भाष्य - निर्लज्जपणाचा कळस

By admin | Published: May 31, 2017 12:17 AM2017-05-31T00:17:19+5:302017-05-31T00:17:19+5:30

बेताल वक्तव्य करणाऱ्यांची जमात केवळ एकट्या भारतातच आहे असे नव्हे तर साऱ्या जगात ती पसरली आहे. अशा उपटसुंभांमध्ये बहुतांश

Annotation - The climax of shamelessness | भाष्य - निर्लज्जपणाचा कळस

भाष्य - निर्लज्जपणाचा कळस

Next

बेताल वक्तव्य करणाऱ्यांची जमात केवळ एकट्या भारतातच आहे असे नव्हे तर साऱ्या जगात ती पसरली आहे. अशा उपटसुंभांमध्ये बहुतांश वेळेला राजकीय नेतेच आघाडीवर असतात असेही आपण बघतो. अशा वावडूक नेत्यांना सत्तेची एवढी नशा चढलेली असते की, आपण काहीही बोललो तरी लोक ते शिरसावंद्य मानतील अशा भ्रमात ते जगत असतात. फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो डुटेर्टे हे अशाच नेत्यांपैकी एक म्हणून जगभरात कुपरिचित आहेत. महिलांवरील बलात्काराच्या विषयावरही त्यांना विनोद करावासा वाटतो. असेच एक बेभान आणि अपमानास्पद वक्तव्य करून त्यांनी निर्लज्जपणाचा कळसच गाठला आहे. एखाद्या सैनिकाने तीन महिलांवर बलात्कार केल्यास त्याची जबाबदारी मी माझ्या शिरावर घेईल, अशी फुशारकी मारत त्यांनी आपल्या देशातील सैनिकांना तीन महिलांवर बलात्कार करण्याची मुभाच देऊन टाकली आहे. दक्षिण फिलिपिन्समधील काही शहरांमध्ये सध्या मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे. यावेळी सैनिकांना उद्देशून भाषण देताना डुटेर्टे यांनी मार्शल लॉच्या काळात तुम्हाला कोणत्याही घरात घुसून चौकशीचे अधिकार आणि तीन महिलांवर बलात्कार करण्याची मुभा आहे. तुम्ही तीन महिलांवर बलात्कार केल्यास तुमच्या जागी मी स्वत: तुरुंगात जाईन असे म्हटले आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानाचे जगभरात पडसाद उमटले आहेत. फिलिपिन्स राष्ट्राध्यक्षांचे हे विधान म्हणजे विनोदाचे अत्यंत घृणास्पद रूप असल्याची टीका मानवाधिकार कार्यकर्त्यांनी केली आहे. तर बलात्कार हा कधीही विनोदाचा विषय असू शकत नाही. ते एक खुनी दरोडेखोर असून, त्यांचा मानवाधिकाराशी कुठलाही संबंध नाही, अशा शब्दात अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या कन्या चेल्सी यांनी निषेध नोंदविला आहे. महिलांच्या अस्मितेची अशी खिल्ली उडविणाऱ्या डुटेर्टे यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. यापूर्वीही १९८९ साली त्यांनी फिलिपिन्सच्या तुरुंगात एका आॅस्ट्रेलियन महिलेचा बलात्कार आणि हत्या झाली असताना अशीच मुक्ताफळे उधळली होती. शहराचा महापौर या नात्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा पहिला मान मला मिळायला हवा होता असे ते बरळले होते. महिलांप्रति किंचितही सन्मान न बाळगणारा, बलात्कारासारख्या गंभीर विषयाची अशाप्रकारे खिल्ली उडविणारा माणूस राष्ट्राध्यक्ष होतोच कसा याचेच आश्चर्य वाटते. सत्तेसोबत शहाणपणही असणे गरजेचे असते हे या डुटेर्टेंना कोण सांगणार? अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांनाच हवे असते. पण या स्वातंत्र्याचा उपभोग घेताना आत्मसंयम आणि आत्मनियंत्रण पाळणेही महत्त्वाचे असते. याचे भान प्रत्येक व्यक्तीने मग ती राष्ट्राध्यक्ष असली तरीही ठेवले पाहिजे.

Web Title: Annotation - The climax of shamelessness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.