भाष्य - तळ्यात मळ्यात
By admin | Published: February 20, 2017 12:16 AM2017-02-20T00:16:43+5:302017-02-20T00:16:43+5:30
समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांच्या मनात सध्या काय सुरू आहे कळायला मार्ग नाही. कधी ते अखिलेश जिद्दी
समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांच्या मनात सध्या काय सुरू आहे कळायला मार्ग नाही. कधी ते अखिलेश जिद्दी आहे खरा, पण माझा मुलगा आहे. त्याला हवे तसे तो माझ्याकडून करवून घेत असतो असे ते मोठ्या लाडाने सांगतात, तर कधी बंधू शिवपाल यादव यांच्या प्रचारसभांना हजेरी लावत त्यांच्यासाठी मतांचा जोगवा मागतात. मध्यंतरी ते लोकदलाची सूत्रे स्वीकारणार अशीही चर्चा होती. आता त्यांनी सपामधील आपल्या अनुयायी नेत्यांना म्हणे चक्क मायावतींच्या हत्तीवर स्वार होण्याचे संकेत दिले आहेत. नेताजींच्या या अशा संभ्रमावस्थेने केवळ अखिलेशच नव्हेतर अख्खा सपा परिवार बुचकळ्यात पडला असल्यास त्यात नवल ते काय? त्यांचा हा तळ्यातमळ्यातला खेळ त्यांच्यासाठी माहिती नाही पण इतरांसाठी मात्र नक्कीच मनोरंजनाचा विषय ठरतो आहे. दुसरीकडे मुलायमसिंह नेमके आहेत कुणाचे? हा प्रश्न राजकीय विश्लेषकांनाही भेडसावतो आहे. अखिलेश यांनी तर आपली ही अस्वस्था एका सभेत बोलूनही दाखविली. मुलायमसिंहांसारखा एक कणखर आणि कठोर नेता एका यादवीने एवढा घायाळ व्हावा हे आश्चर्यच म्हणायचे. एकेकाळी कायदा व व्यवस्था राखताना ते कुणाचीही तमा बाळगत नाही अशी त्यांची ख्याती होती. मशीद उद्ध्वस्त करण्यासाठी आलेल्यांवर गोळीबार करण्याचे कठोर पाऊल उचलतानाही त्यांनी कुणाची पर्वा केली नव्हती, हे सर्वज्ञात आहे. एवढा कठोर नेता एवढा ‘मुलायम’ झालाच कसा? सपात यादवी पेटली असताना त्यांनी तातडीने अखिलेश आणि रामगोपाल यादव यांची पक्षातून हकालपट्टीची घोषणा केली तेव्हाही सर्वांना आता ‘मुलायम’ कठोर झाले, एकएकाला वठणीवर आणणार असे वाटले होते. पण झाले उलटेच. या दोघांनाही दुसऱ्याच दिवशी पक्षात घेण्यात आले. अर्थात त्यांच्या या वागण्याचा अखिलेश अथवा रामगोपाल यादव यांच्यावर तिळमात्रही फरक पडला नाही. पुढे त्यांना जे करायचे होते तेच त्यांनी केले आणि मुलायमसिंह त्यांना तसे करण्यापासून रोखू शकले नाहीत. हा त्यांचा मोठा पराभव होता. त्यानंतर काँग्रेससोबत युतीची चर्चा सुरू झाली, त्यावेळी मुलायमसिंहांनी या समझोत्यास विरोध दर्शविला होता. पण झाले काय? नेताजींचे मन एवढे सैराट झाले होते की, एकापाठोपाठ एक आगळेवेगळे निर्णय ते घेऊ लागले. सपा-काँग्रेस युती झाल्यावर तर त्यांनी पक्षातील आपल्या अनुयायांना या युतीविरोधात निवडणूक रिंगणात उभे राहण्याचे आवाहनच करून टाकले आणि प्रत्यक्ष प्रचाराची वेळ आली असताना आपण शिवपाल, अखिलेश आणि आघाडीचाही प्रचार करणार असल्याचे सांगून आणखी एक धक्का दिला. मुलायमसिंहांचे हे तळ्यातमळ्यात खेळणे आणखी किती दिवस चालणार तेच बघायचे!