अंटार्क्टिकाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 04:18 AM2017-07-19T04:18:22+5:302017-07-19T04:18:22+5:30

जागतिक पर्यावरणाबद्दलचा पॅरिस करार डोनाल्ड ट्रम्प अमान्य करीत असतानाच अंटार्क्टिकाबद्दलची एक महत्त्वाची बातमी आली आहे. अंटार्क्टिकातील एक अतिविराट हिमनग

Antarctica alert | अंटार्क्टिकाचा इशारा

अंटार्क्टिकाचा इशारा

Next

- प्रा. दिलीप फडके

जागतिक पर्यावरणाबद्दलचा पॅरिस करार डोनाल्ड ट्रम्प अमान्य करीत असतानाच अंटार्क्टिकाबद्दलची एक महत्त्वाची बातमी आली आहे. अंटार्क्टिकातील एक अतिविराट हिमनग मुख्य समुद्रापासून विलग झाला आहे. हा हिमनग मुंबईच्या दहापट मोठा आहे. तब्बल ५ हजार ८०० चौरस किमी.च्या या हिमनगाचे वजन एक लाख कोटी टन एवढे प्रचंड आहे. अंटार्क्टिका समुद्राला आतापर्यंत पडलेला हा सर्वात मोठा तडा आहे. हे घडण्याची शक्यता नासाच्या संशोधकांनी अनेक महिन्यांपूर्वी वर्तवली होती. याचा नेमका काय परिणाम होईल, यावर आता संशोधन सुरू झाले आहे. पर्यावरणावर गंभीर परिणाम करणाऱ्या या घटनेचे पडसाद जगातल्या प्रसारमाध्यमांमध्ये उमटणे क्रमप्राप्तच आहे. या हिमनगासारख्या विषयावर हमखास आठवणाऱ्या नॅशनल जिआॅग्राफिकमध्ये गेली अनेक वर्षे या विषयावरची माहिती प्रकाशित होते आहे. जुलैच्या नॅशनल जिआॅग्राफिकच्या अंकाची कव्हर स्टोरीच अंटार्क्टिकावरची आहे. लॉरेन्ट बॅलेस्टा यांच्या या लेखात अंटार्क्टिकामध्ये समुद्रतळाशी असलेल्या अद्भुत सृष्टीच्या संदर्भात थक्क करणारी माहिती आणि त्याबद्दलची अप्रतिम छायाचित्रे आहेत. अंटार्क्टिकाच्या सागरतळाशी अतिशय समृध्द अशी जैविक सृष्टी अस्तित्वात आहे. त्याचा अतिशय सविस्तर आणि माहितीपूर्ण आढावा या लेखात आपल्यासमोर येत आहे. अंटार्क्टिकाचा विनाश म्हणजे नेमका कशाकशाचा विनाश हे समजण्यासाठी आणि त्यामुळे सध्याच्या समस्येचे गांभीर्य समजण्यासाठी या लेखाचा फार मोठा उपयोग होतो आहे. त्याच अंकात हॅन्न लंग यांचादेखील एक लेख आहे. त्यात त्यांनी वेगवेगळ्या वेळच्या नकाशांच्या आधारे अंटार्क्टिकाच्या लार्सन सीच्या भागातल्या बर्फाच्छादित प्रदेशात आज दिसणारी हानी जवळपास गेल्या दशकात कशी होत होती याचे भेदक चित्रण आपल्यासमोर उभे केलेले आहे. ते वाचताना मानवाने स्वत:च्या स्वार्थासाठी पर्यावरणाचे किती आणि कसे नुकसान केलेले आहे याची साद्यंत माहिती आपल्यासमोर येते. लार्सन आईड्स शेल्फचा मोठा तुकडा तुटलेला आहे त्यामुळे या सगळ्याच भागातली स्थिरता आता खूप कमी होईल अशी भीती शास्त्रज्ञांना वाटायला लागलेली आहे. सध्या असलेले बर्फाचे आच्छादन दरवर्षी शते नऊ फुटाने कमी होत जाते आहे. याचाच अर्थ आता मूळ प्रदेशापासून अलग होणाऱ्या हिमनगांचे प्रमाण यापुढच्या काळात वाढते असेल. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळीदेखील वाढायला लागेल. न्यूयॉर्क टाइम्सने याच विषयावरचा अंटार्क्टिकाचा इशारा हा फेन मोन्टैन या ज्येष्ठ पत्रकाराचा लेख प्रकाशित केला आहे. अलीकडच्या काळात अंटार्क्टिकापासून विच्छेद होऊन अलग होणारा हा तिसरा आणि आजवरचा सर्वात मोठा हिमनग आहे हे सांगताना त्यांनी अमेरिकेच्या पूर्वेकडच्या डोलोवेअर राज्याच्या आकाराचा हा हिमनग आहे हे सांगून या प्रश्नाचे स्वरूप किती मोठे आहे याकडे लक्ष वेधले आहे. आर्टिक आणि अंटार्क्टिका या दोन्ही प्रदेशात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना गेल्या काही वर्षांमध्ये तिथल्या भौगोलिक परिस्थितीत होत असलेले बदल जाणवत आहेत. या भागांमध्ये आता नेहमीपेक्षा जास्त उकाडा जाणवतो आहे, त्याचे तिथल्या परिस्थितीवर गंभीर परिणाम होत आहेत. ग्रीनलँडचे बर्फाच्छादनदेखील वितळते आहे. हाच बदल आल्प्स, हिमालय आणि