भाष्य - प्रदूषणाचा धूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2017 12:36 AM2017-02-24T00:36:51+5:302017-02-24T00:36:51+5:30

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०११ ते २०१५ या काळात केलेल्या सर्वेक्षण आणि चाचण्यात

Annotation - Pollution Smoke | भाष्य - प्रदूषणाचा धूर

भाष्य - प्रदूषणाचा धूर

Next

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०११ ते २०१५ या काळात केलेल्या सर्वेक्षण आणि चाचण्यात राज्यातील १७ शहरांतील हवेत ‘पार्टिक्युलेट मॅटर १०’ या प्रदूषित घटकाचे प्रमाण निश्चित पातळीपेक्षा अनेक पटीने जास्त असल्याचे आढळून आले आहे. सतरा शहरांमध्ये मुंबईसह नवी मुंबईचा समावेश आहे. या मेगासिटीमधील प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. आणि प्रदूषणाचे हे प्रमाण वाढत असताना आपण ज्या नवी मुंबईला ‘स्मार्ट सिटी’ करणार आहोत; तेथेही प्रदूषण वाढतच राहिले तर पुढील पिढ्या मागील पिढ्यांना दोष देण्याशिवाय काहीच करू शकणार नाही. कारण तोवर वाढत्या प्रदूषणासह ओझोनचा थर घटलेला असेल आणि सुरू झालेल्या पृथ्वीच्या अस्ताच्या क्लायमॅक्सने संपूर्ण मानवजातीला गिळंकृत केलेले असेल. केंद्राच्या सर्वेक्षणानुसार, देशातील सर्वाधिक प्रदूषित ९४ शहरांमध्ये महाराष्ट्रातील १७ शहरांचा समावेश आहे. मुंबईसह नागपूर, नवी मुंबई, उल्हासनगर, बदलापूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, लातूर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि जळगाव या राज्यातील १७ शहरातील हवा आरोग्यासाठी हानिकारक आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत मोटारींमुळे शहरात दररोज तब्बल ९०० टन वायुप्रदूषण होत आहे. उद्योग आणि वाहने हे दोन घटक वायुप्रदूषणात सातत्याने भर घालत आहेत. त्यातील ८० टक्के प्रदूषण हे मोटारींमुळे होत आहे. याचे कारण म्हणजे संबंधित ठिकाणांवरील वाढती लोकसंख्या, बांधकाम प्रकल्प, कारखाने आणि उर्वरित घटक होय. महाराष्ट्रानंतर प्रदूषणात उत्तर प्रदेशचा नंबर आहे. उत्तर प्रदेशातील पंधरा शहरे सर्वाधिक प्रदूषित आहेत. पंजाबमधील आठ, हिमाचल प्रदेशामधील सात शहरांचा समावेश आहे. गुजरातमधील सूरत, तामिळनाडूमधील तुतीकोरीन, कर्नाटकातील चार आणि आंध्र प्रदेशातील पाच शहरे प्रदूषित असल्याचे सर्वेक्षणात नमूद आहे. आता आपण विकासाच्या अथवा ‘स्मार्ट’ सिटीच्या किती गप्पा मारत असलो तरी ज्या सोलापूरसह नवी मुंबईला आपण ‘स्मार्ट’’ सिटी करणार आहोत; तेच सोलापूर आणि नवी मुंबई प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. केवळ सोलापूर नाही तर मुंबईनजीकच्या नवी मुंंबई, बदलापूर, उल्हासनगरची हीच परिस्थिती आहे. आणि या सगळ्याला कारणीभूत आहे तो मानवाचा हव्यास. जोवर हा हव्यास कमी होत नाही तोवर प्रदूषण वाढतच जाणार आहे. त्यामुळे सुरू झालेला हा पृथ्वीच्या अस्ताचा क्लायमॅक्स मानवजातीला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती मानायलाच हवी.

Web Title: Annotation - Pollution Smoke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.