शरद पवार काय करतील?; फडणवीसांनी अख्खा सामना खिशात टाकला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 07:40 AM2023-07-03T07:40:42+5:302023-07-03T07:41:02+5:30

महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप घडला. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी हा आणखी एक प्रादेशिक पक्ष फुटला.

Another political crisis occurred in Maharashtra. After Shiv Sena, NCP was another regional party. | शरद पवार काय करतील?; फडणवीसांनी अख्खा सामना खिशात टाकला

शरद पवार काय करतील?; फडणवीसांनी अख्खा सामना खिशात टाकला

googlenewsNext

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचविसाव्या स्थापनादिन समारंभात तीन आठवड्यांपूर्वी अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदावर श्वास गुदमरत असल्याचे म्हटले, देशातील अन्य राज्यांमध्ये एकेक प्रादेशिक पक्ष सत्तेवर आले; पण पवार साहेबांसारखे उत्तुंग नेतृत्व लाभूनही राष्ट्रवादीला पाव शतकात स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही, अशी खंतही व्यक्त केली. त्यांच्या अस्वस्थतेचा अर्थ रविवारी स्पष्ट झाला. अजित पवारांच्या नेतृत्वात तीन डझन आमदारांनी भारतीय जनता पक्षासोबत सत्ता स्थापन करण्यासाठी राजभवन गाठले. त्यापैकी छगन भुजबळ, दिलीप वळसे- पाटील, हसन मुश्रीफ ही नावे तर शरद पवार यांच्या खास गोटातली. नवे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व कोषाध्यक्ष सुनील तटकरे हेदेखील अजित पवारांसोबत होते.

महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप घडला. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी हा आणखी एक प्रादेशिक पक्ष फुटला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने परवा, शुक्रवारीच वर्षपूर्ती साजरी केली आणि त्यासोबतच बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तारालाही मुहूर्त सापडला. पण, हा विस्तार असा भलताच होता. राजकीय भवितव्य पणाला लावून शिंदे यांच्यासोबत गेलेले, तसेच सर्वांत मोठा पक्ष म्हणून लाल दिव्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपच्या इच्छुक आमदारांनी तर याची कल्पनाही केली नसेल. हे पाहून प्रश्न पडावा, की महाराष्ट्राच्या भूमीने आणखी किती भूकंप झेलायचे? आपल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीसांची विकेट गेली असे शरद पवारांनी म्हटले खरे. पण, फडणवीसांनी अख्खा सामना खिशात टाकला.

अर्थात यात भाजप समर्थकांची गोची झाली आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचारी, भ्रष्टाचारी म्हणून अहोरात्र टीका केली, एकनाथ शिंदे यांच्या बंडाला दोन्ही कॉंग्रेस पक्ष, त्यांच्यामुळे शिवसेनेने कथितरीत्या सोडलेले हिंदुत्व आणि अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना निधीच देत नव्हते, असा आरोप केला त्यांनाच सत्तेत सहभागी करून घेण्यात आले. यापैकी अनेकांची ईडी व सीबीआय या तपास यंत्रणांकडून वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. आता त्या चौकशा थांबल्या तर भ्रष्टाचारविरोधी लढाईचे काय होणार? पण, यापेक्षा मोठे व गंभीर प्रश्न या भूकंपानंतर प्रामुख्याने शरद पवार व एकनाथ शिंदे यांच्याबाबत उभे राहिले आहेत. अजित पवार हे असे काही करतील हे राजकीय जाणकार गेले काही दिवस सांगतच होते.

विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार अपेक्षित पद्धतीने सरकारविरुद्ध तुटून पडत नव्हते. मग, पक्ष फुटला तेव्हा उद्धव ठाकरे गाफील राहिले असा ठपका ठेवणाऱ्या शरद पवारांना पुतण्याच्या बंडाची चाहूल लागली नाही? की ते जाणूनबुजून गाफील राहिले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये घराणेशाहीच्या मुद्दयावर सुप्रिया सुळे यांचे नाव घेत पवार यांच्यावर चढविलेला हल्ला, सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप किंवा गेला आठवडाभर फडणवीस व पवार यांच्यात रंगलेला कलगीतुरा है। कशाचे संकेत होते? देशपातळीवर विरोधकांच्या ऐक्याचे काय होईल? पटेल, भुजबळ, वळसे-पाटील, मुश्रीफ वगैरे नेते पवारांना या वयात दुखावण्याची "हिंमत करतील? महत्त्वाचे म्हणजे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काय होणार आहे? शपथविधी सोहळ्यातील त्यांची देहबोली काय सांगत होती? शिंदे यांच्यासह सोळा फुटीर आमदारांच्या भवितव्याचा फैसला विधानसभा अध्यक्ष लवकरच करतील का? तो शिंदेंच्या विरोधात गेला तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील सत्ता जाऊ नये, यासाठी अजित पवारांना सोबत घेणे ही भारतीय जनता पक्षाने केलेली पर्यायी व्यवस्था आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे फक्त शरद पवार यापुढे काय करतात यातून मिळू शकतील.

पुतण्याने केलेल्या बंडानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी आपण पुन्हा ताकदीने पक्ष उभा करू असे म्हटले खरे. पण, याआधी असे करतानाची व आताची परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा वय, शरीर त्यांना साथ देत होते. आता भलेही त्यांच्याकडे उमेद असेल. वार्धक्य आणि आजाराचा अडथळा मोठा आहे. अर्थात, अजूनही त्यांच्याइतका चाणाक्ष व जनतेची स्पंदने माहीत असलेला दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी ईडीच्या नोटिसीला त्यांनी दिलेले आक्रमक उत्तर व पावसातील साताऱ्याची सभा अजून लोक विसरलेले नाहीत. त्यावेळी प्रतिस्पर्धी बाहेरचे होते, यावेळी बंड घरातून झाले आहे. सार्वजनिक जीवनात असा प्रसंग त्यांच्यावर कधी आला नव्हता. त्यामुळे ते पवार असले तरी ही लढाई सोपी नाही. शिंदे, फडणवीस, अजित पवारांचे सरकार निवडणुकीची तयारी करीत असताना सगळ्यांच्या नजरा मात्र थोरल्या पवारांकडेच राहतील.

Web Title: Another political crisis occurred in Maharashtra. After Shiv Sena, NCP was another regional party.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.