तिबेट या ठिकाणीदेखील जाणवतो आहे. या सगळ्याला वाढते कर्बिद्वप्राणील वायूचे प्रमाण मुख्यत: कारणीभूत आहे हे सांगत लार्सन सी च्या विघटनामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होणार आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. हे असेच सुरू राहिले तर या शतकाच्या अखेरीस समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये १७ फुटांनी वाढ झालेली असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अपरिमित नुकसान होणार आहे. ४० वर्षांपूर्वी जेव्हा ग्लोबल वॉर्मिंग हा शब्ददेखील कुणाला फारसा माहिती नव्हता त्यावेळी जॉन मर्कर यांनी लिहिलेल्या लेखाची आठवण मोन्टैन करून देतात. नेचर नावाच्या मासिकात मर्कर यांनी लिहिले होते की, जर सध्याच्या जीवाश्म इंधनाच्या वापरात आपण बदल केला नाही तर ५० वर्षांनी तापमानात प्रचंड वाढ झालेली असेल आणि त्यामुळे अंटार्क्टिकाच्या विघटनाची सुरुवात झालेली असेल. मर्कर यांचे भाकीत त्यांनी सांगितल्यापेक्षाही जलदगतीने आपण पूर्ण केलेले आहे. गेल्या दोन पिढ्यांमध्ये आपण ज्या वेगाने पर्यावरणाचा विनाश केला आहे हे पाहता आपण या परिस्थितीतून काही शिकलो नाही असेच म्हणावे लागते आहे आणि जीवाश्म इंधनाच्या वापरामध्ये तातडीने कपात केली नाही तर किती नुकसान होणार आहे याची कल्पनादेखील करता येणार नाही असेही मोन्टैन बजावतात. न्यूयॉर्क टाइम्समधला जुगल पटेल आणि जस्टीन गिल्लीज यांच्या याच विषयावरच्या लेखात अंटार्क्टिकाच्या हिमाच्छादनाचा गेल्या काही दशकात कसकसा विनाश होत होता याची सविस्तर चर्चा केलेली आहे. तीदेखील मुळातूनच वाचायला हवी. वेल्ट या जर्मन भाषिक वृत्तवाहिनीने या विषयावर कार्ल सॅक राईस यांचा एक बातमीवजा लेख प्रसिध्द केला आहे. अर्थातच तो व्यंगात्मक आहे आणि त्यामुळे खरा नाही पण त्यावरून ट्रम्प यांच्या पॅरिस कराराबद्दलच्या आडमुठ्या धोरणामुळे अस्वस्थ झालेल्या युरोपातल्या जनतेच्या प्रतिक्रियांचा अंदाज येतो आहे. अंटार्क्टिकामधून विघटित झालेल्या हिमनगाभोवती आपण भिंत बांधणार आहोत असे ट्रम्प यांनी जाहीर केलेले आहे असे सांगत राईस त्यात पुढे लिहितात की या आईसबर्गमुळे बेन आणि जेरी, आईसटी, व्हॅनिला आईस यासारख्या अमेरिकी आईस्क्रीम्सच्या ब्रँडसना स्पर्धा निर्माण होऊ नये म्हणून आपण हे पाऊल उचलतो आहोत असे ट्रम्प यांनी सांगितले आहे. या भिंतीवर टायटनिकसारखा आपटून हा हिमनग फुटून जाईल. हे झाले नाही तर आपण वरच्या पेग्विन्सना आणि बर्फाळ प्रदेशातल्या अस्वलांना अमेरिकेत प्रवेश करण्यापासून बंदी घालू अशा घोषणा ट्रम्प यांनी केल्याचे सांगत एकूणच ट्रम्प यांच्या धोरणांची टर उडवत या विषयावर राईस यांनी खूप गमतीदार लिहिलेले आहे. पण या प्रश्नाच्या खऱ्या आणि अत्यंत गंभीर बाजूवर इकॉनॉमिस्टने लिहिलेले आहे. श्रीमंत जग प्रदूषण करीत असते आणि त्याची किंमत दरिद्री जगाला चुकवावी लागते असे विश्लेषण इकॉनॉमिस्टने केलेले आहे आणि ते खोटे नाही. लार्सन सी मधून विघटन झालेल्या हिमनगामुळे होणारे दुष्परिणाम लवकर मोजता येणारे नाहीत. त्यामुळे हवामानात, तापमानात होणारे बदल, जीवसृष्टीवरचे, शेतीवरचे परिणाम या सगळ्यांचा अंदाज यायला बराच काळ लागणार आहे. त्यामुळे मनुष्यजीवनावर होणारे परिणाम काय असतील आणि त्याची किती किंमत मानवाला मोजावी लागेल हे एवढ्यात सांगता येणार नाही. पण हे प्रश्न निर्माण करण्यामध्ये सर्वात जास्त जबाबदारी असते ती श्रीमंत जगाची आणि त्याची सर्वात जास्त किंमत मोजावी लागते ती मात्र गरीब जगाला, हे सार्वकालिक सत्यच इकॉनॉमिस्टने सांगितलेले आहे.

( लेखक हे ज्येष्ठ विश्लेषक आहेत)

Web Title: Antarctica alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.