अँथ्रोपोसिन हवामान बदल धोकादायकच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 05:16 AM2018-12-04T05:16:55+5:302018-12-04T05:17:01+5:30
मानवजात ओझोन छिद्राच्या महासंकटापासून थोडक्यात वाचली, पण आता दुसरे महासंकट जगातील एकूण मानवजातीसमोर आले आहे.
- शिरीष मेढी
मानवजात ओझोन छिद्राच्या महासंकटापासून थोडक्यात वाचली, पण आता दुसरे महासंकट जगातील एकूण मानवजातीसमोर आले आहे. हे महासंकट ओझोनच्या संकटापेक्षा खूप जास्त धोकादायक व एका अर्थी जास्त व्यापक आहे. कारण या संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक शक्तिशाली अडथळे ओलांडावे लागणार आहेत.
१९८६ साली जगातील वैज्ञानिकांच्या इंटरनॅशनल काउंसिल आॅफ सायंटिफीक युनियन या संस्थेने इंटरनॅशनल जिओस्फिअर बायोस्फिअर प्रोग्राम हातात घेण्याचे ठरविले. याचे थोडक्यात नाव आयजीबीपी असे आहे. हा प्रोजेक्ट सुरू करण्याचे उद्दिष्ट पृथ्वीचे नियंत्रण करणाऱ्या पदार्थशास्रीय, जैविकशास्रीय व रसायनशास्रीय प्रक्रिया काय आहेत व त्या कशाप्रकारे कार्यरत असतात, हे समजून घेणे. या प्रक्रियामुळे जीवन असणारे एकमेव पर्यावरण पृथ्वीवर उदयास आले आहे. या पर्यावरणीय व्यवस्थेत कोणते बदल घडत आहेत, या बदलांवर मानवी कृत्यांचा प्रभाव कशाप्रकारे कार्यरत होत असतो, याचाही शोध घेणे या आयजीबीपी प्रोजेक्टचा उद्देश होता. या प्रोजेक्टमध्ये १ हजारपेक्षा जास्त वैज्ञानिकांनी १९९१ ते २००० या दहा वर्षांच्या कालखंडात शोधकार्य केले.
दहा वर्षे या वैज्ञानिकांनी पर्यावरण व्यवस्थेबाबत खोलवर संशोधन केल्यानंतर, या प्रोजेक्टच्या प्रमुखांनी फेब्रुवारी २०००च्या बैठकीत सांगितले की, आपण अँथ्रोपोसिन काळात आहोत. ही संकल्पना हे व्यक्त करते की, मानवी कृत्यांमुळे पृथ्वीवरील पर्यावरणीय व्यवस्थेत गुणात्मक बदल होत आहेत. यामुळे ‘अँथ्रोपोसिन’ या नवीन शब्दाची भर इंग्लिश भाषेत झाली. ‘अँथ्रोपोसिन’ ही संकल्पना असे सूचित करते की, पृथ्वीने गेल्या अनेक लाखो वर्षांचा कालखंड व आताच्या दोन हिमयुगांतर्गत काळ सोडून दिला आहे. मानवी कृत्ये एवढी शक्तिशाली व व्यापक झाली आहेत की, त्यामुळे मानवी कृत्ये, नैसर्गिक शक्तिंचे प्रतिस्पर्धी झाले आहेत. परिणामी, ग्रहाची वाटचाल जैविक विविधतेच्या नाशाकडे, जंगलांच्या नाशाकडे, जागतिक तापमानवाढीकडे व तीव्र वादळांच्या वाढत्या संख्येकडे वेगाने सुरू झाली आहे. मानवांकडे आता एवढी क्षमता आहे की, ज्या जैविक व अजैविक घटकांवर व प्रक्रियांवर मानवजात अवलंबून आहे, तेच घटक व प्रक्रिया संकटग्रस्त झाले आहेत. या दहा वर्षांतील हजारपेक्षा जास्त वैज्ञानिकांच्या कामाचे सार ग्लोबल चेंज अँड अर्थ सीस्टिम : ए प्लॅनेट अंडर प्रेशर पुस्तकात उपलब्ध आहे.
