भाष्य - अंदाज हवामानाचा
By admin | Published: March 27, 2017 12:16 AM2017-03-27T00:16:34+5:302017-03-27T00:16:34+5:30
सरकारचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मुंबईसह भारतात काही वर्षांपासून पर्यटन व्यवसाय बहरत आहे. पण अनेकदा हवामान
सरकारचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मुंबईसह भारतात काही वर्षांपासून पर्यटन व्यवसाय बहरत आहे. पण अनेकदा हवामान बदलामुळे सागरी पर्यटन, डोंगराळ भागातील तीर्थयात्रा व हिल स्टेशनवरील पर्यटन व्यवसायाचे नुकसान टाळण्यासाठी मोबाइल अॅपच्या माध्यमातून हवामान बदलाचे पूर्वानुमान दिले जाणार आहे. हे अॅप पर्यटक आणि पर्यटनस्थळावरील व्यावसायिकांच्या सोयीचे होणार आहे. औरंगाबाद ही तशी पर्यटनाचीही राजधानी समजली जाते. बीबी का मकबरा, पाणचक्कीसह शहरापासून जवळ असलेला दौलताबादचा किल्ला, वेरूळची लेणी, पांडव लेणी, अजिंठ्याची लेणी ही सर्व स्थळे पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येथे येतात. पर्यटकांचा येण्याचा काळ म्हणजे हिवाळा. साधारण आॅक्टोबरपासून तो सुरू होतो. गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात ३ लाख २० हजार ४४ भारतीय, तर पाच हजार ९४२ विदेशी पर्यटकांनी या स्थळांना भेट दिली. नोव्हेंबर महिन्यात ८ हजार ८३९ विदेशी पर्यटकांची स्थळांना भेट दिली. यावर्षी आॅक्टोबरमध्ये ५ हजार ७१० आणि नोव्हेंबरमध्ये ६ हजार ८०० विदेशी पर्यटकांनी भेट दिली. हवामान बदलाची सूचना देणाऱ्या या अॅपचा सर्वांना फायदाच होणार आहे. हवामान खात्याने घेतलेला हा पुढाकार निश्चितच प्रशंसनीय आहे. मात्र, हवामान बदलामुळे गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तीन वर्षांपासून सलग अवकाळीचा फटका बसत आहे. या गारपिटीतून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, त्यांचा माल खराब होऊ नये म्हणून सरकारने काय केले? आपल्याकडे हवामान खात्याचा अंदाज सर्वांनाच ठाऊक. आज पाऊस पडणार असे हवामान खात्याकडून ज्या दिवशी सांगितले जाते त्या दिवशी आकाश स्वच्छ राहणार, हे सर्वांनीच गृहीत धरलेले असते. अनेक वर्षांच्या अनुभवानेच हे शहाणपण आले आहे. असे हे हवामान खात्याचे अॅप पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिकांना किती लाभदायक ठरेल, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. त्यामुळे हवामान खाते आणि सरकारने हवामानाचा अंदाज देताना जसे शेतकऱ्याला गृहीत धरले, तसे विदेशी पर्यटकांना गृहीत धरू नये एवढेच.