अन्वयार्थ : दारू ढोसली, कुणाला चिरडले, माझे काय वाकडे होणार?
By संदीप प्रधान | Published: July 9, 2024 08:15 AM2024-07-09T08:15:28+5:302024-07-09T08:16:08+5:30
'हिट ॲण्ड रन'च्या किती घटना घडाव्यात? आधीच्या घटनांवरून शहाणे होऊ नये? पैसा, सत्ता आणि मस्तीची किक नवश्रीमंत तरुणाईला कुठे नेणार आहे?
संदीप प्रधान
वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत, ठाणे
'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' ही म्हण ज्यांना लागू होती ती पिढी अस्तंगत झाली. आता ठेच लागल्यावर मेंदूपर्यंत जाणारी कळ कदाचित तरुणाईला सँडिस्ट प्लेजर (विकृत आनंद) देऊन जात असावी, त्यात जर ही ठेच समोरच्या असाहाय्य, गरीब व्यक्तीला देताना, त्याच्या किंकाळ्या, त्याची तडफड, जिवाची भीक मागणे यामुळे विकृतानंदाची वेगळीच कीक लागत असावी. रात्रीपासून पहाटेपर्यंत बसून दारूचे चषकावर चषक ढोसले, वर पावडरही इंगली, तरीही कीक का लागत नाही? मग आपली महागडी मोटार घ्या आणि सुसाट चालवत समोर येईल त्याला बेलगाम चिरडा. त्याच्या किंकाळ्या कानी पडताच बहुदा तरुणाईच्या मेंदूला कीक लागत असावी, अर्थात हे सर्वच तरुणाईच्या अवस्थेचे वर्णन नाही. परंतु नवश्रीमंत व मुख्यत्वे पहिल्या किंवा फारतर दुसऱ्या पिढीत पैशाच्या राशीत लोळणाऱ्या एका विशिष्ट तरुणाईला नक्की लागू पडते.
आपल्याकडे मुले एकटी किंवा समूहाने लॅपटॉप किंवा मोबाइलवर गेम खेळतात. त्यात एक गेम मोटार किंवा बाइक घेऊन रस्त्याने सुसाट धावायचे व मध्ये अचानक येणान्या महिला, मुले, वृद्ध यांना चुकवून पुढे पुढे जायचे, असा असतो. जर एखाद्या व्यक्तीला थडकलात तर गेम ओव्हर, नाहीतर मग पुढची पुढची लेव्हल पार करायची, काही दहा-बारा वर्षांच्या मुलांना महिला, मुले अथवा वृद्ध यांना मध्येच मोटार अथवा बाइकने ठोकर दिल्यावर गंमत वाटते. मग पुढे गेम खेळणारी हीच सेक्सपासून ड्रग्जपर्यंत सर्वांचे आकलन असलेली (पण कायद्यानुसार 'अल्पवयीन') मुले बापाने दिलेली मोटार घेऊन रस्त्यावर उतरतात, पोटात मद्य अन् डोक्यात ड्रग्जची नशा असतेच. लहानपणी लॅपटॉपवर खेळलेला गेम प्रत्यक्षात कधी खेळायला मिळणार? असा विचार करून मग लोकांना चिरडत जातात.
पुण्यातील एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दोन तरुण आयटी इंजिनिअर्सना चिरडल्यानंतर देशभर झालेला हाहाकार मिहीर शहा या मुंबईत स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाच्या गावी नव्हता, यावर शेंबडे पोरही विश्वास ठेवणार नाही. या मिहीरने मित्रासोबत जुहूच्या बारमध्ये मनसोक्त मद्यपान केले. त्यानंतर लाँग ड्राइव्हला जायचे आहे, असे सांगून या मिहीरने गाडीचा स्वतः तावा घेतला. वरळी कोळीवाड्यापाशी त्याने कावेरी नाखवा या मच्छीमार महिलेला आपल्या बीएमडब्ल्यूने केवळ उडवले नाही तर दोन किलोमीटर फरफटत नेले. पुण्यातील घटनेतही त्या अल्पवयीन मुलाने ड्रायव्हरला वाजूला बसवून मोटारीचा ताबा घेतला. मिहीरनेही तेच केले. दारू प्यायल्यावर मोटार चालवणे हा गुन्हा आहे हे ठाऊक असतानाही तसे करणे याचे कारण पैशाची मस्ती हेच आहे. माझा बाप व मी व्यवस्थेच्या वर आहोत. आमचे सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांसोबत संबंध आहेत. पोलिसांसह सर्व व्यवस्था खिशात आहे समजा मी रस्त्यावरून जाणाऱ्या या व्यक्तीला चिलटासारखा चिरडला तर माझे कोण वाकडे करणार? या गुर्मीची नशा हेच वारंवार या घटना घडण्यामागचे कारण आहे.
शहा हे शिंदेसेनेचे पदाधिकारी असले तरी कारवाई कायद्यानुसार होईल, असे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले हे उत्तम झाले. त्यामुळेच पोलिसांनी राजेश शहाला म्हणजे मिहीरच्या वडिलांना अटक केली. चालक राजऋषी विडावत याच्याही मुसक्या आवळल्या, मिहीर हिट अॅण्ड रन प्रकरणानंतर फरार झाला. पोलिसांनी लागलीच त्याला अटक केली असती तर त्याच्या रक्तामधील अमलीपदार्थाची मात्रा किती होती वगैरे गोष्टींचा भविष्यात हा खटला न्यायालयात उभा राहील तेव्हा निकालाच्या दृष्टीने लाभ झाला असता.
मुंबईत हे घडत असताना तिकडे पुण्यात पुन्हा एक हिट अॅण्ड रनची घटना घडली व पोलिसाला इजा झाली. नागपूरमध्ये एका बड्या महिला सरकारी अधिकाऱ्याने सासऱ्याची कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता हडप करण्याकरिता हिट अॅण्ड रनचा देखावा केला होता. माणसातला पशु जागा झाला आहे. माणसाला संपवल्याखेरीज तो स्वस्त बसणार नाही.
sandeep.pradhan@lokmat.com