भाष्य - साथी हाथ बढाना...!

By admin | Published: July 5, 2017 12:19 AM2017-07-05T00:19:59+5:302017-07-05T00:19:59+5:30

व्यापक जनहिताची सार्वजनिक कामे करणे ही केवळ सरकार किंवा प्रशासनाचीच जबाबदारी नाही तर आपलीसुद्धा आहे, अशी भावना ठेवून

Annotation - Increasing partner hands ...! | भाष्य - साथी हाथ बढाना...!

भाष्य - साथी हाथ बढाना...!

Next

व्यापक जनहिताची सार्वजनिक कामे करणे ही केवळ सरकार किंवा प्रशासनाचीच जबाबदारी नाही तर आपलीसुद्धा आहे, अशी भावना ठेवून ‘साथी हाथ बढाना’ या उक्तीप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेतला तर काय घडू शकते हे धुळे जिल्ह्यातील घटबारी धरणात अलीकडेच झालेल्या जलसाठ्यातून दिसून येते. मुळातच कमी पावसाच्या साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील रोहिणी नदीवरचे हे छोटे धरण. १६० ते १७० टीएमसी एवढाच त्याचा पाणीसाठा आणि १२०० एकराचे सिंचन क्षेत्र. खुडाणे, निजामपूर, जैताणे व आखाडे गावच्या शेतकऱ्यांसाठी आशास्थान. गेल्या वर्षी ३ आॅक्टोबरला अतिवृष्टी झाली, नदीला पूर आला, त्यात घटबारी धरणाचा बांध वाहून गेला. प्रचंड नुकसान झाले. परंतु आता धरणाला बांधच नसल्याने पाणी साठणार कुठे व कसे, हा खरा प्रश्न होता. शासनदरबारी पाठपुरावा सुरू झाला. अधिकारी येऊनसुद्धा गेले, पाहणी झाली, पंचनामे झाले, काही शेतकऱ्यांना अल्पशी मदतसुद्धा मिळाली; परंतु धरणाच्या पुनर्निर्माणाचा जो मुख्य प्रश्न होता त्याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नव्हते. ५६ लाख रुपये खर्च येणार होता. पण उन्हाळा आला तरी शासन दरबारी कुणीच पुकार घेईना. अशा वेळी खुडाणे, निजामपूर, जैताणे व आखाडे परिसरातील ग्रामस्थच एकत्र आले. त्यांनी शासकीय मदतीवर अवलंबून न राहता स्वत:च लोकसहभाग व श्रमदानातून धरणाच्या पुनर्निर्माणाचा विडा उचलला आणि मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात २१ मे रोजी आबालवृद्ध असे सुमारे साडेतीनशे ग्रामस्थ हातात टिकम, कुदळ, फावडे असे साहित्य घेऊन धरणाच्या पात्रात उतरले आणि घटबारी धरणाच्या लोकसहभागातून पुनर्निर्माणाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी तहसीलदार, ग्रामसेवक असे शासकीय प्रतिनिधीसुद्धा सहभागी झाले. लोकांचा हा उत्स्फूर्त पुढाकार बघून खुडाणे येथील ट्रॅक्टरमालक व चालकांनीसुद्धा मोफत सेवा दिली, अनुलोम लोकराज्य संघटनेने तांत्रिक सहकार्य व मार्गदर्शन दिले आणि पंचायत समिती सदस्य, सरपंचांसह अनेकांनी मदतीचे हात दिले. त्यामुळे बघता बघता ठरल्याप्रमाणे जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्याच्या आतच घटबारी धरणाचा बांध पुन्हा उभा राहिला. योगायोगाने माळमाथ्यावर दमदार पाऊसही झाला, रोहिणी नदीला पूरही आला आणि घटबारी धरणात समाधानकारक जलसाठा झाला. ते पाहून भविष्याची चिंता मिटल्याच्या आनंदात अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले आणि शासनावरच अवलंबून न राहता स्वत:च्या पुढाकारानेसुद्धा किती मोठे काम विनासायास होऊ शकते याची प्रचिती आली.

Web Title: Annotation - Increasing partner hands ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.