भाष्य - नासाडी थांबवा

By admin | Published: June 3, 2017 12:16 AM2017-06-03T00:16:16+5:302017-06-03T00:16:16+5:30

गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी संपावर गेल्याने शहरवासीयांची नाकाबंदी झाली असून, संपामुळे सरकारला घाम फुटावा इतका तीव्र

Annotation - Stop Stopping | भाष्य - नासाडी थांबवा

भाष्य - नासाडी थांबवा

Next

गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी संपावर गेल्याने शहरवासीयांची नाकाबंदी झाली असून, संपामुळे सरकारला घाम फुटावा इतका तीव्र संप करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. आपल्या दाराला आलेल्या पाहुण्याला पोटभर खाऊ घालणे किंवा पिकलेला माल मनापासून दान करण्यासारखं मोठं मन बळीराजाशिवाय कुणाकडेच नाही. पण आज निसर्ग आणि बाजारभावाच्या चकव्यूहात बळीराजा देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. मोबाइल, पेट्रोलसारख्या बाबींवर मनसोक्त खर्च करणारा ग्राहक नेमके भाजीपाला व शेतमाल खरेदी करतानाच नाक मुरडतो. त्यामुळे शेतमालाला भाव मिळत नाही. उत्पादन खर्चात आणि महागाईतही वाढ झाल्याने आता हे ओझे शेतकऱ्याला पेलवणारे नाही. स्वत:च उपाशी असलेला राजा दुसऱ्यांना काय दान देणार? गेल्या दोन दिवसांत शेतकरी संपामुळे शहरांकडे येणारे दूध व भाजीपाल्यासह शेतमालाची आवक मंदावली आहे. जी आवक होते ती रस्त्यावर फेकून दिली जात आहे. दूध रस्त्यावर ओतून दिले जात आहे. विषय सरकारला घाम फोडण्याचा असला, तरी भाजीपाला रस्त्यावर फेकताना आणि दूध ओतून देताना श्ोतकऱ्यांच्या आतड्याला किती पीळ पडतोय याची सरकारला कल्पना यायला हवी. एखादा पाऊस पडला की काळ्या आईची ओटी भरून तो आईसमोर नतमस्तक होतो. पिकाला पोटच्या लेकराप्रमाणे जपून वेळ अमावास्येला पिकाची पूजा करणाऱ्या शेतकऱ्याला आज शेतमाल फेकून देताना किती वेदना होत असतील याची कल्पना करवत नाही. गोमातेला आईप्रमाणे सांभाळून तिचे दूध तिच्या वासराला न पाजता तुमच्या लेकराला पोच करणाऱ्या शेतकऱ्याला दूध रस्त्यावर ओतताना वासराचा अन् गायीचा हंबरडा कानात घुमल्याशिवाय राहत नाही. शेती आमची आई अन् बाप आहे, अशी भावना असलेला बळीराजा आईबापापासून कधीही तुटणे शक्य नाही. शेत परवडेना म्हणून विकून टाकावे असा विचारही मनात येत नाही. इतकं अतूट
नाते असलेला बळीराजा संपावर गेला अन् आपल्या पिकांची नासाडी करू लागला. यामुळे सरकारला घाम फुटेल की नाही हे माहीत नसले, तरी शेतमालाची नासाडी करणे कदापिही व्यवहार्य ठरणारे नाही. आजही कित्येक बाळांना पुरेसे दूध मिळत नाही. मग ते आपले असो वा गायीचे. नासाडी करण्याऐवजी तिच्या अन् आपल्या बाळाला ते पाजलेलं कधीही चांगलं. भाजीपाला फेकून देण्याऐवजी जनावरांना चारा म्हणून खाऊ घालावा. पण नासाडी ही शेतकऱ्याला पचणारी अन् शोभणारी बाब नव्हे.

Web Title: Annotation - Stop Stopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.