नगरची पालखी कोणी वहायची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 02:25 AM2017-11-09T02:25:08+5:302017-11-09T02:25:19+5:30
नगरला पार पडलेल्या मसापच्या विभागीय साहित्य संमेलनाच्या मांडवात रामदास फुटाणे यांनी नगरच्या राजकारणावर कोटी केली. ते म्हणाले, या जिल्ह्यात उत्तरेचे लोक पालखीत बसतात
नगरला पार पडलेल्या मसापच्या विभागीय साहित्य संमेलनाच्या मांडवात रामदास फुटाणे यांनी नगरच्या राजकारणावर कोटी केली. ते म्हणाले, या जिल्ह्यात उत्तरेचे लोक पालखीत बसतात, आणि दक्षिण भागातील लोक निव्वळ या पालखीचे भोई असतात.
फुटाणे नगरच्या प्रादेशिक असमतोलावर बोलले. फुटाणे यांना जिल्ह्याचे जुने संदर्भ पक्के ठाऊक आहेत. ‘सामना’ चित्रपटाच्या काळातील नगरचे सरंजामी व साखर कारखानदारीचे राजकारण त्यांनी जवळून पाहिलेले आहे. हा चित्रपट सहकारातील राजकारणावर बेतलेला आहे. अर्थात ते राजकीय बेरकीपण व ‘सामना’ आजही संपलेला नाही. इतर जिल्ह्यात नेते जिल्हा म्हणून काही अस्मिता जपत असतात. नगरच्या नेत्यांना जिल्हा म्हणून जी काही अस्मिता असते त्याच्याशी घेणेदेणे दिसत नाही.
नगरचा आजचा नेता कोण? असा प्रश्न फुटाणे यांनी केला असता? तर संमेलनस्थळ निरुत्तर झाले असते. ‘नेता नसलेला जिल्हा’ अशी नगरची ओळख बनू पाहत आहे. जे कोणी नेते आहेत ते आपापले किल्ले व राजकारण सांभाळण्यात मश्गुल आहेत. ते वरती श्रेष्ठींना सांभाळतात आणि खाली आपापल्या मतदारसंघाला. फुटाणे यांनी जे निरीक्षण नोंदविले ते शरद पवारही नगरमध्ये अनेकदा बोलून दाखवितात.
राज्यात व केंद्रात सध्या भाजप-सेनेचे सरकार आहे. इतर जिल्ह्यांत तो फरक कदाचित जाणवत असेल. नगरमध्ये मात्र, सत्ताधारी व विरोधक इतके प्रेमात आहेत की त्यांच्यात भेदच कळत नाही. पालकमंत्री राम शिंदे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे दोघेही एकाच सरकारमधील घटक वाटतात. गत आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी राळेगणसिद्धीत महावितरणच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले. त्या शासकीय जाहिरातीत पालकमंत्री शिंदे यांसह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांची नावे होती. राळेगणसिद्धी गाव सेनेचे आमदार विजय औटी व भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या मतदारसंघात आहे. त्यांची नावे मात्र जाहिरातीत नव्हती. अर्थात ही बाब मुख्यमंत्र्यांनाही बहुधा खटकलेली नाही. अण्णा हजारे हे ‘बिगर राजकीय’ असल्याने ते असले काही बघतच नसतात.
सध्या नगरच्या जिल्हा बँकेची भरती गाजते आहे. भरतीत संचालक व अधिकाºयांची मुलेच गुणवत्ता यादीत असल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणल्याने भरतीला स्थगिती मिळाली. राज्यातील १७ हजार मुले या भरतीला बसली होती. मात्र, भरतीबाबत जे काही आक्षेप आले, त्याबाबत विखे, थोरात, पिचड, गडाख, कर्डिले, पाचपुते, कोल्हे, घुले, नागवडे असे जिल्ह्यातील सगळेच नेते मौन बाळगून आहेत. अण्णा हजारे बोलले ते भरती पूर्ण झाल्यावर. अगोदरच त्यांनी हस्तक्षेप केला असता तर कष्ट करून परीक्षा देणाºया उमेदवारांना शेवटी भरतीच्या स्थगितीला सामोरे जावे लागले नसते. पालकमंत्री शिंदेही काहीच बोलत नाहीत. प्रशासन व सरकार जो काही निर्णय घेईल तो आपणच घेतला, असे भासवून ते प्रत्येक प्रकरणात नामानिराळे राहतात. ‘मुंबई ते कर्जत-जामखेड’ आणि पुन्हा ‘सोयीने’ मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा शासकीय दौरा ठरलेला असतो. त्यामुळे नगर जिल्ह्याची पालखी कोणी वहायची? हा फुटाणे यांचा प्रश्न कळीचा आहे.
- सुधीर लंके