भाष्य - तिच्या धाडसाला सलाम"

By admin | Published: July 5, 2017 12:22 AM2017-07-05T00:22:08+5:302017-07-05T00:22:08+5:30

सध्या कर्जमाफी या विषयावर रान उठले असताना अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट येथील एक महिला शेतकरी पुढे येते, आपण कर्जाची परतफेड करण्यास सक्षम

Annotation - salute to her courage " | भाष्य - तिच्या धाडसाला सलाम"

भाष्य - तिच्या धाडसाला सलाम"

Next

सध्या कर्जमाफी या विषयावर रान उठले असताना अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट येथील एक महिला शेतकरी पुढे येते, आपण कर्जाची परतफेड करण्यास सक्षम असल्याचे सांगत शासनाने दिलेली कर्जमाफी अतिशय नम्रपणे नाकारते. इतकेच नव्हे तर आपल्याला देण्यात आलेल्या कर्जमाफीचा लाभ दुसऱ्या गरजूला देण्याची विनंती करीत मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देते. सोपं नाही हे; पण अर्चना सुधीर रसे या शेतकरी महिलेने हे धाडस दाखवून गरज नसताना आणि सक्षम असताना शासनाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या काही सधन शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे. कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा दिवसेगणिक वाढणारा आकडा चिंतनीय आहे. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळामुळे बळीराजा हतबल झाला आहे. त्यामुळे विदर्भात तर दररोज या दुर्दैवी घटना घडतात. यावर कर्जमाफी हाच एकमेव उपाय असल्याची भाषा आजवर शासनात विरोधी बाकावर बसलेली मंडळी करायची. परंतु यंदा स्वत: शेतकरी रस्त्यावर उतरला. कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत माघार नाही, असे शासनाला ठणकावून सांगितले. अखेर मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. यावरही राजकारणाची वेगवेगळी गणिते मांडली जात आहेत. राजकीय श्रेय लाटण्याची संधी कुणीही सोडू इच्छित नाही. सत्तापक्ष कर्जमाफीचे स्वागत करीत आहे तर यातून शेतकरी कधीही कर्जमुक्त होऊ शकत नसल्याचा दावा करत विरोधक टीकेची झोड उठवीत आहेत. असे असताना घेतलेले पीककर्ज फेडण्यास आपण सक्षम असल्याचा दाखला देत अचलपूर तालुक्यातील अर्चना सुधीर रसे या शेतकरी महिलेने दीड लक्ष रुपये असलेले युनियन बँकेचे कर्ज स्वत: भरणार असल्याचे जाहीर करून सकारात्मक पाऊल उचलले. अर्चनासारखे आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या शेतकऱ्यांनी पुढाकार घेत हा कित्ता गिरवायला हवा. अर्चना यांचे पती भाजपचे तालुका अध्यक्ष आहेत. एरवी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यात सत्तापक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेच आघाडीवर असतात, हा समजही या शेतकरी महिलेने दूर केला आहे. शासनाने कर्जमाफी जाहीर केली. ४४ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली. ८९ लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचा दावाही केला पण गरजूंना तो मिळाला नाही तर पुणतांब्यापासून सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाचे हे अपयश ठरेल.

Web Title: Annotation - salute to her courage "

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.