आप्पासाहेब धर्माधिकारी : आधुनिक स्वच्छतेचे दूत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 01:42 AM2019-05-14T01:42:03+5:302019-05-14T01:42:40+5:30

समर्थ रामदासांच्या दासबोधाच्या निरूपणातून स्वच्छतेचे थक्क करणारे काम आप्पासाहेबांच्या प्रेरणेतून राज्यभर सुरू आहे़ मनाची नव्हे, तर विचारांची स्वच्छता हा त्यांचा हेतू साध्य होतो आहे.

Appasaheb Dharmadhikari: The messenger of modern cleanliness | आप्पासाहेब धर्माधिकारी : आधुनिक स्वच्छतेचे दूत

आप्पासाहेब धर्माधिकारी : आधुनिक स्वच्छतेचे दूत

googlenewsNext

- जयंत धुळप
(कोकण समन्वयक, लोकमत)

समर्थ रामदासांच्या दासबोधाच्या निरूपणाचा वारसा वडील डॉ. नारायण विष्णू उर्फ नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून घेऊन तो समर्थ बैठकांच्या माध्यमातून अधिक प्रभावी करण्याचे आणि त्याला सामाजिक परिवर्तनाचा आधुनिक आयाम देण्याचे अनन्यसाधारण काम पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत. त्यांचा आज जन्मदिन आहे. आध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन आणि व्यसनमुक्ती या क्षेत्रांत त्यांनी प्रभावीपणे प्रबोधनाचे काम केले. योग्य वेळी भविष्याचा वेध घेत मानववंशाच्या हितासाठी पर्यावरण संवर्धनाच्या विचाराला प्राधान्य दिले. देश-परदेशातील हजारो बैठकांच्या माध्यमातून लाखो अनुयायांच्या मनात तो विचार शास्त्रशुद्ध पद्धतीने रुजविण्यात आप्पासाहेबांनी निरुपणातून संपादन केलेले यश अलीकडच्या काळातील मोठ्या सामाजिक परिवर्तनाच्या यशस्वी चळवळीचे प्रत्यंतर देणारे असेच आहे. जागतिक पातळीवरही या पद्धतीने निरूपणाच्या माध्यमातून अशी सामाजिक परिवर्तनाची चळवळ कोणाला उभारता आलेली नाही, हे त्यांच्या चळवळीचे अमूल्य यश आहे.

धर्माधिकारी घराण्यात चारशे वर्षांपासून समाजप्रबोधनाच्या कार्याची परंपरा आहे. त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनांव ‘शांडिल्य’ होते. त्यांच्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य हे स्वेच्छेने धर्मजागृतीचे काम करीत असत. दर्यासारंग सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने ‘धर्माधिकारी’ ही पदवी बहाल केली आणि तेव्हापासून आजतागायत हे घराणे धर्माधिकारी आडनाव लावून त्यास समर्पक असे धर्मजागृतीचे काम करीत आहेत. धर्माधिकारी घराण्याची चौथी पिढी असलेल्या आप्पासाहेबांचे चिरंजीव सचिनदादा, राहुलदादा, उमेशदादा हेही वडिलांच्याच निष्ठेने आणि तेवढ्याच तळमळीने याच समाजकार्यात सक्रीय आहेत.
दासबोधाच्या निरूपणाचे त्यांनी केलेले रसाळ निरूपण सद्यस्थितीत मराठीबरोबरच हिंदी, उडिया, तामिळ, बंगाली, कन्नड व इंग्रजीतूनही केले जाते. यासाठी सुरुवातीला महिला व पुरु षांचीच बैठक होत असे. मात्र, बालवयापासूनच संस्कार व्हावेत, म्हणून बालोपासना सुरू करण्यात आली.

वस्तुत: समर्थ रामदासांच्या दासबोधातील एकेका समासाचे निरूपण करताना त्याला आजचे संदर्भ देणे, आधुनिक काळाशी ते सुसंगत असतील, याची काळजी घेणे, अशा सोप्या निरूपणातून विकारी मनांची मशागत करणे आणि अंंतिमत: निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी डॉ. नानासाहेब धमाधिकारी यांनी आयुष्य वेचले. समाजाला त्यांनी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा सर्वांगीण पुरुषार्थाची ओळख करून दिली. मानवाचा अपेक्षित विकास होऊ शकतो, यावर त्यांनी सदैव भर दिला. समर्थांनी दासबोधातून सांगितलेला कोणताही सद्विचार हा केवळ मनात रुजून तेथेच थांबणे योग्य नाही; तर तो मनातून डोक्यात आणि डोक्यातून प्रत्यक्ष कृतीत उतरला, तरच सर्वांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते, हा आप्पासाहेब मांडत असलेला विचार त्यांचे जगभरातील लाखो अनुयायी कृतीत उतरवताना दिसून येत आहेत. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करून मनामनात रुजविलेले विचार प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी आप्पासाहेबांनी सामूहिक सुसूत्र नियोजनबद्ध व्यवस्था तयार केली. त्यातूनच पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन, जलस्त्रोत पुनरुज्जीवन, अखिल मानववंशाचे आरोग्य सुधारावे, यासाठी स्वच्छता अभियान अशा सामाजिक परिवर्तनाच्या सामूहिक चळवळी देशभरात सर्व राज्यांत उभ्या राहिल्या. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारने त्यांना राज्याचे ‘स्वच्छता दूत’ म्हणून स्वीकारले; तर केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ प्रदान करून त्यांचा यथोचित गौरव केला.

सामूहिक श्रमदानातून स्वच्छतेचा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवून आपल्या सद्गुरूंना त्यांच्या वाढदिवसाची अनोखी भेट देण्यासाठी रविवारी एकाच दिवशी महाराष्ट्र आणि गुजरातमधील बैठकीतील तब्बल ७८ हजार ६१० अनुयायांनी घराबाहेर पडून सरकारी कार्यालये, रस्ते, रेल्वे स्टेशन, स्मशानभूमी, रुग्णालये, समुद्रकिनारे, पाण्याचे कुंड अशा लाखो चौरस मीटर क्षेत्रातील तब्बल तीन हजार १४५ टन कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावली. सरकारी यंत्रणा किंवा त्या-त्या ठिकाणचे नागरिक यापैकी कोणालाही कोणतीही तोशिस लागू न देता हे काम अत्यंत शांतपणे, शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आले आणि ते काम, त्यातून झालेली लख्ख स्वच्छता पाहणारे थक्क झाले. यासारख्या अचाट आणि अफाट कार्याच्या विलक्षण यशस्वीततेमागे केवळ पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आजवर रुजविलेली विचारप्रेरणाच आहे.

Web Title: Appasaheb Dharmadhikari: The messenger of modern cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.