अन्वयार्थ : निसर्गात पाय रोवून संगणकावर हात चालवणारे आदिवासी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 08:59 AM2024-09-26T08:59:01+5:302024-09-26T08:59:19+5:30

नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ उभारणीची घोषणा नुकतीच झाली आहे. आदिवासींना शिक्षण देतानाच त्यांच्याकडूनही बरंच काही शिकण्याची संधी मिळेल.

Anvayarth Article on Governor C P Radhakrishnan announced establishment of tribal university in Nashik | अन्वयार्थ : निसर्गात पाय रोवून संगणकावर हात चालवणारे आदिवासी!

अन्वयार्थ : निसर्गात पाय रोवून संगणकावर हात चालवणारे आदिवासी!

अश्विनी कुलकर्णी

ग्रामीण विकासाच्या अभ्यासक, प्रगती अभियान

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ उभारणीची घोषणा केली आहे. अशा विद्यापीठाची स्थापना ही निश्चितच कौतुकास्पद आहे, यात दुमत असू शकत नाही. हे केवळ एक नवीन विद्यापीठ नसून, ते ‘आदिवासी विद्यापीठ’ असल्याने त्याकडून विशेष अपेक्षा आणि आशा आहेत. परंतु, त्याचबरोबर काही शंकाही मनात येतात.

गडचिरोलीतील ‘गोंडवाना विद्यापीठ’ हे आदिवासीबहुल परिसरात असूनही, त्यातील बहुतांशी अभ्यासक्रम हे इतर विद्यापीठांसारखेच आहेत. नाशिक येथील आदिवासी विद्यापीठातूनही आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या संधी उपलब्ध होतील, कदाचित त्यांना प्राधान्याने प्रवेशही मिळेल. परंतु, केवळ आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच हे विद्यापीठ असावे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही.

आदिवासी समाजात गरिबीचे प्रमाण अधिक असले, तरी त्यांना केवळ मागासलेले समजणे किंवा त्यांच्या जीवनशैलीचे उदात्तीकरण करणे, अशा टोकाच्या भूमिका घेणे योग्य नाही. गरिबी, कुपोषण, आजारपण, औपचारिक शिक्षणाचा अभाव ही त्यांच्यासमोरील आव्हाने आहेत. इतर समाजांप्रमाणेच या समाजातही काही अनिष्ट चालीरीती आहेत. आदिवासी विद्यापीठातून आदिवासींना शिक्षण मिळेलच; परंतु त्याचबरोबर आदिवासींकडूनही काही शिक्षण घेता येईल का, याचा विचार या विद्यापीठाने करणे आवश्यक आहे.

या आदिवासी विद्यापीठाकडून खूप वेगळ्या अपेक्षा आहेत. हवामान बदलाच्या संकटाला तोंड देताना आदिवासींची शेती, जंगल, पाणी यांबद्दलची समज अभ्यासपूर्ण पद्धतीने समजून घेणे गरजेचे आहे. आदिवासींनी जोपासलेल्या दुर्मीळ पिकांचाही अभ्यास या संदर्भात करता येईल.

आदिवासींना त्यांच्या आसपासच्या जंगलातील वनस्पती, त्यांचे उपयोग यांबद्दल असलेले ज्ञान, त्यांच्या पाककृती आणि पोषणमूल्य यांचा अभ्यास व्हायला हवा. जंगल आणि वनीकरण यांतील फरक समजून घेऊन, जंगल, वनस्पती, प्राणी, पाणवठे यांतील परस्परसंबंधांचे आदिवासींना असलेले ज्ञान अभ्यासावे. 
भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून, त्यातून ज्ञान आणि शहाणपण व्यक्त होते. आदिवासी समाजातील विविध भाषा आणि त्यांचे साहित्य जतन करण्यासाठी या विद्यापीठात स्वतंत्र विभाग असणे आवश्यक आहे.

आदिवासी समाजासंदर्भात अभ्यास होतात, भाषा जपण्याचे प्रयत्न होतात, साहित्य संकलित केले जाते, कलांना प्रोत्साहन दिले जाते. परंतु, या सर्व प्रक्रियांत आदिवासींचा सहभाग किती? त्यांना कोणत्या विषयांचा अभ्यास आवश्यक वाटतो, या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे.

या आदिवासी विद्यापीठातून अशा अनेक अपेक्षा आहेत. सध्याच्या शिक्षणपद्धतीचे अभ्यासक्रम असावेतच; परंतु आदिवासी समाजाकडे असलेल्या ज्ञानाचाही आदर व्हावा. निरक्षर असला तरी जंगलातील वनस्पतींची चांगली समज असलेल्या व्यक्तीलाही शिकवण्याची संधी मिळावी. पक्ष्यांच्या निरीक्षणातून हवामानाचा अंदाज करणाऱ्या व्यक्तीला हवामान बदलाच्या अभ्यासात सहभागी करून घ्यायला हवे. 

आदिवासींची जीवनशैली, साहित्य, संस्कृती, भाषा यांचा अभ्यास तुरळक प्रमाणात होतो. आता विद्यापीठ उभारले जात असल्याने, ज्ञानाची देवाणघेवाण करून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवता येतील. इतर विद्यापीठांशी समन्वय साधून विविध विषय हाताळता येतील.

आदिवासी विद्यापीठात आदिवासी केवळ विद्यार्थी म्हणून नसून, त्यांच्याकडे असलेल्या ज्ञान आणि शहाणपणा यावर चर्चा करणारे, त्यांना सक्रिय सहभाग घेण्यासाठी विविध संधी उपलब्ध करून देणारे व्यासपीठ व्हावे. औपचारिक शिक्षण, वय, भाषा किंवा इतर कोणत्याही निकषांमुळे त्यांना या सहभागापासून वंचित करू नये.

आदिवासींसाठी, आदिवासींच्या सहभागातून ज्ञाननिर्मिती करणारे एक जिवंत विद्यापीठ व्हावे. निसर्गात पाय रोवून संगणकावर हात चालवणारे आदिवासी या विद्यापीठातून घडावेत. आदिवासी समाज आणि इतर समाज समान पातळीवर येऊन संवाद, संशोधन आणि ज्ञानार्जन करतील, असे अनोखे वातावरण या विद्यापीठात निर्माण व्हावे, ही आशा आहे!
 

Web Title: Anvayarth Article on Governor C P Radhakrishnan announced establishment of tribal university in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.