भाष्य - अघळपघळ पर्रीकर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2017 12:07 AM2017-07-03T00:07:10+5:302017-07-03T00:07:10+5:30

माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अघळपघळ बोलण्याच्या त्यांच्या सवयीमुळे बरेचदा अडचणीत आले आहेत; मात्र

Annotation Parrikar! | भाष्य - अघळपघळ पर्रीकर!

भाष्य - अघळपघळ पर्रीकर!

Next

माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अघळपघळ बोलण्याच्या त्यांच्या सवयीमुळे बरेचदा अडचणीत आले आहेत; मात्र ते काही त्यापासून धडा घेण्यास तयार नाहीत, असे दिसते. पर्रीकर संरक्षण मंत्री असताना, गतवर्षी २९ सप्टेंबर रोजी भारताने पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केले होते. दहशतवाद्यांनी १८ सप्टेंबर २०१६ रोजी काश्मीरमधील उरी येथील लष्करी छावणीवर हल्ला चढवून १९ भारतीय सैनिकांचे प्राण घेतले होते. त्याचा बदला म्हणून पाकिस्तानात घुसून बदला घेतल्याचे नरेंद्र मोदी सरकारने जाहीर केले होते. पाकिस्तानने अर्थातच तो दावा नाकारला होता. आता जवळपास वर्षभरानंतर पर्रीकर यांनी त्या घटनेसंदर्भात जे भाष्य केले आहे, त्यामुळे मोदी सरकार आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाचीच एकप्रकारे कोंडी झाली आहे. गोव्यात उद्योगपतींच्या संमेलनास संबोधित करताना, पर्रीकर यांनी असे वक्तव्य केले, की त्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ची तयारी १५ महिने आधीपासूनच सुरू होती. पर्रीकर यांचे हे वक्तव्य खरे असल्यास त्याचा दुसरा अर्थ हा होतो, की ‘सर्जिकल स्ट्राईक’ उरी दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून करण्यात आले नव्हते. पर्रीकर तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर एका वृत्त वाहिनीवरील निवेदकाने माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांना विचारलेल्या प्रश्नामुळे व्यथित होऊन आपण पाकिस्तानात ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याचा निर्णय घेतला होता, असेही सांगून ते मोकळे झाले. देशाला युद्धाच्या खाईत ढकलू शकणारे निर्णय केवळ एका वृत्त निवेदकाच्या प्रश्नामुळे दुखावून घेतल्या जात असतील, तर या सरकारच्या हाती देश खरेच सुरक्षित आहे का, असा प्रश्न उद्या विरोधकांनी उपस्थित केल्यास, मोदी सरकार आणि भाजपाची चांगलीच पंचाईत होईल. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक गोष्टी या हाताचे त्या हाताला न कळू देता उरकून टाकायच्या असतात आणि उरकल्यानंतर त्याबाबत चुप्पी साधायची असते. दुर्दैवाने मोदी सरकार सत्तेत आल्यापासून या सामान्य व्यवहारज्ञानाची सातत्याने वानवा जाणवत आहे. मोदी सरकारमधील हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या प्रज्ञावंत मंत्र्यांमध्ये पर्रीकर यांचा समावेश होत असे. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल विरोधकही शंका घेत नाहीत. असे असतानाही त्यांची पुन्हा गोव्याच्या मुख्यमंत्री पदावरून रवानगी होण्यामागे, त्यांचे अघळपघळ बोलणेच कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे; मात्र पर्रीकर यांनी त्यापासून काही धडा घेतला असावा, असे काही त्यांचे ताजे वक्तव्य बघता वाटत नाही.

Web Title: Annotation Parrikar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.