प्र. के. अत्रे यांची माफी मागून...

By संदीप प्रधान | Published: January 12, 2018 05:39 AM2018-01-12T05:39:59+5:302018-01-12T05:40:05+5:30

(डोंबिवलीतील एका पोलीस शिपायाने सात लग्ने केल्याबद्दल त्याच्यावर कारवाई झाली. त्याचे काल्पनिक स्वगत प्र. के. अत्रे यांची माफी मागून)

apologies to atre | प्र. के. अत्रे यांची माफी मागून...

प्र. के. अत्रे यांची माफी मागून...

googlenewsNext

- संदीप प्रधान

(डोंबिवलीतील एका पोलीस शिपायाने सात लग्ने केल्याबद्दल त्याच्यावर कारवाई झाली. त्याचे काल्पनिक स्वगत प्र. के. अत्रे यांची माफी मागून)
न्यायमूर्ती महाराज या विद्वान वकील महाशयांनी माझ्यावर इतकी आगपाखड केली आहे की, आता मी दीनदुबळा स्वत:चा बचाव काय करणार? ठकसेन काय, नटश्रेष्ठ काय... मराठीमधील एकही विशेषण वकील साहेबांनी माझे वर्णन करताना सोडले नाही. रावणानंतर लखोबाचा आणि त्यानंतर आमचा नंबर लागतो, असेच वकीलसाहेब म्हणाले आहेत. अनेक स्त्रियांना फसवून त्यांचे वाटोळे करणारा मी महाभयंकर माणूस आहे, असे वकीलसाहेब म्हणतात. त्यांनी उभे केलेले साक्षीदारही तेच सांगत आहेत. माझ्याविरुद्ध तक्रार देणारी ही सूचिता म्हणते की, तिला विवाह करून मी अंतर दिले आणि मालमत्तेत वाटा दिला नाही. अशीच फसवणूक मालती, शांताबाई, पल्लवी, दीपाली, पुष्पलता आणि कविता यांची केली. न्यायमूर्ती महाराज मी साºयांशी लग्न केली. संसार केला. एका बायकोमुळे पगार पुरत नाही. मी सात नांदवल्या. या वकील महाशयांनी सिंहाला पकडायला लावलेल्या कायद्याच्या सापळ्यात माझ्यासारखा उंदीर सापडलाय किंवा यांनी साप... साप म्हणत दोरी धोपटलीय, असेही म्हणणार नाही. न्यायमूर्ती महाराज आपल्या मागे तसबिरीत बसलेल्या महात्मा गांधी ऊर्फ बापूंची शपथ घेऊन सांगतो ‘तो मीच आहे’.
लखोबा लोखंडेनी मला तरुण वयापासून भारावून टाकले होते. पोलिसांच्या टाळूवर हात फिरवणारा लखोबा मला नेहमीच आकर्षित करत आला. समाजातील लखोबा जेरबंद करण्याकरिता मी पोलीस झालो. मी जेव्हा पोलीस झालो तेव्हा परस्त्रीकडे नजर वर करून पाहत नव्हतो. त्यामुळे कृष्णासारखे मी इतक्या स्त्रियांबरोबर विवाह करीन किंवा ध्रुतराष्ट्रासारखी मुले जन्माला घालीन, यावर माझा विश्वास नव्हता. मात्र दसरा नाही की पाडवा, जत्रा नाही की ऊर्स, मोर्चा नाही की दंगा, सभा नाही की कर्फ्यु. बंदोबस्तामुळे शहरातील कानाकोपºयात माझी ड्युटी लावली गेली. थंडी, वारा, ऊन, पाऊस कशाची पर्वा न करता मी आपला उभा. माझ्या घरच्यांनी देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने माझे मालतीशी लग्न लावून दिले होते. ती बिच्चारी माझी घरी वाट पाहत असायची. मी घरी आल्याखेरीज तिच्या घशाखाली घास जात नसल्यानं उपाशीपोटी निजायची. अशीच माझ्या आठवणीत झुरून गेली. मग काय बंदोबस्त करता करता कधी भरपावसात मला सूचिता भेटली तर कधी थंडीत दया येऊन शांताबाईनं मला कांबळ दिली. या सगळ्या शिकल्यासवरल्या, नोकरी करणाºया मुली, मॅट्रीमोनियल साईटस्वर नाव नोंदवून बसलेल्या. हुरळली मेंढी अन लागली लांडग्याच्या पाठीशी अशा फसल्याच कशा? न्यायमूर्ती महाराज माधव काझीनं ५८ वर्षांपूर्वी लग्न जमत नसलेल्या मुलींना फसवलं. त्याच्यावर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी मागील दहा हजार वर्षात झाला नाही, असा लखोबा जन्माला घातला. पण कुणी धडा घेतला नाही. मात्र तरीही मुलींची मोडणारी लग्न, घोर फसवणूक हा सिलसिला सुरुच आहे. त्यामुळे न्यायमूर्ती महाराज तुम्ही मला दहा काळ्या पाण्याची किंवा २५ फाशींची शिक्षा द्या. प्रौढ मुलींच्या विवाहाचा प्रश्न सुटणार असेल तर माझे हौतात्म्य सार्थकी लागेल.

Web Title: apologies to atre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.