भाष्य - अनोखा उपहार!

By admin | Published: January 11, 2017 12:17 AM2017-01-11T00:17:23+5:302017-01-11T00:17:23+5:30

‘खरे बोलावे, खोटे बोलू नये’ हे बोधवचन जसे एव्हाना अनेकांच्या नजरेत निरर्थक ठरले आहे वा अनेकांनी ते तसे ठरविले आहे, त्याच

Annotation - Unique gift! | भाष्य - अनोखा उपहार!

भाष्य - अनोखा उपहार!

Next

‘खरे बोलावे, खोटे बोलू नये’ हे बोधवचन जसे एव्हाना अनेकांच्या नजरेत निरर्थक ठरले आहे वा अनेकांनी ते तसे ठरविले आहे, त्याच धर्तीवर निवडणूक काळात मतदारांना कोणतेही प्रलोभन दाखवू नये, त्यांना भेटवस्तूं्च्या रुपात लाच देऊ नये, हे निर्वाचन आयोगाचे ‘शाश्वत’ उपदेश वचनदेखील बहुतेक सर्वच संबंधितांनी निरर्थक ठरविले आहे. साहजिकच पकडला गेला तर तो चोर अन्यथा साव, असाच प्रकार येथेही घडून येतो व त्यामुळेच उत्तर प्रदेशातील मोरादाबाद जिल्ह्यातील कुंदरकी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे नेते ठाकूर रामवीर सिंह यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचे कारण हे सद्गृहस्थ आपल्या संभाव्य मतदारांना दुधाळ म्हशींच्या रुपात एक अनोखा उपहार वाटीत होते. पण त्यांनी केवळ या ‘विश्वामित्रीं’चेच वाटप केले असे नाही, तर गरजू महिला मतदारांना शिवणयंत्रे आणि काही शेतकरी बांधवांना बैल जुंपायच्या गाड्यादेखील म्हणे त्यांनी वाटल्या होत्या व वाटप सुरुच होते. अर्थात ही बाब त्यांचे प्रतिस्पर्धी आणि कुंदरकी मतदारसंघाचे विद्यमान प्रतिनिधी व समाजवादी पार्टीचे नेते हाजी रिझवान यांनी जिल्हाधिकाऱ्याच्या लक्षात आणून दिली तेव्हां कुठे गुन्हा दाखल केला गेला. आपल्या अनेक उद्योजक मित्रांनी आपणास जे धन उपलब्ध करुन दिले त्यातून आपण हे वाटप केले आणि राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदरच वाटप थांबविले होते, त्यामुळे आपण कोणताही गुन्हा केलेला नाही, हा रामवीर सिंह यांचा दावा आहे. अर्थात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असली तरी अद्याप रामवीर सिंह आमदारकीचा अधिकृत उमेदवार नसल्याने त्याआधी त्यांनी जे उद्योग केले त्याबद्दल निर्वाचन आयोग त्यांना कचाट्यात पकडू शकेल याची शंकाच आहे. ते काहीही असो, उपहारासाठी अनोखी चीज शोधून काढल्याबद्दल त्यांना ‘म्हैसरत्न’ घोषित व्हायला हरकत नाही.

Web Title: Annotation - Unique gift!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.