भाष्य - नैतिकतेचा ऱ्हास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2017 12:19 AM2017-02-22T00:19:56+5:302017-02-22T00:19:56+5:30
पूर्वीच्या काळी राजकीय नेते बोलण्याआधी विचार करायचे, हल्लीचे राजकारणी विचार करून बोलणे तर सोडाच
पूर्वीच्या काळी राजकीय नेते बोलण्याआधी विचार करायचे, हल्लीचे राजकारणी विचार करून बोलणे तर सोडाच बोलूनही विचार करताना दिसत नाही. इतकी निगरगठ्ठता आणि वैचारिक अध:पतन झाल्याचा प्रत्यय महाराष्ट्रासह अन्य राज्यातील निवडणुकातूनही येऊ लागला आहे. सत्तासंघर्ष केवळ आताच पहायला मिळतो, अशातला भाग नाही. तो पूर्वापार चालत आलेला आहे. पूर्वी त्यास वैचारिकतेचे आणि नैतिकतेचे अधिष्ठान जरूर होते. विचारांचे विचारांशी केलेले ते शाब्दिक युद्ध असायचे. पक्षीय ध्येयधोरणांवर व सरकारच्या यशापयशावर आरोप-प्रत्त्यारोप व्हायचे. वैयक्तिक आरोपांना त्याठिकाणी थारा नसायचा. आताच्या निवडणुकांनी आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या प्रचारांनी अत्यंत किळसवाणे, लाजिरवाणे आणि घृणास्पद असे वळण घेतले आहे. यातून राजकारणातील नैतिकतेचा ऱ्हास झाल्याचे तर अधोरेखित होतेच, त्याचसोबत केवळ सत्तेसाठी राजकारणी कोणत्या थराला जाऊ शकतात याचे दर्शनही जनतेला घडते. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना गेल्या दोन दशकाहून अधिक काळ वरकरणी युतीच्या नावाखाली सोयीचे राजकारण करीत आल्याचे जनतेने पाहिले आणि अनुभवले आहे. सध्या तर शिवसेना सत्तेत राहूनही विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. एकीकडे केंद्र आणि राज्यात सत्तेत वाटेकरी असताना दुसरीकडे परस्परांवर आरोप करीत राहायचे हे भल्याभल्यांना आजवर न उलगडणारे कोडे आहे. यावेळच्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये हे दोन पक्ष बेरजेच्या गणितावरून विभक्त झाले त्यादिवसापासून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. कोण कोणाची औकात काढतो तर कोण जबड्यात हात घालून दात मोजायची भाषा करतो. केवळ खुर्चीसाठी गल्लीतल्या दोन लहान मुलांसारखे भांडणाऱ्या या नेत्यांनी सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात असंस्कृतपणाचे दर्शन घडविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशातील नेते आरोप-प्रत्त्यारोपाच्या फैरी डागण्यात तसूभरही मागे राहिलेले नाहीत. मोदी म्हणतात, ‘ही तर बहेनजी संपत्ती पार्टी’, मायावती म्हणतात, ‘मोदी म्हणजे निगेटिव्ह दलित मॅन’. यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव हे बिग बी अमिताभला ‘गुजरातच्या गाढवांसाठी जाहिरात करू नका’ असा सल्ला देतात. एकंदरीत या सर्व नेतेमंडळींची भाषणे ऐकली आणि पाहिली तर राजकारणाचा प्रवास कोणत्या दिशेकडे मार्गक्रमण करतो आहे, हे दिसून येते. सभा वैचारिक मुद्द्यांवर जिंकता आल्या पाहिजेत. वैयक्तिक शिंतोडे उडवून आणि नकला करून श्रोत्यांचे केवळ मनोरंजन घडविता येते, जनमत जिंकता येत नाही. पण त्यांना हे सांगणार कोण?