विरोधी पण समंजस
By admin | Published: October 14, 2015 12:16 AM2015-10-14T00:16:44+5:302015-10-14T00:16:44+5:30
संदर्भ भले वेगळा असेल पण आता भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीदेखील समाजातील वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
संदर्भ भले वेगळा असेल पण आता भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीदेखील समाजातील वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. समाजाच्या किंवा समाजातील विशिष्ट वर्ग वा गटाच्या अशा वृद्धिंगत होत चाललेल्या असहनशीलतेची अनेक उदाहरणे अलीकडच्या काळात घडून गेल्याने ज्याला त्याच समाजातील संवेदनशील घटक म्हणून ओळखले जाते त्या साहित्यिकांनी त्यांना आजवर मिळालेले पुरस्कार परत करण्यास सुरुवात केली आहे. अशा साहित्यिकांच्या यादीत रोजच नवनवी नावे जोडली जात असून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इंग्रजीतील लेखक सलमान रश्दी यांचेही नाव त्यात जोडले गेले आहे. पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल व महात्मा गांधींचे नातू गोपाळकृष्ण गांधी यांनीही या साहित्यिकांचे अभिनंदन केले आहे. तरीही प्रामुख्याने पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांच्या यादीत बव्हंशी लेखक साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळविणारे आहेत. त्यांच्या या प्रतिकात्मक कृतीच्या काहीसा विसंवादी पण समंजस सूर साहित्य अकादमीचाच पुरस्कार प्राप्त केलेल्या हिन्दीतील लेखिका मृदुला गर्ग यांनी काढला आहे. आजवर ज्या साहित्यिकांनी पुरस्कार परत केले वा अकादमीचे राजीनामे दिले त्यातील बव्हंशी लोकानी सरकारच्या अनास्थेचा निषेध म्हणून हे पाऊल उचलले असले तरी काहींनी साहित्यिक संस्थांच्या अनास्थेचा निषेध म्हणूनही पुरस्कार परतीची कृती केली आहे. मृदुला गर्ग यांना अशा पद्धतीने साहित्य अकादमीला आणि तिच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांना सरकारशी जोडणे मान्य नाही. साहित्य अकादमी ही एक स्वायत्त संस्था असल्याचे त्यांचे ठाम मत असून याबाबतीत त्यांनी याच अकादमीचे पहिले अध्यक्ष आणि देशाचेही पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा दाखला दिला आहे. पुरस्काराचा निर्णय घेताना, साहित्यिक संस्थांकडून ज्या शिफारसी येतील त्यांचाच आदर केला जाईल व तेव्हां आपल्यातील पंतप्रधान अकादमीच्या अध्यक्षावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणार नाही. सबब उभय संस्था भिन्न आहेत. गर्ग यांना याबाबतीत एक अशीही भीती वाटते की, जर अकादमीचे सारेच सदस्य राजीनामे देऊन मोकळे होतील तर मग ते सरकारच्या पथ्यावरच पडेल आणि सरकार स्वत:स अनुकूल लोकांचीच तिथे वर्णी लावून मोकळे होईल. पुरस्कार परत करणारे वा अकादमीचा राजीनामा देणारे साहित्यिक जर सरकार आणि अकादमी यांच्यातील नाते अद्वैताचे मानीत असतील तर मग कोणे एकेकाळी त्यांना मिळालेले पुरस्कार हीदेखील तत्कालीन सरकारने दिलेली खिरापत होती हेही त्यांना मान्य करावे लागेल आणि साहजिकच तेव्हां त्यांनी ज्यांच्याकरवी ओशाळेपण स्वीकारले त्यांनाच आता ते आपल्या कृतीने ओशाळे करीत आहेत. त्यात नव्या सरकारचा काहीएक संबंध नाही.