भाष्य - लावण्य धोक्यात!
By admin | Published: February 24, 2017 12:34 AM2017-02-24T00:34:21+5:302017-02-24T00:34:21+5:30
पृथ्वीच्या पाठीवरील सरोवरांपैकी एकूण २० सरोवरे अशनीपातामुळे निर्माण झाल्याचे मान्य करण्यात आले
पृथ्वीच्या पाठीवरील सरोवरांपैकी एकूण २० सरोवरे अशनीपातामुळे निर्माण झाल्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कॅनडाच्या लॅब्राडोर क्षेत्रातील ‘न्यू क्युबेक’, आफ्रिकेतील घाना देशातील ‘बोसमट्वी’, अमेरिकेच्या अॅरिझोना भागातील ‘बॅरिंजर’, महाराष्ट्रातील ‘लोणार’ इत्यादी सरोवरांचा प्रामुख्याने समावेश होतो. लोणार सरोवर त्यामध्येही वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते अशनीपातामुळे निर्माण झालेले बेसॉल्ट खडकातील एकमेव विवर आहे. ‘नासा’ या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेचे ‘क्युरिओसिटी रोव्हर’ पाच वर्षांपूर्वी मंगळावर उतरले. त्या मोहिमेत ‘नासा’ने लोणार सरोवराचा ‘डाटा’ आणि दगडमातीचे नमुने वापरल्याचे वृत्त समोर आल्यानंतर, जगाचे लक्ष लोणारकडे वेधल्या गेले. यापूर्वी लोणारचा संबंध चंद्रावरील विवरांशी लावल्या गेला होता. तो आता मंगळासोबतही जुळला. लोणार सरोवराच्या बाबतीत असे एखादे वैज्ञानिक सत्य समोर आले, की लोणारच्या संवर्धनासाठी शासनाकडून एखादी घोषणा होते. पुढे अंमलबजावणी मात्र थंड बस्त्यात पडते. पुढील आठवड्यात लोणार महोत्सव होऊ घातला आहे. त्या निमित्ताने पुन्हा एकदा लोणार सरोवराची काळजी शासन स्तरावर व्यक्त केली जाईल. जगप्रसिद्ध ओळख असतानाही लोणार सरोवराच्या जतन आणि संवर्धनासाठी होणारे प्रयत्न हे एखाद्या ग्रामपंचायत स्तरावरचेच असावे, हे दुर्दैव आहे. सरोवराच्या काठी तब्बल २७ मंदिरे आहेत. दहाव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत निर्माण झालेला हा प्राचीन ठेवा सध्या उपेक्षित आहे. सरोवराभोवती घनदाट अरण्य असून, त्यामध्ये ७५ जातींचे पक्षी, तसेच अनेक औषधोपयोगी वनस्पतींचे अस्तित्व आहे. पाण्यावर तरंगणारे दगड, चुंबकीय दगड व परग्रहांवर आढळणारे स्फटिक तसेच सिलिका आॅक्साइडसारखे स्फटिक तिथे आढळतात. अशी सर्व महती असतानाही लोणारचे लावण्य धोक्यात आले आहे. या जागतिक दर्जाच्या ठेव्याचे जतन आणि संवर्धनासाठी सरोवरप्रेमींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल केली आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन एक विशेष कृती आराखडा २०१०मध्ये तयार झाला. तो मंजूरही झाला; मात्र नेहमीच्या अनास्थेची झालर मिळाल्याने सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात व सरोवरातील पाणी स्वच्छ करण्यात ‘नीरी’सारखी संस्थाही अपयशी ठरली आहे. त्यामुळे लोणारचा ठेवा जपण्याची जबाबदारी केवळ महोत्सव साजरा करून पूर्ण होणार नाही, तर कळकळीचे प्रयत्न आवश्यक आहेत.