भाष्य - घोषणा जोरदार, पुढे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2017 12:44 AM2017-07-07T00:44:35+5:302017-07-07T00:44:35+5:30
शिक्षणाचे माहेर म्हणून पुणे शहराची ओळख असली तरी, देशातील शिक्षण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचे एक वेगळे स्थान आणि परंपरा आहे.
शिक्षणाचे माहेर म्हणून पुणे शहराची ओळख असली तरी, देशातील शिक्षण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचे एक वेगळे स्थान आणि परंपरा आहे. याच विद्यापीठाने देशाला विविध क्षेत्रातील तज्ज्ञ दिले आहेत. अशी उज्ज्वल परंपरा असलेले मुंबई विद्यापीठ १६० वे वर्ष साजरे करीत आहे. मात्र या वर्षात विद्यापीठाला सातत्याने मान खाली घालण्याची नामुष्की ओढवत आहे. यासाठी काही प्रमाणात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख जबाबदार आहेत.
७ जुलै २०१५ साली डॉ. संजय देशमुख यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला. पाच वर्षांच्या कालावधीतील दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. पण या दोन वर्षांत कुलगुरूंनी विद्यापीठात सुधारणा करण्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. या घोषणा खूप चांगल्या असल्या तरी, त्याची अंमलबजावणी मात्र होत नसल्याने विद्यापीठाला टीकेचे धनी व्हावे लागत आहे.
मुंबई विद्यापीठातील परीक्षा आणि निकाल यावर नेहमीच टीका होते. ही टीका खोडून काढण्यासाठी आॅनलाईन उत्तरपत्रिका तपासणीचा पर्याय कुलगुरूंनी शोधला. यामध्ये सर्व शाखांचे पेपर आॅनलाईन तपासले जाणार, अशी घोषणा केली आणि तत्काळ अंमलबजावणीही केलीे. पायाभूत सुविधा आणि प्राध्यापक यांचा विचार न केल्याने कुलगुरू तोंडघशी पडले. जुलै महिना उजाडला तरी अडीच लाख पेपरपैकी फक्त ३० हजार पेपर तपासून झाले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे पुढे काय, असा प्रश्न पडला आहे.
या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याने राज्यपाल विद्यासागर राव यांनी कुलगुरू संजय देशमुख यांना झापले. विद्यापीठाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. मुंबई विद्यापीठाचा दर्जा घसरत असल्याची पोचपावती काही दिवसांपूर्वीच मिळाली होती. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयासमोर नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) सादर केलेल्या माहितीत मुंबई विद्यापीठ देशातील शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत पहिल्या १०० मध्ये स्थान मिळवू शकले नाही. यावेळीही कुलगुरूंनी त्यानंतर निकष आणि अन्य गोष्टी पाहू, अशी सारवासारव केली.
आता दोन वर्षे कारभार सांभाळूनसुद्धा कुलगुरूंना नीट घडी बसवता आलेली नाही. अजूनही नवीन उपक्र म राबविण्याच्या जोरदार घोषणा होतात. पण यामधून विद्यार्थ्यांना फायदा झाल्याचे दिसत नाही. त्यापेक्षा विद्यार्थी आणि महाविद्यालय अडचणीत अडकत असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा कळसाच्या घोषणाबाजीपेक्षा पाया कसा आहे आणि त्यात काय बदल हवेत, याचा विचार कुलगुरूंनी करण्याची गरज आहे.