आणखी एक भाऊबंदकी

By Admin | Published: June 21, 2017 01:13 AM2017-06-21T01:13:27+5:302017-06-21T01:13:27+5:30

महाराष्ट्राला भाऊबंदकी नवी नाही. छत्रपतींच्या सातारा आणि कोल्हापूर दोन गाद्या होत्या. पेशवाईतील भाऊबंदकी ‘ध’चा ‘मा’ने अजरामर केली आणि पिढ्यान्पिढ्या राजवट कोणतीही

Another brother | आणखी एक भाऊबंदकी

आणखी एक भाऊबंदकी

googlenewsNext

महाराष्ट्राला भाऊबंदकी नवी नाही. छत्रपतींच्या सातारा आणि कोल्हापूर दोन गाद्या होत्या. पेशवाईतील भाऊबंदकी ‘ध’चा ‘मा’ने अजरामर केली आणि पिढ्यान्पिढ्या राजवट कोणतीही असो आज लोकशाहीतसुद्धा निलंगा, बीड ही भाऊबंदकीची उदाहरणे आहेत. बीडमधील मुंडे आणि पंडित या दोन घराण्यांपाठोपाठ क्षीरसागर घराण्याला या भाऊबंदकीने ग्रासले आहे. नगरपालिका निवडणुकीत याची बीजे पेरली गेली आणि परवा तर अजित पवारांच्या उपस्थितीत हे पीक तरारून आले. तसे या पिकाला कान भरण्यातून पाणी दिले जाते आणि फूस लावण्याचे खत लागते. ‘सत्ता’ नावाचे गाजर दाखविले की, घर फोडण्याचे काम हमखास होते. फक्त सुप्त महत्त्वाकांक्षेला फुंकर योग्य वेळी घालावी लागते.
परवा बीडमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला; परंतु आ. जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर हे दोघे बंधू गैरहजर होते आणि जिल्ह्यातील विवाह सोहळ्यांना हजेरी लावत फिरत होते. क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे बीडमधील पूर्वापारचे बडे प्रस्थ. त्यांच्या आई केशरकाकूंचा प्रभाव होता. काकूंनंतर या दोघांनी शहराच्या राजकारणावर पकड कायम ठेवली. क्षीरसागरांचे तिसरे बंधू रवींद्र यांची राजकारणात बाहेर फारशी ओळख नसली, तरी भावांच्या राजकारणाची पडद्यामागची सूत्रे हलविण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची असायची. गजानन साखर कारखान्याचे ते अध्यक्ष होते. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत रवींद्र यांची मुले संदीप आणि हेमंत यांनी आपले काका भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरोधात ‘काकू-नाना पॅनल’ उभे करून आपले काका भारतभूषण यांना न.प.च्या राजकारणात शह दिला. नगराध्यक्षांच्या थेट निवडणुकीत भारतभूषण निवडून आले असले तरी संदीप, हेमंत यांच्याकडे पालिकेतील बहुमत असल्याने कारभार करताना पुतण्यांनी काकांची कोंडी केलीच. शिवाय हेमंत हे उपनगराध्यक्ष आहेत. या निवडणुकीत अजित पवारांनी पुतण्यांना साथ दिल्याने क्षीरसागर बंधू नाराज होणे साहजिकच आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडे पाठ फिरवून त्यांनी आपली पक्षश्रेष्ठींप्रती नाराजी व्यक्त केली. नगरपालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेच्या राजकारणातही पुतण्यांनी काकांवर मात केली. आ. जयदत्त क्षीरसागरांचा एकच सदस्य निवडून आला, तर पुतण्यांचे चार जण विजयी झाले. भाऊबंदकीच्या दबावतंत्रामुळे पालिकेतील कर्मचारीही हैराण झालेत. राजकारणातील शह-काटशहांची झळ त्यांनाही बसत असल्याने ‘काका-पुतण्यांपासून वाचवा’ असा टाहो फोडत या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दोन दिवसांपूर्वी मोर्चाच काढला होता. राष्ट्रवादीचा मेळावा यशस्वी करण्यासाठी परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री प्रकाश सोळंके, आ.अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित, राष्ट्रवादीचे हे सारे जिल्ह्यातील नेते संदीप क्षीरसागरांच्या मागे एकवटले होते. या प्रकाराने घुसमट झालेल्या क्षीरसागरांनी गेल्या आठवड्यात औरंगाबादेत झालेल्या शरद पवारांच्या मेळाव्याला जाण्याचे टाळले.
जिल्ह्याच्या राजकारणातही क्षीरसागर बंधूंना बाजूला टाकण्याचा पद्धतशीर प्रयत्न झाला. जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणूक, पक्षाच्या जिल्हाध्यक्षाची निवड या घडामोडीत त्यांना डावलण्यात आले आणि नेमका हाच सल त्यांना व्यथित करतो. पक्षाशी प्रामाणिक राहून हेच फळ का? हा प्रश्न पडतो. बीडला हे भाऊबंदकीचे राजकारण नवे नाही. पंडितराव आणि गोपीनाथराव यांच्यातील फाटाफूट त्यांनी पाहिली आहे. शिवाजीराव आणि बदामरावांतील दुरावा अनुभवला आहे. राष्ट्रवादीला तरुण रक्ताला वाव द्यायचा आहे, असे अजित पवार यांनी मेळाव्यात सांगून या सर्व राजकारणाची भलावण केली. क्षीरसागर बंधंूचे राजकारण आता कोणत्या दिशेने जाते हे पाहावे लागेल. बीडमध्ये अगोदरच एका पुतण्याने राजकारण व्यापले आहे. पुतण्यांची ही दुकली आता भाऊबंदकीचे रंग किती गहिरे करते आणि राजकारण कसे बदलते हे स्पष्ट व्हायला निवडणुकीपर्यंत थांबावे लागेल.
- सुधीर महाजन

Web Title: Another brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.