चिंतातुर राज ठाकरे
By admin | Published: December 28, 2016 02:45 AM2016-12-28T02:45:01+5:302016-12-28T02:45:01+5:30
हाती फारसे काम उरले नाही म्हणून म्हणा किंवा येताजाता डाफरता यावे असे फारसे मनसैनिकच सेनेत राहिले नाहीत म्हणून म्हणा, सध्या राज ठाकरे आत्मरत होऊन विचार
हाती फारसे काम उरले नाही म्हणून म्हणा किंवा येताजाता डाफरता यावे असे फारसे मनसैनिकच सेनेत राहिले नाहीत म्हणून म्हणा, सध्या राज ठाकरे आत्मरत होऊन विचार करतेसे झालेले असावेत आणि त्यापायीच दोन गहन चिंतांनी त्यांचे मुखमंडल व्यापून टाकलेले दिसते. उभय चिंता महाराष्ट्राशी आणि त्यातही पुन्हा शिव छत्रपतींच्या संदर्भातील असल्याने या मुलखातील तमाम आया-बहिणींनी आणि बाप-बंधूंनी राज यांच्या चिंतांची चिंता करणे क्रमप्राप्त ठरते. पैकी पहिली चिंता म्हणजे अरबी समुद्रात छत्रपतींचे स्मारक उभे केल्याने महाराष्ट्रात शिवशाही कशी अवतरणार आणि दुसरी चिंता म्हणजे या स्मारकासाठी जे अमाप द्रव्य सांडावे लागणार ते कोठून येणार? यातील पहिल्या चिंतेला स्वानुभवाची आणि स्वयंअध्ययनाची जोड आहे. कारण या आधी महाराष्ट्रात जेव्हां युतीची सत्ता स्थापन झाली होती तेव्हां शिवशाही अवतरल्याच्या ज्या गर्जना मातोश्रीवरुन केल्या जात होत्या, त्या गर्जनांमध्ये एक आवाज राज ठाकरे यांचाही होता. प्रत्यक्षात ती शिवशाही नव्हे तर ‘शिव शिव शाही’ असल्याचे त्यांनाच उमगले आणि जो प्रयोग एकदा फसला तो पुन्हा कसा काय यशस्वी होऊ शकतो, हे त्यांनीच मांडलेले त्रैराशिक तसे नि:संशय बिनतोडच म्हणायचे! दुसरी चिंता शिव स्मारकासाठी लागणारे द्रव्य गोळा होणार कसे? खरे तर हा प्रश्न त्यांना का पडावा हाच एक मोठा प्रश्न. नाशिकच्या महापालिकेची सत्ता त्यांनी काबीज केली तेव्हां ही संस्थादेखील गळ्यापर्यंत कर्जात डुंबत होती. तरीदेखील या कर्जाचे ओझे न बाळगता त्यांनी काही कोटींच्या योजनांचे गाजर नाशिककरांना दाखविले. या योजनांसाठी पैसे कोठून आणणार याचेही उत्तर त्यांच्यापाशी म्हणे होते. टाटा आणि अंबानी यांनी काही योजना म्हणे दत्तक घेतल्या व त्यांनाच दत्तकविधानात सहभागी करुन घेतल्याबद्दल लटके रागावलेल्या महिन्द्र यांची कशीबशी समजूत काढून त्यांना शांत करणे भाग पडले. परंतु प्रत्यक्षात त्यातून काय निर्माण झाले हे नाशिककरच जाणोत. पण मुद्दा तो नाही. जे धनिक उद्योगपती राज ठाकरे यांच्या शब्दाखातर आपल्या थैल्यांची तोंडे मोकळी करायला सिद्ध झाले ते लोक वरती नरेंद्र आणि खालती देवेंद्र यांच्यासाठी त्याच थैल्या रित्या करणार नाहीत? पण त्याचीही गरज नाही. भाववाढ लक्षात घेता हा पंचवार्षिक स्मारक प्रकल्प ४० हजार कोटींचा म्हणजे दरसाल ८ हजार कोटींचा व राज्याची लोकसंख्या १२ कोटी. याचा अर्थ दरडोई दरमहा अवघे ५५ रुपये मिळाले की काम झाले. राज्यातील शिवभक्त हे शिवधनुष्य लीलया पेलणार नाहीत?