आयजीबीपी वैज्ञानिकांनी ठरविले की, मानवी कृत्यांबाबत व पर्यावरण व्यवस्थेतील बदलांबाबत प्रत्येकी १२ ग्राफ (आलेख) तयार करायचे व त्यामध्ये १७५० पासून (औद्योगिकीकरण जगात सुरू झाल्यापासून) ते २००० या कालावधीतील आकडेवारी समाविष्ट करायची. पर्यावरण व्यवस्थेशी जोडलेले ग्राफ कार्बनडाय आॅक्साइडचे एकूण आकारमान, हवेच्या सर्वोच्च स्तरावरील ओझोनचा विनाश, जंगलांचा विनाश, समुद्रांचे आम्लीकरण व अन्य आठ बाबींबाबत आहेत. मानवी कृत्यांशी जोडलेले ग्राफ मोठी धरणे, वाहनांची संख्या, परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक, रिअल जीडीपी, ऊर्जेचा वापर, पाण्याचा वापर व अन्य ६ बाबींबाबत आहेत.
आयजीबीपीने असे धक्कादायक निरीक्षण नोंदविले आहे की, जरी २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जनचे प्रमाण कमी केले, तरी गेल्या १,२५,००० वर्षात पृथ्वी जेवढी अधिक गरम होती, त्यापेक्षा जास्त गरम असेल. अँथ्रोपोसिनमुळे नवीन प्रश्न उपस्थित होतो की, देश पातळीपासून ते जागतिक पातळीपर्यंत महाविनाशकारी पर्यावरणीय बदल घडण्याचा धोका टाळण्यासाठी कोणत्या अटी पाळल्या पाहिजेत. यासाठी भूतकाळातील माहिती जमा करणे आवश्यक होते. यासाठी झाडांच्या खोडांमधील वर्तुळे, कोरल रीफ व समुद्रातील व तलावांतील तळ आणि दोन्ही ध्रुवांवरील बर्फात चार/पाच किलोमीटर खोल खणून बर्फांचे गेल्या सलग ७/८ लाख वर्षे जुने असलेले नमुने गोळा केले व या सर्वांचा अभ्यास केला. या नमुन्यांत त्या त्या वेळची हवा कोंडली गेली होती. कार्बन डेटिंग पद्धतीने एखादा घटक कधी उदयास आला हे समजते. या वैज्ञानिकांना आश्चर्यकारक माहिती प्राप्त झाली. समुद्राच्या पाण्याच्या आम्लीकरण मर्यादेने तीव्र स्वरूप धारण केले आहे. म्हणजे या पाण्यात वातावरणातील कार्बन खूप विरघळल्यामुळे आता समुद्र आणखीन अॅसिडीक झाला आहे व त्यामुळे कार्बन शोषणाची क्षमता संपत आली आहे. परिणामी, वातावरणातील कार्बनचे प्रमाण वेगाने वाढत आहे. मात्र, ज्या तीन मर्यादा मानवांनी ओलांडल्या आहेत, त्यामुळे परिस्थिती चिंताजनक आहे. १९८० नंतर आलेल्या तीव्र उष्णता लाटांमध्ये पुढील विनाश घडून आला आहे. टोकाच्या घटना घडणे हे हवामान बदलाच्या संकटाचे वैशिष्ट्य आहे. तापमानातील वाढीमुळे हवामानाच्या स्वरूपात, जैवविविधेमध्ये व अन्य बाबींत नाट्यमय बदल घडत आहेत. म्हणून जर बदल अर्थव्यवस्थेत केले नाही, तर अँथ्रोपोसिन कालखंडात उष्णता नक्कीच वाढेल. नवीन हवामान व्यवस्था उदयास येईल व हे बदल जीवनास खूप हानिकारक असतील.
(पर्यावरण अभ्यासक)