भाष्य - बिथरलेला सलाहुद्दिन

By admin | Published: July 6, 2017 01:09 AM2017-07-06T01:09:30+5:302017-07-06T01:09:30+5:30

अमेरिकेने जागतिक दहशतवादी जाहीर केल्यामुळे हिजबुल मुजाहिदिन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दिन प्रचंड बिथरला आहे

Annotation - Bitrled Salahuddin | भाष्य - बिथरलेला सलाहुद्दिन

भाष्य - बिथरलेला सलाहुद्दिन

Next

अमेरिकेने जागतिक दहशतवादी जाहीर केल्यामुळे हिजबुल मुजाहिदिन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दिन प्रचंड बिथरला आहे. एका पाकिस्तानी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने भारताविरुद्ध जी आग ओकली त्यावरून त्याचा झालेला थयथयाट लक्षात येतो. भारतातील हल्ल्यांबाबत त्याने दिलेल्या कबुलीने नेहमी ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेणारा पाकिस्तान पुन्हा एकदा ‘नापाक’ ठरला आहे. भारतातील दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानच्या भूमीचा सर्रास वापर केला जातो हे सुद्धा त्याच्या बरगळण्यावरून सिद्ध झाले आहे. भारतीय सुरक्षा दल हे हिजबुल मुजाहिदीनचे लक्ष्य असून त्या देशात आम्ही केव्हाही आणि कुठेही हल्ला करुन शकतो, अशी वल्गना या दहशतवादी म्होरक्याने केली आहे. काश्मीरला स्वत:चे घर सांगताना भारतात आपले असंख्य समर्थक असल्याचा त्याचा दावा आहे. खरे तर सलाहुद्दिन हा दहशतवादी असल्याचे भारताने यापूर्वीच सांगितले होते. परंतु नेहमीप्रमाणे पाकने ते फेटाळून लावले. एवढेच नाहीतर त्याला दहशतवादी जाहीर करणे हा अन्याय असल्याचेही शेजारील देशाचे म्हणणे आहे. सध्या पाकव्याप्त काश्मिरात दडून बसलेला हिजबूलचा हा म्होरक्या हिजबूलसोबतच युनायटेड जिहाद कौन्सिल ही संघटनाही चालवितो. याच कौन्सिलने पठाणकोट हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती, हे उल्लेखनीय. सलाहुद्दिन हा पाकिस्तानातील आपल्या ठिकाणावरुन जम्मू-काश्मिरात दहशतवादी कारवाया घडवित असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी आधीच दिली आहे. त्याची पुष्टी खुद्द सलाहुद्दिननेच केल्याने पाकिस्तान तोंडाच्या भारावर आपटला असून त्याने सलाहुद्दिनला इतरत्र हलविण्याच्या हालचालीही सुरू केल्या आहेत. पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांचे नंदनवन असल्याचे आता संपूर्ण जगाला माहिती झाले आहे. दाऊद असो, हाफिज सईद वा सलाहुद्दिन पाकने नेहमीच या दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. त्याची परिणती म्हणजे आज इतर देशांसोबतच पाकलाही दहशतवादाची झळ बसू लागली आहे. ज्या दहशतवाद्यांना पाकने एवढे वर्ष पोसले तेच आता त्याच्यावर उलटले आहेत; हे अलीकडच्या काळात त्या देशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांतून दिसून येते. तेव्हा आतातरी पाक सरकारने दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबविले पाहिजे. परंतु कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे असे म्हणतात त्याप्रमाणे पाकचीही यातून धडा घेण्याची मानसिकता दिसत नाही. दहशतवादाच्या समूळ उच्चाटनाशिवाय आपल्या देशात आणि जगातही शांतता नांदणार नाही, हे पाकला केव्हा कळणार?

Web Title: Annotation - Bitrled Salahuddin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.