ज्ञात-अज्ञातांचे पाठबळ होते. शिवाय, ‘मी अण्णा’ अशा टोप्या परिधान केलेला आणि कथित नागरी समाजाच्या नावाखाली उदयाला आलेला मेणबत्ती पंथही होता. ज्यांनी आजवर गांधी नावाच्या माणसाचा कमालीचा तिरस्कार केला, त्यांनीच अण्णांचा ‘दुसरे गांधी’ म्हणून उदोउदो केला. पण अण्णांच्या या जागरात सामील झालेल्या प्रत्येकाचे ईप्सित काही वेगळेच होते, हे कालांतराने सिद्ध झाले. केजरीवाल, बेदी, व्ही.के. सिंग आदिंनी आपापली राजकीय पोळी शेकून घेतली, तर भाजपादी पक्षांनी तत्कालीन संपुआ सरकारच्या विरोधात जनमत निर्माण करण्यासाठी अण्णांच्या आंदोलनात हवा भरली. अण्णा, रामलीला मैदानावर उपोषणाला बसलेले असताना सुषमा स्वराज यांनी संसदेत केलेले घाणाघाती भाषण अनेकांना आठवत असेल. देशातील प्रसारमाध्यमांनी तर अण्णांना अवतारी पुरुष बनवून टाकले होते. आज अण्णांनी पुन्हा आंदोलन उभारले तर, हे सगळे पुन्हा घडून येईल का? शंकाच आहे. कारण, तेव्हाचा मेणबत्ती पंथ आता मोदींचा भक्त बनलेला आहे. केजरीवाल, सिसोदिया, बेदी, सिंग आदिंनी राजकीय चूल मांडली असल्याने ते अण्णांच्यासोबत येण्याची शक्यता दिसत नाही. मीडिया अण्णांच्या मागे उभा राहील, याचीही शाश्वती देता येत नाही. शिवाय, मोदींच्या विरोधात ब्र ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत मोदीभक्त युवक तयार नाही.
अण्णांनी मोदी सरकारवर वहीम ठेवलाच, तर लागलीच समाजमाध्यमातून त्यांच्या प्रतिमाहननाची मोहीम सुरू होईल. वेळप्रसंगी आंदोलनही उधळून लावले जाईल. अण्णांचा वापर संपुआ सरकार घालविण्यासाठी केला गेला म्हणून काँग्रेसवाले अण्णांच्या आंदोलनात सहभागी होतील, शंकाच आहे. आणि जरी राहिले तरी त्यांच्यावरील डाग अजून धुतला गेलेला नाही. त्यामुळे तसाही काही फायदा नाही. तात्पर्य, आंदोलन करण्यापूर्वी अण्णांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला बरा.